नेवासा फाट्यावर फर्निचर दुकानात भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळुन मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज
गंगापूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा कॉलेज परिसरात रविवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीमुळे दोन लहान मुलांसह आई-वडील व वृद्ध आजीचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण नेवासा परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये पाच जणांचा समावेश
या दुर्घटनेत मयूर अरुण रासने (३६), पत्नी पायल (३०), मुलगा अंश (११), मुलगा चैतन्य (६) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (८५) यांचा मृत्यू झाला. तर यश किरण रासने (२५) गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मयूर रासने यांचे आई-वडील अरुण रासने व त्यांची पत्नी हे मालेगाव येथे नातेवाइकांकडे गेले असल्यामुळे बचावले.
मध्यरात्री लागलेली आग; वरच्या मजल्यावर अडकले कुटुंबीय
नेवासा फाटा कॉलेज परिसरातील कालिका फर्निचर दुकानाला रात्री सुमारे १ वाजता अचानक आग लागली. दुकानाच्या मागील व वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रासने कुटुंबाला या आगीने वेढले. आगीचा भडका इतका तीव्र होता की झोपेत असलेल्या कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. ते वरच्या मजल्यावर राहत असल्याने खाली उतरून सुटण्याचा मार्गही बंद झाला. काही क्षणांतच दुकान व घर आगीत पूर्णत: जळून खाक झाले.
स्थानिकांची हतबलता; अग्निशमन दलाचे प्रयत्न व्यर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, या आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की आग इतकी भीषण होती की जवळचे लोकही मदतीसाठी वेळेवर पोहोचू शकले नाहीत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने संपूर्ण दुकान व घर व्यापले होते. जवानांनी अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
पोलीस तपास सुरू
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत नेवासा पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थ व स्थानिकांमध्ये प्रचंड दुःखाचे वातावरण पसरले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List