प्रेमजाळ्यात अडकवून तरुणाकडून लाखोंची उकळपट्टी; पैशांसाठी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रकांत पतरंगे
गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी येथे प्रेमसंबंधाच्या आडून एका तरुणाला जाळ्यात अडकवून त्याच्याकडून लाखो रुपयांची उकळपट्टी करण्यात आली आणि मागणी पूर्ण न झाल्याने त्याला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीसह तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला असून या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्रेमसंबंधातून सुरू झाला कट
मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी येथील २६ वर्षीय तरुणाचे २३ वर्षीय तरुणीसोबत काही काळ प्रेमसंबंध होते. काही दिवसांनी त्या तरुणीच्या आयुष्यात दुसऱ्या युवकाचा प्रवेश झाला आणि त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. याच परिस्थितीचा फायदा घेत तरुणीच्या दोन साथीदारांनी मध्यस्थी करण्याचा बहाणा करत पीडित तरुणाला जाळ्यात ओढण्याचा कट रचला.
चॅट व्हायरल करण्याची धमकी; लाखोंची उकळपट्टी
“तुझे चॅटिंग आमच्याकडे आहे. ते सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करू,” अशी धमकी देत आरोपींनी पीडित तरुणावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. बदनामीच्या भीतीने तरुणाने त्यांना पैसे देण्यास सुरुवात केली. या पद्धतीने आरोपींनी आतापर्यंत सुमारे चार लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी १५ लाखांची मागणी
लाखो रुपये मिळूनही आरोपींचे समाधान झाले नाही. त्यांनी पीडित तरुणाकडे आणखी १५ लाख रुपयांची मागणी करत दबाव वाढवला. पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही देण्यात आली.
अडवून मारहाण; जबरदस्तीने कीटकनाशक पाजले
दि. १३ मार्च २०२६ रोजी पीडित तरुण ब्रह्मपुरी मार्गाने जात असताना आरोपींनी त्याला अडवले. त्यानंतर त्याच्यावर बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर शेतीमध्ये वापरले जाणारे कीटकनाशक जबरदस्तीने पाजल्याचा आरोप करण्यात आला आहे. विष पाजल्यानंतर तो बेशुद्ध पडताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
आत्महत्येचा बनाव करण्याचा प्रयत्न
या गुन्ह्याचे स्वरूप लपवण्यासाठी आरोपींनी आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याचेही उघड झाले आहे. पीडिताच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना “बाबा मला माफ करा” असा संदेश पाठवण्यात आला. तसेच विषाच्या बाटलीचा फोटो पाठवून प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नागपूरमध्ये उपचार; मृत्यूशी झुंज
विषप्राशनामुळे तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर ३ एप्रिल रोजी त्याला शुद्ध आली. त्यानंतर त्याने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. या खुलाशामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले.
तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा
पीडित तरुणाच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी श्रेया हेमके, नितीन जोध आणि राजू अंबानी (सर्व रा. आरमोरी) यांच्याविरुद्ध खंडणी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने इतर कुणालाही अशाच प्रकारे जाळ्यात ओढले आहे का याचा तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
‘हनी ट्रॅप’चे वाढते प्रकार चिंतेचा विषय
दरम्यान, सोशल मीडिया आणि मोबाईल चॅटिंगच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार वाढत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List