गिझरच्या विद्युत धक्क्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू; गडचिरोलीत शोककळा
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रकांत पतरंगे
गडचिरोली : शहरातील कारगील चौक परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून घरातील गिझरमधून लागलेल्या विद्युत धक्क्यामुळे एका तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहरात शोककळा पसरली आहे.जयंत मनोहर भांडेकर (रा. कारगील चौक परिसर) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून ते शहरातील प्रसिद्ध “जयंत आटा चक्की” या व्यवसायाचे संचालक होते. मनमिळावू स्वभाव आणि मेहनती वृत्तीमुळे जयंत भांडेकर यांची शहरात वेगळी ओळख निर्माण झाली होती.
बाथरूममध्ये घडली दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे दिवसभराचा व्यवसाय आटोपून जयंत भांडेकर रात्री घरी परतले. त्यानंतर आंघोळीसाठी ते बाथरूममध्ये गेले. याच वेळी गिझरमधून विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. दरवाजा उघडून पाहिल्यावर जयंत भांडेकर हे बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
परिसरात शोककळा
जयंत भांडेकर हे शांत, साधे आणि सर्वांशी जिव्हाळ्याने वागणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. कारगील चौक व मिरची गल्ली परिसरात या घटनेची चर्चा सुरू असून अनेकांनी भांडेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.
विद्युत उपकरणांचा वापर करताना घ्या खबरदारी
ही घटना नागरिकांसाठी सावधगिरीचा इशारा ठरत असून घरातील विद्युत उपकरणांचा वापर करताना योग्य काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
काही महत्त्वाच्या खबरदाऱ्या : घरातील विद्युत वायरिंग जुनी असल्यास तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावीबाथरूममधील गिझर आणि इतर उपकरणांसाठी योग्य अर्थिंग असणे आवश्यकपाणी गरम झाल्यानंतर गिझर बंद करून आंघोळ करणे सुरक्षितओल्या हाताने किंवा ओल्या पायाने स्विचला स्पर्श करणे टाळावेबाथरूममध्ये रबर मॅट किंवा चप्पल वापरणे सुरक्षित ठरतेदरम्यान, जयंत भांडेकर यांच्या अकाली निधनामुळे शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये शोक व्यक्त केला जात असून त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी कुटुंबीयांकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List