पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘चांदा ज्योती सुपर 100’ अभ्यासिकेचे उद्घाटन..!
जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : दि.6 ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहून जातात. यावर तोडगा काढण्यासाठी तसेच हुशार विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘चांदा - ज्योती सुपर 100’ अभ्यासिकेचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग मिळणार आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन शनिवारी (दि.5) करण्यात आले. शहरातील ज्युबली हायस्कुलच्या परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. मनपा आयुक्त विपीन पालीवाल, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, अश्विनी सोनवणे, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख आदी उपस्थित होते.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी जिल्हा परिषदेने अतिशय चांगला आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, इयत्ता 11 वीचे 50 आणि इयत्ता 12 वीचे 50 असे एकूण 100 विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीचे मार्गदर्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवण्याची सोयसुध्दा जिल्हा परिषदेमार्फत मोफत आहे. या उपक्रमाचा फायदा नक्कीच जिल्ह्यातील होतकरू आणि मेहनती विद्यार्थ्यांना होईल.
आज या अभ्यासिकेचे उद्घाटन झाले असले तरी, येथील विद्यार्थी पुढील वर्षीच्या जेईई – सीईटी परिक्षेत उल्लेखनीय कामगिरी करतील तेव्हा खरे सार्थक होईल. 100 विद्यार्थ्यांची निवड करताना अतिशय काटेकोरपणे करा. चाचणी परिक्षेद्वारेच निवड व्हावी, कोणाच्याही शिफारसीने विद्यार्थ्यांना अजिबात प्रवेश देऊ नका. या अभ्यासिकेसाठी ग्रामाीण भागातील हुशार आणि चांगले विद्यार्थी निवडले गेले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत केवळ एकच उद्दिष्ट न ठेवता जेईई – सीईटी प्रमाणेच इतरही स्पर्धा परिक्षेचे मोफत मार्गदर्शनसुध्दा या अभ्यासिकेतून मिळण्यासाठी नियोजन करावे, अशा सुचनाही पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या.
तत्पुर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते अभ्यासिकेच्या परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी फित कापून अभ्यासिकेचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी केले. यावेळी विद्यार्थी व इतर पालक उपस्थित होते.
*या मिळणार सुविधा* : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची दिशा ठरविण्यासाठी ‘चांदा – ज्योती सुपर 100’ या अभ्यासिकेमध्ये दर्जेदार कोचिंग व मार्गदर्शन, निवासी व जेवणाची मोफत सोय, अभ्यास साहित्य, समुपदेशन व टेस्ट सिरीज, क्षेत्रभेटी व प्रेरणादायी संवाद.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List