20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली असा कांगावा करणारी आईच निघाली त्या बाळाची मारेकरी.... नोकरी करायची होती, मुल नको होते म्हणुन बाळाला फेकले नदीत..!
आधुनिक केसरी न्यूज
गोंदिया : तालुक्यातील डांगोर्ली येथील 20 दिवसांच्या बाळाचा खून जन्मदात्या मातेनेच केल्याचा धक्कादायक उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे... पोलिसांनी अपहरणाची बनावट तक्रार देणारी आई रिया राजेंद्रसिंह फाये (22) हिला अटक केली असून समाजमनाला चटका लावणाऱ्या या प्रकरणाने गोंदिया जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
रिया फाये हिने रावणवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत मुलगा विराजचे अज्ञात व्यक्तीने अपहरण झाल्याची खोटी फिर्याद सोमवारी दाखल केली होती. तिने तक्रारीत 17 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजता दरम्यान अज्ञात व्यक्तीने घरात घुसून बाळाला पळवून नेल्याचे म्हटले होते. तिच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) अन्वये गुन्हा नोंद केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत तपासाला युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासात या प्रकरणाचा उलगडा केला . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, साक्षीदार चौकशी आणि घटनास्थळाच्या बारकाईने निरीक्षणातून महत्त्वाचे धागेदोरे मिळविले. तपासादरम्यान फिर्यादीचे वक्तव्य वारंवार बदलणे, घटनास्थळी कोणताही पुरावा न मिळणे, घरातील परिस्थितीत संशयास्पद या सर्व कारणांमुळे बाळाच्या आईवरच संशय बळावला. रीयाला ताब्यात घेत कठोर चौकशी करताच व पाेलिसांनी खाक्या दाखविताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.
*‘मला बाळ नको होते’ आरोपी आईची कबुली...*
चौकशी दरम्यान रियाने सांगितले की मला नोकरी करायची होती. बाळ आड येत होतं… पतीने गर्भपात करू दिला नाही…, बाळामुळे घरात अडकून पडेन म्हणून त्याला संपवायचं ठरवलं… 17 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजता घरचे सर्व झोपले असताना तिने मुलगा विराजला उचलले, मागच्या दाराने बाहेर जाऊन थेट वैनगंगा नदीच्या पुलावरून पाण्यात फेकून दिल्याचे सांगितले.
वैनगंगा नदीत शोधमोहीमे दरम्यान विराजचा मृतदेह सापडला
कबुलीनंतर पोलिसांनी तत्काळ नदीकाठी शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेत स्थानिक बचाव पथक, मासेमार व गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी समांतर काम केले. काही तासांच्या प्रयत्नानंतर अखेर वैनगंगा नदीतील पुलाखाली विराजचा मृतदेह आढळला.पोलिसांसह स्थानिक नागरिकही या दृश्याने हादरून गेले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून घटनेचा तपास पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर करत आहेत.....
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List