आधुनिक केसरी विशेष:  जीवन दायिनी श्रीमद् भगवद्गीता!

आधुनिक केसरी विशेष:  जीवन दायिनी श्रीमद् भगवद्गीता!

आधुनिक केसरी न्यूज

            "कोणताही ग्रंथ अथवा वैश्विक विचार हा एखाद्या धर्म, व्यक्ती अथवा देशासाठी मर्यादित नसतो. काळ नित्य प्रवाही असून विश्वाच्या चलन वलनात सर्वत्र समान विचारांचा प्रवाह नित्य वाहत असतो हे विसरून चालणार नाही. त्याच न्यायाने जगात अनेक महान धुरिणांनी अनेक विचार-ग्रंथांची रुजवणूक करून ठेवली आहे. त्यातील एक म्हणजे श्रीमद् भगवद्गीता! जगात विविध धर्म-विचारांच्या अनुषंगाने बायबल, कुराण, बुद्ध आणि त्यांचा धम्म, जेंद अवेस्ता, गुरु ग्रंथ साहिब या विविध ग्रंथांचे अवलोकन केल्यास हे सर्वच ग्रंथ आपापल्या धर्मातील आणि त्या अनुषंगाने वैश्विक जीवन मूल्य अधोरेखित करतांना आढळून येतात. यातीलच एक ग्रंथ म्हणजे श्रीमद् भगवद्गीता होय. इतर सर्वच धर्म ग्रंथांची पार्श्वभूमी विभिन्न असून त्यातील श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथाची निर्मिती ही मोठी क्रांतिकारी आणि सर्वांना थक्क करणारी आहे.
            या ग्रंथाचे कथन म्हणजेच निर्मिती एखाद्या प्रार्थनास्थळी झाली नसून तो प्रत्यक्ष कुरुक्षेत्र या युद्धस्थळी श्रीकृष्ण-अर्जुन यांचा जीवन जगणे-मरणे या विषयावरचा सैद्धांतिक संवाद आहे हे विशेष! प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती प्रश्न-उत्तर धरतीवर झाली आहे. त्यासाठी हा ग्रंथ निर्माण अथवा कथन होतांना कोणताही धर्म अथवा व्यक्ती समोर ठेवून नाही तर संपूर्ण मनुष्य आणि त्याने आपल्या जीवनात विविध प्रसंगी करावयाचे वर्तन या संदर्भाने वारंवार विवेचन आले आहे. त्यामुळे हा ग्रंथ सर्वच माणसांच्या सर्वच प्रश्नांची म्हणजेच संसारिक, अध्यात्मिक, आर्थिक, शैक्षणिक, बौद्धिक, सैद्धांतिक उत्तरे देणारा विश्व कल्याणकारी, जीवनदायिनी ग्रंथ आहे असे म्हणणे वावगे ठरू नये! श्रीमद् भगवद्गीता ग्रंथात कुठेही एका विशिष्ट धर्माचा उल्लेख आढळत नसून ती दैनंदिन संसाराच्या युद्ध क्षेत्रावरील लढाई लढणाऱ्या माणसांना प्रेरित करणारी, वर्तन करायला लावणारी, लढायला आणि प्रसंगी शांत रहायला शिकवणारी ही एक सर्वोच्च कलाकृती आहे!
            श्रीमद् भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्ण-अर्जुन यांचा अलौकिक संवाद! एकूण ७०० श्लोक असलेल्या या संस्कृत ग्रंथातील सर्वच्या सर्व १८ अध्याय म्हणजे मानवी जीवन जगण्याचे अद्भुत तत्वज्ञान विषद करणारा १८ भागांतील नितांत सुंदर ग्रंथ! प्राचीन कालखंडापासून सांप्रत काळापर्यंत अनेक तत्ववेते प्रस्तुत ग्रंथाच्या विषय-आशयाकडे आकर्षित झाले आहेत आणि दिवसेंदिवस या ग्रंथाचे अभ्यासक वाढतच आहेत ही मोठी आनंदाची बाब आहे. या ग्रंथातील विषय मोठा मजेशीर आहे. तो तुमच्या आमच्या रोजच्याच गोष्टींसारखाही आहे आणि जपी-तपी-ऋषी-मुनि-ध्यानी-योगी यांच्या पण कामाचा आहे. या ग्रंथात मूळ ग्रंथ सोडून कालौघात नक्कीच काही श्लोकांची घुसखोरी झाली असावी. या ग्रंथात एकूण चारच पात्र असून त्यांचा एकमेकांशी संवाद होतांना दिसतो. हा ग्रंथ म्हणजे श्री कृष्ण शिष्टाई असफल झाल्यानंतर पांडवांना आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आणि आपले अधिकार परत मिळवण्यासाठी युद्ध करणे क्रमप्राप्त होते. इथेही 'पांडवांनी युद्ध केले नसते तर विनाश टळला असता' असाही एक मतप्रवाह ऐकायला येतो. परंतु कधी कधी आपले अधिकार मिळवण्यासाठी 'नाठाळाच्या माथी काठी हाणावी' लागते. त्याच न्यायाने पांडवांचा मामेभाऊ असलेल्या श्री कृष्णाने या निर्णयाला सहमती दर्शवली असावी. यामुळे या अगोदरही एका लेखात श्री राम आणि श्री कृष्ण हे देव नसून माणूस म्हणून दिव्य काम करणारे महापुरुष आहेत याचे मी प्रतिपादन केले आहे. त्यामुळेच या दोन्ही महान भारतीय नायकांकडून काही चुका सुद्धा घडल्या आहेत हे लक्षात घेणे गरजेचे वाटते. एखाद्याला दैवत्व बहाल केले की; माणूस त्याचे गुण-दोष पहात नाही. त्यामुळे हे दोन्ही महापुरुष होते हेच महत्वाचे!
            अगोदर युद्धाला तयार झालेले पांडव आणि त्यानंतर आपलेच आप्तेष्ट, गुरु समोर युद्धाला तयार आलेले पाहून अर्जुनाला या सगळ्या गोष्टींचा विषाद येतो आणि इथूनच गीतेचा जन्म होतो. आपल्याच लोकांशी युद्ध करायला प्रवृत्त करण्यासाठी श्री कृष्णाला आपला परम शिष्य अर्जुनाला अनेक नीती-तत्वे सांगून क्षत्रिय धर्म निभावायला सांगितले. याशिवाय कुरुक्षेत्रावरील इतिवृतांत कथन करण्यासाठी हस्तिनापूरचे महाराज धृतराष्ट्र दिव्यदृष्टी लाभलेल्या संजयाला विविध प्रश्न विचारून या ग्रंथाच्या प्रश्न-उत्तर भागात समाविष्ट करून घेतलेले आढळून येते. श्रीमद् भगवद्गीता ग्रंथातील सर्वच श्लोक अन त्यातून समोर येणारे तत्वज्ञान हे सार्वकालिक आणि सर्वच मानवांना संसारातील अनेक प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी अत्यंत मोलाचे असे मैलाचे दगड आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
            महान तत्वज्ञ श्री विनोबा भावे आपल्या गीताई ग्रंथात या ग्रंथाविषयी "आपले हे भाग्य आहे की; येथे जेवढे धान्याचे पिक येते त्यापेक्षा जास्त येथे ज्ञानाचे पिक आलेले आहे. बारा चौदा संपन्न भाषा येथे आहेत." एवढा सर्वांगीण आणि समृद्ध ग्रंथ भारतात अन्य कोणताही मिळणार नाही. याचा अर्थ असा की गीता हा केवळ धर्मग्रंथ नसून एक उच्च कोटीतील ज्ञानाचे भांडार असणारा जीवनदायी अमृत ग्रंथ आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गीता हा समत्व बोधाचा ग्रंथ असून यातून अनेक बाबींचे ज्ञान वाचकांना झाल्याशिवाय रहात नाही. येथे तुम्हाला जीवनात लागणाऱ्या ज्ञान, भक्ती, वैराग्य, आनंद, योग, प्राणायाम, ध्यान आणि जीवन जगण्यास मूलगामी लागणारे धैर्य तत्व या ग्रंथात वाचायलाच काय अर्जुनाच्या रूपाने अनुभवायला मिळणार आहे हे महत्वपूर्ण म्हणावे लागेल. शिवाय इथे श्रद्धा सर्वोच्च स्थानी विराजमान असून बुद्धीपेक्षा श्रद्धेला अनन्य साधारण महत्व दिलेले आढळून येते. प्रज्ञा हा आणखी एक गीतेचा अळंकार आपल्याला अनुभूतीत येतो. संपूर्ण गीतेचे तत्वज्ञान प्रज्ञा आणि विवेकावर आधारित असून माणसाला जगण्याचेच काय मरण्याचे सुद्धा सरळ सोपे तत्वज्ञान या ग्रंथात मिळते. गीता ही वाचकांना गरुडासारखे आकाशात मुक्त विहार करायला सामर्थ्य देते त्याच बरोबरीने आपले लक्ष आपल्या घरट्यावर म्हणजेच मनावर ठेवायचे मार्गदर्शन करते.
            सांप्रतकाळी आपण मिडीयाचा भूलभूलैया चक्रव्यूहातून बाहेर येऊन अनेक ग्रंथाचे वाचन-चिंतन-मनन करण्याची वेळ आली आहे. श्रीमद् भगवद्गीता ग्रंथाचा प्रारंभ "ध" अक्षरापासून होऊन "र्म" या अक्षरावर येऊन थांबतो. याचा अर्थ गीता ग्रंथ हा धर्म या एकाच महत्वपूर्ण तत्वाच्या भोवताल फिरते. धर्माच्या अनेक व्याख्या आहेत. धर्म म्हणजे धारणा, गुणधर्म! माणसाचा मूळ धर्म काय आहे? याची उत्तरे या ग्रंथात सापडतात. त्यासाठी माणसाने माणसासोबत माणसासारखे वागणे म्हणजे धर्म! शांती, आनंद, विवेक इत्यादी माणसाची मूलगामी तत्वे असून माणसाने माणसाचा धर्म कसोशीने पालन करून आपल्या सोबतच संपूर्ण विश्वाचे कल्याण कसे होईल? याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. गीतेतील अर्जुनाने विचारलेले प्रश्न आपल्या दैंदिन जीवनात कामी येतात. त्याला दिलेली अनेक उत्तरे आज आपल्या संसारिक प्रश्नांची सोडवणूक करायला सहाय्यभूत ठरतात हे महत्वाचे आहे. त्यामुळेच श्रीमद् भगवद्गीता हा केवळ धर्मग्रंथ नसून ती जीवनदायिनी सरिता आहे. या प्रवाही सरीतेत आपणही डुंबून आपली सर्वांगीण वैचारिक-बौद्धीक तहान भागवून घ्यावी. असे होणे म्हणजेच आज गीता जयंतीदिनी या ग्रंथाचे आपल्या जीवनात महत्व रुजणे होय!
   
 प्रा.डॉ.विठ्ठल खंडुजी जायभाये
कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. 9158064068
(टीप: लेखक हे व्याख्याता, कवी, किर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.)

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

लोकभावना लक्षात घेता बाबुपेठ उड्डाणपुल उद्या 10 ऑक्टोबर ला वाहतुकीसाठी खुला करणार : आ.किशोर जोरगेवार लोकभावना लक्षात घेता बाबुपेठ उड्डाणपुल उद्या 10 ऑक्टोबर ला वाहतुकीसाठी खुला करणार : आ.किशोर जोरगेवार
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : बापूपेठ उड्डाणपुलाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र लोकार्पण अभावी पुल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नाही....
नवरात्रोत्सव विशेष : संघर्षमय जीवनात वाटचाल करणारा प्रवास..!
बंद पडलेल्या एसटी बसवर दुचाकी धडकली ; तीन जण ठार ; वर्दडा फाट्याजवळील घटना…
विधानसभेच्या जागावाटपावर प्रफुल पटेल यांचे मोठे भाष्य.... महायुतीमध्ये जवळपास....
अकोल्यात दोन गटात तुफान राडा; दगडफेक अन वाहनांची जाळपोळ...
वयाच्या साठीत पारंपारिक लोकगितांचे समाजप्रबोधन करणाऱ्या नवदुर्गा..!
अबब... साईबाबांना एक कोटीची सोन्याची पंचारती दान