गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : मा. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई श्री. चंद्रकांत डांगे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्यस्तरीय भरारी पथक आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय यांच्या कर्मचाऱ्यांनी वैजापूर रोडवरील खोजेवाडी शिवार भागात संयुक्त धाड टाकून गॅस टँकरमधून चालणारी अवैध गॅस चोरी उघडकीस आणली आहे. या यशस्वी कारवाईत एकूण १,२६,८७,०९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धाडीची सुरुवात आणि प्रत्यक्ष छापा : मा. नियंत्रक शिधावाटप यांच्याकडील आदेशानुसार आणि मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे, दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास गंगापूर तालुक्यातील हॉटेल साई यशच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. राज्यस्तरीय भरारी पथक आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने परिसरात अंधारात दबा धरून पाहणी केली असता, दोन एलपीजी टँकरमधून अवैधरीत्या धोकादायक पद्धतीने पाईपच्या सहाय्याने व्यावसायिक गॅस सिलिंडर भरले जात असल्याचे रंगेहात दिसून आले. पथकाने कोणतीही संधी न देता तातडीने छापा टाकून टँकर चालकांना जागीच ताब्यात घेतले.
जप्त मुद्देमाल आणि कारवाई: या धडक कारवाईत खालील मुख्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन एलपीजी टँकर: क्रमांक MH-43-CK-5921 आणि MH-43-CK-5747 (किंमत प्रत्येकी ५२.९५ लाख रुपये, एकूण १.०५ कोटी).एलपीजी गॅस साठा: दोन्ही टँकरमधील अंदाजे ३५,२२० किलो गॅस (किंमत २०.०४ लाख रुपये).गॅस सिलिंडर: व्यावसायिक वापराचे १७ भरलेले आणि ६ रिकामे सिलिंडर, तसेच काही घरगुती आणि ५ किलोचे छोटे सिलिंडर. इतर साहित्य: टँकरमधून गॅस काढण्यासाठी आणि सिलिंडर भरण्यासाठी वापरण्यात येणारे चार विशेष व्हॉल्व्हचे रबरी पाईप.
पथकातील अधिकारी व कर्मचारी: सदर कारवाई सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. संदीप विश्वनाथ शिंदे यांच्यासह पथकातील सागर सिंगल, हिदायत खान, इरफान पटेल, अमोल कासार, संदीप मोरे, पांचाळ, रामेश्वर लोखंडे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील इतर सहकाऱ्यांनी अत्यंत धाडसाने पूर्ण केली.
गुन्हा दाखल : टँकर चालक श्रीकृष्ण सखाराम दहिफळे, मिराज मो. जैश खान, व्यवसायाचा मालक महेश विष्णू थोरात आणि टँकर मालक श्रीहर छेदी यांच्याविरुद्ध 'जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५' आणि 'एलपीजी पुरवठा व वितरण आदेश २०००' च्या विविध कलमान्वये एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, वाळूज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करीत आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List