२५१५ योजनेत ६.९५कोटींचा बनावट शासन आदेश! आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी
आधुनिक केसरी न्यूज
श्रीनिवास शिंदे
अहिल्यानगर : जिल्ह्यातील श्रीगोंदा, नगर आणि पारनेर तालुक्यांतील ४५ विकासकामांसाठी ग्रामविकास विभागाच्या २५-१५ योजने अंतर्गत तब्बल ६ कोटी ९५ लाख रुपयांचा बनावट शासन निर्णय काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या बनावट आदेशाच्या आधारे कामांची स्थळ पाहणी, अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेशही जारी करण्यात आले होते. विशेष म्हणजे, सार्वजनिक बांधकाम विभागाने सहा महिन्यांपर्यंत या आदेशाची खातरजमा न केल्याने हा प्रकार अत्यंत गंभीर ठरला आहे. अनेक कामे पूर्ण झाली असून काहींची देयकेही सादर झाली आहेत. मात्र, ४ एप्रिल २०२५ रोजी ग्रामविकास विभागाने हा आदेश बनावट असल्याचे जाहीर केले. तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
आमदार दाते यांनी प्रश्न उपस्थित केले की, जर आदेश बनावट होता, तर ठेकेदारांनी स्वतःच्या खर्चाने कामे कशी पूर्ण केली? त्यांना देयके मंजूर होण्याची हमी कुणाकडून मिळाली? या बनावट आदेशामागील धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत का? याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बनावट शासन निर्णयाची कबुली दिली. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा मान्य करत त्यांच्यावर चौकशी आणि कारवाईचे आश्वासन दिले. हा प्रकार केवळ आर्थिक फसवणूक नसून, ग्रामविकास योजनांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा आणि जनभावनेचा अनादर करणारा आहे.आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपर्यंत चौकशी पोहोचून कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List