बाबरगाव फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रक व स्कुटीच्या धडकेत तिघांचा मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज
गंगापूर : छत्रपती संभाजीनगर–गंगापूर मार्गावरील बाबरगाव फाट्याजवळ शनिवारी (दि. १३ जून) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि स्कुटीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक KA-56-8768 हा कर्नाटकच्या दिशेने जात असताना जालना येथून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेले युवक-युवती स्कुटी क्रमांक MH-20-HU-4407 वरून प्रवास करत होते. बाबरगाव फाट्याजवळ अपघात टाळण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाने वाहन वळविले. मात्र स्कुटी ट्रकच्या मागील चाकाखाली गेल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात महादेव चंद्रकांत घुले (वय ३०, रा. जालना) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मीरा कडूबा पांडव (वय २५, रा. जालना) या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. पवन मुंदडा यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर ट्रक पलटी झाल्याने चालक ट्रकमध्ये अडकला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले; मात्र काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला. मृत चालकाची ओळख राजकुमार देवेंद्र आप्पा (वय ४६, रा. मंगलगी, जि. कर्नाटक) अशी पटली आहे.अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व सागर शेजूळ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेमुळे मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List