एआय : राजकीय प्रचारयुध्दाची नवी रणभूमी!

एआय : राजकीय प्रचारयुध्दाची नवी रणभूमी!

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : कृत्रीम बुध्दीमत्ता अर्थात आर्टीफिशीयल इंटिलेजीयन्स म्हणजेच एआयने आपले जीवन अक्षरश: घुसळून काढले आहे. पाव शतकापूर्वीची डॉट कॉम बूम आणि यानंतरची सोशल मीडियाची लहर आपण सर्वांनी अनुभवली आहे. मी तर डोळसपणे यातून गेलो आहे. मात्र या सर्वांच्या पेक्षा एआयची वावटळ ही अधिक तीव्र आणि भयंकर अशीच असल्याचे दिसून येत आहे. याचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होत असल्याची बाब तर निश्चीत आहेच, पण विविध क्षेत्रांना एआय आमूलाग्र बदलून टाकणार असल्याची चुणूक दिसून येत आहे. आज याबाबत विवेचन ! 

शेखर पाटील : जळगाव

कृत्रीम बुध्दीमत्ता हा माझ्या व्यवसायाचा आणि सोबतच अत्यंत आवडीचा व आत्मीयतेचा असा विषय ! मी नियमीतपणे भरपूर शिकतो, मंथन करतो आणि थोडे लिहतो. माझे आजवरचे लिखाण हे पत्रकाराच्या दृष्टीतूनच होते. अर्थात, एआयच्या प्रसारमाध्यमांवर होणाऱ्या परिणामांबाबतच मी भाष्य करत असे. तथापि, एआयची व्याप्ती इतकी मोठी असतांना एका क्षेत्रावर फोकस करता कामा नये, या हेतूने आता विविधांगी लिखाण होईल हे निश्चीत. तर आज कृत्रीम बुध्दीमत्तेच्या एका जबरदस्त आणि तितक्याच घातक पैलूवर मला भाष्य करावेसे वाटत आहे. 

चार दिवसांपूर्वी बिहार काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्री यांच्यातील काल्पनिक संवाद दर्शविण्यात आला आहे. आता बहुतेक राजकीय पक्ष एआय जनरेटेड व्हिडीओ वापरत असले तरी काँग्रेसच्या व्हिडीओतील आशयामुळे तो वादात सापडला. लागलीच एका दिवसात अपेक्षेनुसार भाजपने याला प्रत्युत्तर देतांना राहूल आणि सोनिया गांधी यांच्यावर एआय व्हिडीओ शेअर केला. यातील आशय देखील खालच्या स्तरावरील असल्याने यामुळेही साहजीकच खळबळ उडाली. आता काँग्रेस आणि भाजप यांची ही कृती नैतिक आहे की अनैतिक ? याबाबत खूप चर्वण सुरू आहे. मात्र महत्वाचा मुद्दा असा की, राजकीय 'प्रोपगंडा वॉर' अर्थात प्रचार युध्द हे आता एआयच्या रणभूमीवर पोहचले आहे की काय ? याबाबत विचार करावा लागणार आहे. 

काळाच्या ओघात प्रसारमाध्यमे जशी बदललीत, तसे राजकीय प्रचारतंत्र देखील बदलले. आधी भित्तीपत्रके, सभा, प्रचार फेऱ्या आदी पारंपरीक प्रचार होत असे. याला मेनस्ट्रीम मीडियातील जाहिराती व बातम्यांची जोड असे. गेल्या दशकाच्या आरंभी सोशल मीडियाने बाळसे धरल्यानंतर राजकीय पक्षांनी याकडे मोर्चा वळविला. 'इंडिया अगेन्स्ट करप्शन'चे आंदोलन, अण्णा हजारेंचे उपोषण आदींमधून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाजमाध्यमांचा समर्पक वापर करून घेतला, आणि यातूनच आम आदमी पक्ष उदयास आला. त्यांनी चांगले यश देखील संपादन केले. 

यानंतर भाजपने सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर करत दिल्लीत व नंतर देशभरातील विविध राज्यांमध्ये सत्ता काबीज केली. मोदीयुगाच्या यशात याचाच मोठा वाटा असल्याची बाब उघड आहे. अन्य राजकीय पक्ष याबाबत आधी थोडे चाचपडले, मात्र ते देखील याचा परिणामकारक वापर करू लागले. आज जवळपास प्रत्येक राजकीय पक्ष हा सोशल मीडियाचा विपुल प्रमाणात वापर करत आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि यानंतर विधानसभा निवडणुकीत समाजमाध्यमे मोठ्या प्रमाणात वापरण्यात आली. तर एआयचा अत्यल्प वापर झाला. या वर्षाच्या सुरवातीपासून एआयच्या वादळाची सुरूवात झाली, आणि अर्थातच राजकीय पक्षांनी याला हातोहात उचलत त्याला प्रचार तंत्राचे आयुध बनविले. काँग्रेस आणि भाजपमधील सध्या रंगलेला वाद हा एआयवरूनच असल्याची बाब ही या दृष्टीने अतिशय उदबोधक अशीच आहे. 

एकीकडे जग एआय युगात प्रवेश करत असतांनाच सोशल मीडिया देखील बदलू लागला आहे. यातील मानवी सहभाग हा दिवसेंदिवस कमी होत चाललाय. आज कुणालाही काँटेंट तयार करून ते समाजमाध्यमांवर शेअर करण्यासाठी स्वत: वेळ खर्च करण्याची गरज नाही. आपल्या वतीने काम करणारे बॉटस वा एजंटस हे अगदी कुणालाही सहजपणे तयार करता येतात. समजा मला एळाद्या विषयावरील पोस्ट तयार करून ती माझा ब्लॉग व फेसबुक, ट्विटरादी मंचावरून शेअर करायची असल्यास हे सर्व काम ऑटोमॅटीक प्रकारात करणे शक्य आहे. तसेच यावर काँमेंट करणे वा प्रतिक्रियांना उत्तर देणे या बाबी देखील स्वयंचलीत प्रकारात होता. तर यालाच व्हिडीओत परिवर्तीत करून याला युट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक व अन्य मंचावर स्वयंचलीत प्रकारे शेअर करण्याची सुविधा देखील आज उपलब्ध आहे. यामुळे सोशल मीडियाचे 'ऑटोमेशन' वाढीस लागले आहे. तर दुसरीकडे काँटेंट निर्मिती देखील विलक्षण गतीने बदलत असून याला अर्थातच एआय कारणीभूत होय

कोणतीही प्रतिमा, व्हिडीओ वा ग्राफीक बदलणे/मॉर्फ करणे आज अगदी चुटकीसरशी शक्य झाले आहे. अलीकडच्या काळात तर एआयच्या मदतीने हुबेहुब डिजीटल प्रतिकृती तयार करता येते. सोबतच व्हाईस क्लोनींग, व्हिडीओ निर्मिती आदी बाबी शक्य झाल्या आहेत. आजवर आपण स्वप्नातही कल्पना करू शकत नाही असे जग उभारण्याची क्षमता एआयमध्ये असून याचाच राजकीय पक्षांनी वापर करण्यास प्रारंभ केला आहे. 

यापुढील काळात याचीच विविध रूपे आपल्याला राजकीय प्रचार युध्दात दिसतील हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिष्याची गरज नाही. आज काँग्रेसने मोदींच्या मातेला काल्पनिक कथानकात तर भाजपने राहूल यांच्या मातेच्या पूर्वायुष्यातील कथित घटनेला एआयच्या मदतीने जीवंत केल्याची बाब ही प्राथमिक स्वरूपाचीच होय. याची अनेक भयंकर रूपे भविष्यात येणार आहेत. इतिहासातील अनेक खऱ्या-खोट्या बाबी आपापल्या विचारधारेतून  दाखविण्याचा नवीन 'ट्रेंड' देखील लवकरच बाळसे धरणार आहे. 

एका व्यापक अर्थाने जसे जगातील सर्व विविध प्रकारचे तंत्रज्ञान हे एआयने बदलले, अगदी त्याच प्रकारात सोशल मीडियातही बदल सुरू झाले आहेत. हे नवीन युग विलक्षण परिणामकारक, आकर्षक, गतीमान आणि अर्थातच खऱ्या-खोट्यातील सीमारेषा ही अधिक धुसर करणारे ठरणार आहे. याच 'नरो वा कुंजरोवा' टाईपच्या युुगात आपण आधीच प्रवेश केल्याचे सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. काँग्रेस व भाजपमधील एआय निर्मित 'व्हिडीओ वॉर' तर क्षुल्लक होय, आगामी काळात या असे अनेक प्रकार  विक्राळ स्वरूपात आपल्यावर आदळणार आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती  महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती 
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : (१५ सप्टेंबर) महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५” अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे...
अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ’ रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी १५० कोटी निधी वितरीत;बीडकरांना पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची भेट
एआय : राजकीय प्रचारयुध्दाची नवी रणभूमी!
मोताळा तहसीलदार दोन लाखांची लाच घेताना पकडला..!
जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडले..!
राज्यात गुटखा बंदी असतानाही शहरात गुटखा आणि खऱ्याची राजरोस विक्री : प्रशासनाचा पाठिंबा कि जाणूनबुजून डोळेझाक
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वतीने निषेध आंदोलन