विवेकाचा जागर : परिवर्तनवादी साहित्य संकल्पना आणि स्वरूप

विवेकाचा जागर : परिवर्तनवादी साहित्य संकल्पना आणि स्वरूप

डॉ.वासुदेव मुलाटे हे ग्रामीण साहित्यातील महत्त्वाचं आणि ठळक असं एक नाव आहे. त्यांनी ग्रामीण साहित्य सर्वदूर आणि अनेकांच्या मनात रूजविले आहे. ग्रामीण साहित्याचे दालन समृद्ध करण्यामध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.म. फुले यांना आपल्या साहित्याच्या प्रेरणास्थानी मानून साहित्य लेखनाची चळवळ सुरू केली. ग्रामीण माणसाला एक परिपूर्ण माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्याचबरोबर दैन्य, दास्य… Continue reading विवेकाचा जागर : परिवर्तनवादी साहित्य संकल्पना आणि स्वरूप

डॉ.वासुदेव मुलाटे हे ग्रामीण साहित्यातील महत्त्वाचं आणि ठळक असं एक नाव आहे. त्यांनी ग्रामीण साहित्य सर्वदूर आणि अनेकांच्या मनात रूजविले आहे. ग्रामीण साहित्याचे दालन समृद्ध करण्यामध्ये त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.म. फुले यांना आपल्या साहित्याच्या प्रेरणास्थानी मानून साहित्य लेखनाची चळवळ सुरू केली. ग्रामीण माणसाला एक परिपूर्ण माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्याचबरोबर दैन्य, दास्य आणि अज्ञानातून त्याची मुक्तता झाली पाहिजे. याच विचाराने डॉ. वासुदेव मुलाटे यांची लेखणी तळपताना दिसते.अनेकांना या ग्रामीण साहित्याच्या प्रवाहात आणण्यासाठी डॉ. वासुदेव मुलाटे यांचे साहित्य आणि विचार प्रेरणादायी आहेत. जास्तीत जास्त ग्रामीण वास्तवतेचे चित्रण करून त्यांनी ग्रामीण भागातील सामान्य माणसांच्या जीवनातील बारकावे,अन्याय -अत्याचार,जातीयता, धर्मांधता व राजकारण हे आपल्या साहित्यात आणून एक सृजनशील नवनिर्मिती करून त्यांच्या प्रश्नाची मांडणी केली आहे.त्यांनी साहित्यातून कथा, कविता, कांदबरी, ललित साहित्य, ललित गद्य, व्यक्तिचित्रणे, आत्मकथनपर लेखन, वैचारिक साहित्य व एकांकिका असे विविध प्रकार हाताळून त्यांनी समीक्षा क्षेत्रातही आपला स्वतःचा एक आगळा वेगळा ठसा आणि दबदबा उमटविला आहे. त्यांचे साहित्य हे मानवी मन समृद्ध करणारे आहे. परिवर्तनशील संकल्पनेवर त्यांचा दृढविश्वास आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या साहित्यातून परिवर्तन विचारांना पोषक अशा गोष्टीवर भर दिलेला दिसून येतो.
डॉ. वासुदेव मुलाटे हे सामाजिक जाण आणि सामाजिक भान जपणारं संवेदनशील मनाचं व्यक्तीमत्वं आहे. त्यांनी सर्जनशील आणि चिकित्सक लेखणीने आपल्या साहित्यातून आणि वाणीतून समतेचे तत्त्व मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर त्यांची दृष्टी ही पुरोगामी,आधुनिक विचारांची आहे. समाजात बदल घडवून आणणारी आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनाने परिवर्तन विचारांची योग्य पेरणी केलेली दिसते. म्हणूनच संपादक डॉ. रामकिशन दहिफळे व सहसंपादक डॉ. शंकर विभुते व डॉ. संतोष देशमुख यांनी त्यांच्या विचार आणि कार्याचा गौरव व्हावा म्हणूनच’परिवर्तनवादी साहित्य: संकल्पना आणि स्वरूप’हा ग्रंथ निर्माण केला आहे.
परिवर्तन साहित्याचा विचार साहित्यातील विविध प्रवाहातून तो प्रसारित आणि प्रवाहित झालेला आपल्याला दिसून येतो. अशा विविध साहित्यांचा परामर्ष या गौरव ग्रंथातील वेगवेगळ्या चार विभागातून साहित्यिकाने आपल्या लेखनीद्वारे मांडला आहे. खरेतर ‘परिवर्तन साहित्याची गरज’ (जनार्दन वाघमारे),’चळवळीचे साहित्यशास्त्र'(नागनाथ कोतापल्ले), परिवर्तन साहित्याची दिशा काय असावी?(माधव पुटवाड), परिवर्तनवादी साहित्य चळवळीची अकरावी दिशा (प्रकाश देशपांडे केजकर), आदी दिग्गज मान्यवर लेखकांनी परिवर्तनाच्या संदर्भातील विविध विषयावर प्रकाश टाकला आहे. त्याचबरोबर समाज जीवनातबदल घडवून आणण्यासाठी, माणसाला माणूस म्हणून जगू देण्यासाठी परिवर्तन फार महत्त्वाचे असते. परिवर्तन विचारसरणीच्या माध्यमातून लेखक सतत समाजामध्ये संघर्ष करून मुल्य पेरण्याचा प्रयत्न करत असतो.मूल्यांच्या माध्यमातूनच व्यक्तीची आणि समाजाची जडण-घडण होत असते. त्यामुळे परिवर्तन फार महत्त्वाचे असते.अशा विविध विषयावरील लेखणीने पहिल्या विभागात’परिवर्तन संकल्पना’ योग्य पद्धतीने मांडली आहे.
साहित्यातील विविध प्रवाह आहेत मग ते वीरशैव, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, सत्यशोधकीय साहित्य, दलित साहित्य, आंबेडकरी साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, बालकुमार साहित्य, मुस्लिम साहित्य अशा विविध साहित्य प्रकारातून परिवर्तनशील विचार कसा जनसामान्यापर्यंत, वाचकापर्यंत पोहोचला आहे. दुसऱ्या विभागातून’साहित्यातील परिवर्तनाचे स्वरूप’या प्रकरणात अविनाश आवलगावकर, विश्वनाथ शिंदे, यशवंत मनोहर, महावीर जोंधळे, सुधाकर शेलार, आसाराम लोमटे, महेश खरात, दत्ता भगत, विनायक तुमराम, छाया महाजन, सुभाष सावरकर, दादासाहेब मोरे, फ.म. शहाजिंदे व इतर काही साहित्यिक मंडळींनी आपल्या लेखातून परिवर्तन साहित्याच्या संदर्भातील विचार प्रकट केले आहेत. या दुसऱ्या विभागात अनेक लेखकांनी मराठी साहित्यातील विविध वाड्•मयीन प्रवाह, महत्त्वाचे टप्पे, चळवळी याविषयीची चर्चा केलेली दिसून येते.त्यामुळेच साहित्यातील विविध प्रवाहामध्ये झालेले परिवर्तन वाचकाच्या लक्षात यायला लागते. या ग्रंथातील हे प्रकरण अत्यंत महत्त्वाच्या असून वाचकाला, अभ्यासकाला व संशोधकाला उपयुक्त असून दिशादर्शक आहे.बळ देणारे आहे.
तिसऱ्या विभागात मात्र डॉ. वासुदेव मुलाटे यांचे साहित्य, व्यक्तित्व आणि कर्तुत्व याचा आढावा घेऊन माणूस म्हणून त्यांचं असणारे व्यक्तिमत्त्व याविषयीची सविस्तर मांडणी’व्यक्ती आणि साहित्य दर्शन’या तिसऱ्या विभागात शोभा इंगवले, अविनाश सांगोलकर, शंकर विभुते, शिवाजी हुसे, श्रावण गिरी, शंकर वाडेवाले व गणेश मोहिते आदींनी घेतला आहे. डॉ. वासुदेव मुलाटे यांनी विविध ठिकाणी महाविद्यालयात व विद्यापीठातही प्राध्यापक म्हणून नोकरी केली आहे. त्यावेळी त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यांच्या प्रेरणेने अनेक विद्यार्थी लिहू लागले,बोलू लागले. याविषयी डॉ.शोभा इंगवले म्हणतात की,”मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात पीएच्.डी. करत असताना सर या विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यामुळे सरांच्या वरच्यावर भेटीगाठी होऊ लागल्या. संशोधनात मला त्यांचे खूप मार्गदर्शनही मिळाले. तिथेच गुरू-शिष्याचे नाते दृढ झाले. त्यांनी लेखनासाठी मला सतत प्रोत्साहित केले. त्यामुळेच मी काही साहित्य निर्मिती करू शकले. सरांशी झालेल्या प्रत्येक भेटीत मला नवीन शिकायला मिळाले. मराठीचे एक गाढे अभ्यासक, समीक्षक, संशोधक व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मला पाहावयास मिळाले.”म्हणजेच अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचे महत्त्वाचे काम डॉ.मुलाटे सरांनी आहे केले आहे. याविषयीच्या कृतज्ञ अशा भावना या प्रकरणात व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे डॉ. वासुदेव मुलाटे यांची व्यक्तिमत्त्वाची उंचीही लेखाच्या वाचनावरून दिसून यायला लागते.
चौथ्या प्रकरणात संपादक डॉ. रामकिशन दहिफळे यांनी डॉ. वासुदेव मुलाटे यांची दीर्घ अशी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमधून डॉ. दहिफळे यांनी डॉ. वासुदेव मुलाटे यांची लेखनाविषयीची भूमिका, त्यांचे व्यक्तित्व, त्यांचे विचार आणि भूमिका आदीवर चर्चा करून त्यांचे व्यक्तिमत्व उलगडून विविध गुणावर,लेखनावर प्रकाश टाकला आहे. मुलाखत देताना डॉ. वासुदेव मुलाटे म्हणतात की,”धर्माधिष्ठित समाजव्यवस्थेतने त्यांना कनिष्ठ, अस्पृश्य, नीच ठरवणं किंवा माणूस म्हणूनच नाकारणं ही त्यांची दुःखाची ज्वलंत सल आहे. धर्माच्या नावाखाली त्यांचे होणारे शोषण आहेच; पण दारिद्र्य आणि दास्य यात खितपत राहिलेली ही माणसं गावाच्या परिघातील ग्रामीणच आहेत, असे माझे मत आहे.”म्हणूनच त्यांच्या अनेक कथांतून दलित, आदिवासी व भटक्या माणसांच्या जाणिवांच्या काही कथाही त्यांनी लिहिलेल्या दिसून येतात व परिवर्तनाची दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतात.
एकंदरीत’ परिवर्तनवादी साहित्य संकल्पना आणि स्वरूप’हा ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून उत्तम झाला आहे. वाचनीय झाला आहे. त्यामध्ये परिवर्तनाच्या विचाराच्या संदर्भात विविधांगी चर्चा करण्यात आली आहे. याविषयी प्रस्तावनेत डॉ. सतीश बडवे म्हणतात की,”परिवर्तनाच्या संकल्पनेचा चौफेर वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे. डॉ. वासुदेव मुलाटे यांच्या गौरव ग्रंथाच्या निमित्ताने परिवर्तन संकल्पनेच्या चर्चेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.”त्यामुळे तो गौरव ग्रंथ वाचनीय आणि संदर्भीय झाला आहे.

डॉ. सतीश मस्के मराठी विभागप्रमुख, कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर ता.साक्री जि. धुळे 424306 मो. 9423397484

‘परिवर्तनवादी साहित्य: संकल्पना आणि स्वरूप’
संपादक- डॉ. रामकिशन दहिफळे,सहसंपादक- डॉ. शंकर विभुते, डॉ. संतोष देशमुख
स्वरूप प्रकाशन,पुणे
पृ.632, मूल्य-600 रू.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, पानमसाला आणि गुटख्याची तस्करी ; ५ संशयित ताब्यात तर १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; महात्मा गांधी चौक पोलिसांची कामगिरी प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, पानमसाला आणि गुटख्याची तस्करी ; ५ संशयित ताब्यात तर १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; महात्मा गांधी चौक पोलिसांची कामगिरी
आधुनिक केसरी न्यूज  सुधीर गोखले  सांगली : राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू, गुटख्याची कर्नाटक राज्यातून तस्करी करणाऱ्या ६ जणांना...
अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची कोल्हापूर येथे बदली तर नवे अतिरिक्त आयुक्त म्हणून राहुल रोकडे नियुक्त
जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी गावपातळीवरील कार्यकर्ते सक्रिय ; आरक्षणाकडे लागल्या सर्वांच्या नजरा
अज्ञात व्यक्तींनी रवींद्र शिंदे यांच्या फोटोला फासले काळे
भाजपात नेमकं चाललय तरी काय ? बंटी भांगडिया यांच्या बॅनर वर मुनगंटीवार यांच्या फोटोला स्थान नाही.
रत्नपाल जाधव यांच्या कडून पत्रकारांच्या एस.टी.प्रवास सवलतीत सुधारणा होणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 
मिरजेमध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता;  लिंगायत समाज बांधवांकडून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा सत्कार