राज्यात गुटखा बंदी असतानाही शहरात गुटखा आणि खऱ्याची राजरोस विक्री : प्रशासनाचा पाठिंबा कि जाणूनबुजून डोळेझाक
आधुनिक केसरी न्यूज
लक्ष्मीकांत मुंडे
किनवट : राज्यात गुटखा आणि खर्रा विक्रीवर कडक बंदी लागू असतानाही शहरात मात्र या घातक पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चौकाचौकात, गल्लीबोळात, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बसस्थानके, अगदी सरकारी कार्यालयांच्या आवारातसुद्धा गुटखा सहज उपलब्ध आहे. यामुळे 8 वर्षांच्या बालकापासून 80 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वजण या विषारी व्यसनाच्या आहारी गेले आहेत. जानकारांच्या मते शहरातील गुटख्याची महिन्याची उलाढाल ही कोटींच्या घरात पोहोचली आहे.एवढ्या मोठ्या उलाढालीमागे व्यवस्थित जाळे कार्यरत असून या काळ्या व्यवसायाला प्रशासनाच्या संरक्षणाशिवाय चालना मिळणे शक्य नसून यातील काही हिस्सा हा प्रशासनास सुद्धा पोहोचतो आहे असा नागरिकांचा ठाम आरोप आहे. गुटखा खरेदी-विक्रीवर बंदी असली तरी दुकानदार खुलेआम विक्री करतात. एवढेच नव्हे तर, शहरातील अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यांच्या काही अंतरावरच गुटखा सहज मिळतो, ही बाब अधिक चिंताजनक आहे.शहरातील रस्ते, चौक, सरकारी कार्यालयांच्या भिंती, सार्वजनिक ठिकाणे लालसर थुंकीच्या डागांनी विद्रूप झाली आहेत. एवढेच काय तर, काही डॉक्टर रुग्ण तपासताना तोंडात खर्रा ठेवतात, तर अधिकारी खुर्चीत बसून कर्तव्य बजावताना गुटखा चघळतात. ही परिस्थिती आरोग्य यंत्रणेवर आणि प्रशासनावर कलंक ठरते.दरम्यान, प्रशासन अधूनमधून कारवाई करून धुळफेक करत असल्याचे चित्र आहे. महिन्यातून एकदा-दोनदा काही पाकिटे जप्त करून मोठ्या बातम्या झळकवल्या जातात; मात्र त्यानंतर विक्री पुन्हा सुरू होते. प्रत्यक्षात विक्रीवर बंदी घालण्यासाठी सातत्यपूर्ण मोहीम, मोठ्या प्रमाणात जप्ती आणि गुटखा माफियांवर कठोर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. पण त्याकडे प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.आरोग्य विभागाने वारंवार गुटखा सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, दातांचे विकार, पचनाचे त्रास यासारख्या गंभीर आजारांचा इशारा दिला आहे. तरीसुद्धा प्रत्यक्षात गुटखा विक्री रोखली जात नसल्याने भविष्यात शहर "गुटखा व्यसनाचे केंद्र" बनण्याची भीती व्यक्त होत आहे.शहरवासियांची ठाम मागणी आहे की, गुटखा विक्रीवर कठोर नियंत्रण ठेवले जावे. अन्यथा काही वर्षांत शहरात कर्करोगाचे रुग्ण वाढतील आणि लालसर थुंकीने माखलेली भिंतीच प्रशासनाच्या निष्क्रियतेची साक्ष देतील.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List