गडचिरोलीला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आधुनिक केसरी न्यूज
गडचिरोली : दि.२२ गडचिरोलीची ‘स्टील हब’च्या दिशेने वाटचाल होत असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात लोह उद्योग प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. त्यातून त्यांचे जीवनमानात बदल घडून गडचिरोलीत परिवर्तन घडत आहे. जल, जंगल, जमीन या गडचिरोलीच्या नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्यास प्राधान्यक्रम असणार आहे. पुढील काही वर्षात नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊन गडचिरोली राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडच्या (एलएमईएल) विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यात हेडरी येथील ५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांट, हेडरी ते कोनसरी दरम्यानची ८५ किलोमीटर लांबीची आणि १० दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेची स्लरी पाइपलाइन, आणि कोनसरी येथील ४ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या पेलेट प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. याव्यतिरिक्त, कोनसरी येथे ४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा एकात्मिक स्टील प्रकल्प, १०० खाटांचे रुग्णालय, सीबीएसई शाळा आणि सोमनपल्ली येथील लॉयड्सच्या कर्मचारी वसाहत या प्रकल्पांचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले. गडचिरोलीला 'स्टील हब ऑफ इंडिया' बनविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पद्मश्री पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या तुलसी मुंडा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल, लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गडचिरोली: विकासाच्या नव्या पर्वाकडे : मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात गडचिरोलीच्या विकासावर आणि 'स्टील हब' बनविण्याच्या स्वप्नपूर्तीवर विशेष भर दिला. ते म्हणाले की, गडचिरोलीचा चेहरामोहरा बदलविण्याचे काम लॉयड्सच्या माध्यमातून होत आहे. २०१६ पासून अनेक अडचणींवर मात करून येथे लोह उत्खनन सुरू झाले आहे. गडचिरोलीत लोह उत्खननासाठी परवानगी देताना, जिल्ह्याचा वसाहतीसारखा वापर होऊ नये आणि येथेच रोजगार निर्माण होऊन स्टील प्रकल्पही सुरू व्हावा, या अटींवरच परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत १४ हजार स्थानिकांना रोजगार मिळाला आहे, ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कंपनीत हाऊसकीपिंग ते एलएनजी ट्रॅक्स चालकांपर्यंतच्या पदांवर काम करणाऱ्या महिलांचा प्रवास असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पर्यावरणपूरक विकास आणि 'ग्रीन गडचिरोली' संकल्पना : ८० किलोमीटर लांबीची स्लरी पाइपलाइन ही प्रदूषण टाळण्यास मदत करेल, ज्यामुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे ५५ टक्के घट होईल. राज्यातील पहिली आणि देशातील चौथी अशी ही स्लरी पाइपलाइन असल्याचं त्यांनी नमूद केलं. भविष्यात ई-वाहनांचा वापर आणि गॅसवर चालणाऱ्या वाहनांद्वारे 'ग्रीन ट्रान्सपोर्टेशन'वर भर देऊन प्रदूषणमुक्त विकासाची ग्वाही त्यांनी दिली. पुढील दोन वर्षांत एक कोटी झाडे लावून गडचिरोलीचे वनआच्छादन वाढवण्याचे उद्दिष्टही त्यांनी सांगितले.
स्थानिकांना आरोग्य आणि शिक्षणाची हमी : उत्तम शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतील. प्रत्येक नागरिकाला पाच लाखांपर्यंतचा उपचार शासन मोफत देत आहे, ज्यामुळे गडचिरोलीच्या नागरिकांना उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.
माओवादमुक्त गडचिरोली आणि विकास प्रक्रियेत सहभागाचे आवाहन : माओवादग्रस्त जिल्ह्याची ओळख पुसली जात असल्याचे सांगत उर्वरित माओवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात येत 'शहरी माओवादा'पासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले. गडचिरोलीचा विकास सुरू झाला असताना आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या, 'मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या. अशा अफवांपासून सावध राहा, कारण त्या लोकांना विकासापासून दूर ठेवण्यासाठी पसरवल्या जातात असे त्यांनी स्पष्ट केले.
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोलीवरील आत्मीयतेचे कौतुक केले. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हजारो लोकांना भेटण्याची उत्सुकता असतानाही मुख्यमंत्री गडचिरोलीत उपस्थित राहिले हे या जिल्ह्याप्रती असलेल्या त्यांच्या आपुलकीचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'विकसित भारत' आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली 'विकसित महाराष्ट्र' संकल्पनेचा त्यांनी उल्लेख केला. विकासाच्या या प्रवाहात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून प्रकल्पातून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांची माहिती दिली. या कार्यक्रमाला माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, रमेश बारसागडे, प्रशांत वाघरे आदी मान्यवर उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List