घराचा स्लॅब भरताना तरुणाचा तोल जाऊन पडून मृत्यू; पैठण तालुक्यातील पाचोड येथील दुर्दैवी घटना
आधुनिक केसरी न्यूज
पाचोड : पैठण तालुक्यातील पाचोड येथे घराच्या स्लॅबचे काम सुरू असताना एका २४ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १२ जून) दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर परिसरात घडली. प्रदीप मुकेश पिंपळे (वय २४, रा. पाचोड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पिंपळे यांचे कुटुंब मागील सुमारे तीस वर्षांपासून पाचोड येथे वास्तव्यास असून बिगारी व प्लंबिंगच्या कामातून उदरनिर्वाह करत होते. प्रदीप हे आपल्या वडिलांसोबत बांधकाम क्षेत्रातील विविध कामांमध्ये हातभार लावत होते. मागील काही दिवसांपासून पाचोडच्या शिवाजीनगर भागातील संतोष मेहतर यांच्या घराचे स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास प्रदीप पिंपळे हे इतर कामगारांसोबत स्लॅब भरण्याच्या कामात व्यस्त होते. काम सुरू असताना सिमेंटने भरलेला गाडा (हातगाडी) सांभाळत असताना अचानक त्यांचा तोल गेला. स्लॅबच्या कडेला उभे असताना संतुलन बिघडल्याने ते थेट खाली कोसळले. पडताना त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागला. घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि सहकारी कामगारांनी तातडीने धाव घेत प्रदीप यांना उचलून उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी तपासणी करून प्रदीप यांना मृत घोषित केले. ही बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला, ग्रामीण रुग्णालय परिसरात नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणाची नोंद पाचोड पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अण्णासाहेब गव्हाणे आणि ताराचंद घडे करत आहेत.
दहा दिवसांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले
अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेल्या चिमुकलीच्या आयुष्यात वडिलांचे प्रेम मिळण्याआधीच तिच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. प्रदीप यांच्या मृत्यूमुळे पत्नी, नवजात मुलगी आणि संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List