तंत्रज्ञानामुळे मानसिक तणाव वाढला : प्रा.डाॅ.सुरेश मोनी
'एमआयटी एडीटी'त सातव्या आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रारंभ
आधुनिक केसरी
पुणेः तंत्रज्ञानाने सध्या भारतासह जगाला भुरळ घातली आहे. सध्या जगात प्रत्येक महिन्यात नवीन बदल घडतो आहे. बदलाचा हा वेग प्रचंड असून त्याच्याशी जुळवून घेताना लोकांची दमछाक होताना दिसत आहे. एआय सारख्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे सातत्याने माहितीचा भडीमार मानवी मेंदूवर होत आहे. त्यामुळे, त्यातून काय घ्यावं? आणि काय सोडावं? आणि समोर येणाऱ्या मजकूराची विश्वासार्हता आणि सत्यता याबाबत साशंकता असल्याने परिणामी मानसिक तणावात वाढ होत आहे, असे मत बंगळुरू येथील नार्से मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे माजी संचालक प्रा. डाॅ.सुरेश मोनी यांनी मांडले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर महाराज विश्व शांती डोम येथे 'इनोव्हेटिव्ह ग्लोबल टेक्नॉलॉजी ट्रेंड्स' या विषयावर आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. याप्रसंगी, अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डाॅ.एकनाथ खेडकर, 'एमआयटी एडीटी' विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे आदी उपस्थित होते.
डाॅ.खेडकर यावेळी म्हणाले की, पूर्वी पेटंट सादर करण्यात व त्याची नोंदणी होण्यावर चीन, अमेरिका आणि जर्मनी सारख्या राष्ट्रांचे एकतर्फी प्रभुत्व होते. परंतु, बदलत्या काळानुसार भारतीय संशोधकांच्या मेहनतीमुळे पेटंट नोंदणीत आता भारताने आपला दबदबा निर्माण केला आहे. यासह, चॅट जिपीटी, डीपसेक सारख्या तंत्रज्ञानामुळे मानवाचे वाचन कमी व्हायला नको, याची काळजी घ्यावयास हवी, असेही त्यांनी म्हटले.
यावेळी बोलताना प्रा.डाॅ.सुनीता कराड म्हणाल्या, एमआयटी एडीटी विद्यापीठ दरवर्षी ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करते. यंदा या परिषदेचे सातवे वर्ष असून त्यामाध्यमातून आत्तापर्यंत ६०+ स्टार्टअप्स व ३००० हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. यंदा २० हून अधिक विषय घेवून विद्यापीठात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला पुढील तीन दिवस ही परिषद पार पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजेद्वारे सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाॅ.सुनीता कराड यांनी तर आभार डाॅ.मोहित दुबे यांनी मानले. तर डाॅ.स्नेहा वाघटकर व डाॅ.स्वप्निल शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पसायदान द्वारा कार्यक्रमाची सांगता झाली.
तंत्रज्ञानाच्या धोक्यांपासून सावध रहा- प्रा.डाॅ.कराड
यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्रा.डाॅ. मंगेश कराड म्हणाले की, सध्या जगासमोर अनेक आव्हाने आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने भौगोलिकदृष्टा अनेक गोष्टींमध्ये मोठा बदल घडविला आहे. त्यामुळे, जागतिक पातळीवरील या आव्हानांवर विचारमंथन व्हावं यासाठी दरवर्षी ही परिषद भरवली जाते. दिवसेंदिवस बदलणाऱ्या एआय सारख्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करत असताना त्यातील डिफेक सारख्या धोक्यांपासूनही आपण सावध रहायला हवे, असा इशाराही त्यांनी दिला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List