काँग्रेस पक्षाचा आसुड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला..!
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष खा. प्रा. रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांनी पदभार स्वीकारला
आधुनिक केसरी न्यूज
बालाजी वैजळे
नांदेड : शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व वाढती महागाई यासह असंख्य प्रश्नावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आसुड मोर्चा काढला असून या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार प्रा रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. तत्पूर्वी काँग्रेस पक्षाच्या नवा मोंढा येथील पक्ष कार्यालयात नुतन जिल्हाध्यक्ष खासदार प्रा रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत आपल्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. नवा मोंढा येथील छोटेखानी जाहिर सभेत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र व राज्यातील सरकारवर हल्लाबोल करत पंतप्रधान मोदी यांच्या कारभारावर घणाघाती टीका केली.
काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित जाहीर सभेच्या व्यासपीठावर ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ यशपाल भिंगे, प्रदेश सरचिटणीस अँड सुरेंद्र घोडजकर, डॉ श्रावण रॅपनवाड, रेखा चव्हाण, माजी आमदार हनमंतराव बेटमोगरेकर, ईश्वरराव भोसीकर, जिल्हाध्यक्ष डॉ विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार, माजी जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, कार्याध्यक्ष महेश देशमुख, पप्पु कोंडेकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक नेते मंडळी उपस्थित होते.
नवा मोंढा येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दळभद्री विचार सरणीमुळे देशाची अवस्था बिकट झाली आहे. देशात महागाई वाढली असून त्यांची झळ सामान्य माणसाला बसत आहे. देशात व राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार नसल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंघ होऊन सरकार विरोधात लढा उभारावा तसेच विविध प्रकारचे आंदोलन करून सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी खा. प्रा रविंद्र चव्हाण, माजी आमदार हनमंतराव पाटिल बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, माजी अध्यक्ष राजेश पावडे यांची समयोचित भाषणे झाली.
काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत नुतन जिल्हाध्यक्ष खासदार प्रा रविंद्र, उतरचे जिल्हाध्यक्ष डॉ विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना शुभेच्छा देत सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचा सल्ला दिला.
नवा मोंढा येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापासून आसुड मोर्चाला प्रारंभ झाला. या आसुड मोर्चात शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी हातात बॅनर घेऊन मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत होते. हा आसुड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रा रविंद्र चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ यशपाल भिंगे, अँड सुरेंद्र घोडजकर, माजी आमदार हनमंतराव बेटमोगरेकर, ईश्वरराव भोसीकर, डॉ श्रावण रॅपनवाड, डॉ रेखा चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष अब्दुल गफार अब्दुल सत्तार, कार्याध्यक्ष महेश देशमुख, माजी शहराध्यक्ष माजी महापौर अब्दुल सत्तार, रामदास पाटील सुमठानकर यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "आसूडमोर्चा" द्वारे आपल्याकडे विविध मागण्या मांडत असून त्या पुढील प्रमाणे आहेत. नांदेड जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी, व्यापारी, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला व सर्वसामान्य नागरिक विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. शेतीसाठी आवश्यक खत व बियाण्यांचा तुटवडा, शेतमालाला न मिळणारा योग्य भाव, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किंमती, बेरोजगारी, शासकीय कार्यालयांतील दिरंगाई तसेच विविध योजनांच्या अपुऱ्या अंमलबजावणीमुळे जनतेला मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच NEET तसेच इतर स्पर्धा परीक्षांमधील वारंवार निर्माण होणारा गोंधळ, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव, वाढते शैक्षणिक शुल्क, प्रवेश प्रक्रियेतील विलंब आणि शिक्षित युवकांमधील वाढती बेरोजगारी यामुळे विद्यार्थी व पालक मोठ्या मानसिक, आर्थिक आणि सामाजिक तणावाखाली आहेत. शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी वर्ग देखील या अनिश्चितता, वाढत्या शैक्षणिक खर्च व रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे चितेत असून शासनाने या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे खालील मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देण्यासाठी आज रोजी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानुषंगाने खालील मागण्या बाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या या मोर्चात माजी उपमहापौर आनंद चव्हाण, सुरेश दादा गायकवाड, युवक काँग्रेस पक्षाचे बालाजी गाढे, अतुल पेदेवाड, नगरसेवक सत्यपाल सावंत, नगरसेवक मुन्ना अबास, एकनाथ मोरे, सुरेश हटकर, कार्याध्यक्ष महेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद गुंडले, सुरज शिंदे, गोविंद बाबा गौड, प्रताप देशमुख, शिवाजी पाटील, राजू बोळसेकर, ज्योती कदम श्वेता पाटील, ललिता कुंभार, परमेश्वर कते, जिल्हा प्रवक्ते बापुसाहेब पाटील, भगवानराव मनुरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे, मधुकर दिघे, सचिन टाले, संजय भोसीकर, व्यंकटराव मोरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कांचनगिरे यांचा प्रवेश
सिडको येथील शिवसेनेचे कार्यकर्ते विनोद कांचनगिरे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यापूर्वी कांचनगिरे हे काँग्रेस पक्षाचे सिडको विभागांचे प्रमुख होते. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी विनोद कांचनगिरे यांनी भाजपात प्रवेश केला होता. महापालिका निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारली. त्यावेळी शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी मिळविण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List