तेलुगु भाषेतील `ते’ शब्द हिंदी चित्रपटगीताने लोकप्रिय केले....

तेलुगु भाषेतील `ते’ शब्द हिंदी चित्रपटगीताने लोकप्रिय केले....

आधुनिक केसरी न्यूज

गीत आणि संगीत हे आपल्या चित्रपटाचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे आणि कायम राहील. चित्रपटाची कथा कितीही उत्तम असली तरी गीते आणि संगीत नि:संशयपणे कथेची शोभा वाढवितात. काही प्रेक्षकांची पावले चित्रपटाच्या कथेसाठी तर काहींची त्यातील श्रवणीय गीतांसाठी चित्रपटगृहांकडे वळतात. परंतु कधी कधी चित्रपटातील गीतात असे शब्द वापरले जातात की ज्यांचा अर्थ बहुतांशी श्रोत्यांना समजत नाही. पण अर्थ समजलेला नसतानाही लोक ते गीत गातात, गुणगुणतात  आणि संधी मिळाली तर त्यावर तालही धरतात. पूर्वीच्या काळातील असाच एक चित्रपट निर्मिती अवस्थेत असताना त्या चित्रपटाचे संगीतकार आणि गीतकार गीताची जुळवाजुळव करण्यासाठी खंडाळ्याला जात होते. चहासाठी ते मार्गावरील एका ढाब्यावर थांबले.  ढाब्यावर काम करणारा तेलुगु भाषक मुलगा अन्य ग्राहकांकडे लक्ष देण्यात व्यग्र होता.
 तेव्हा त्या संचातील तेलुगु भाषा अवगत असलेला एक संगीतकार टेबलावर थाप मारत तेलुगु भाषेत त्या मुलाला बोलावू लागला. टेबलावर थाप मारताना त्या संगीतकाराच्या तोंडून बाहेर पडलेले ते तेलुगु शब्द ऐकून संचातील एका गीतकाराने एक अशी ओळ तयार केली की तो चक्क त्या चित्रपटाच्या एका गीताचा मुखडाच बनला !
एखाद्या हिंदी चित्रपटातील गीतात तेलुगु शब्दांचा वापर हा काय प्रकार आहे हे प्रथमत: लक्षात येत नाही. परंतु अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक राज कपूर यांच्या `श्री ४२०’ या चित्रपटातील एका गीतात वापरण्यात आलेल्या तेलुगु शब्दांचा किस्सा अतिशय मनोरंजक आहे. `श्री ४२०’ चित्रपटातील एक गीत तयार करण्यासाठी संगीतकार शंकर आणि जयकिशन यांच्यासमवेत त्यांचे गीतकार शैलेंद्र व हसरत जयपुरी असे चौघे खंडाळ्याला चालले होते. अर्धे अंतर पार केल्यावर सगळ्यांनाच चहा व अल्पोपहार घेण्याची इच्छा झाली. काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना एक हॉटेलवजा ढाबा दिसला. ढाब्याच्या बाहेर गाडी उभी करून ते आत गेले. आत ग्राहकांची गर्दी होती. ढाब्याचा वेटर आधी आलेल्या ग्राहकांकडे लक्ष देण्यात मग्न होता. मालकाने त्याला रमय्या अशी हक मारली तेव्हा त्याचे नाव रमय्या आहे हे या चौघांना समजले. या चौघांनी आणखी काही वेळ प्रतीक्षा केल्यावर रमय्या त्यांच्या टेबलाकडे आला. त्याच्याशी थोडे बोलणे झाल्यावर शंकर यांच्या लक्षात आले, की रमय्या तेलुगु भाषक आहे. शंकर यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशमधील; पण शंकर यांचा जन्म हैदराबादेत झाला होता आणि तेथेच ते लहानाचे मोठे झाल्याने त्यांना तेलुगु भाषा अवगत होती. त्यांनी रमय्याला तेलुगु भाषेतूनच चहा आणि अल्पोपहार आणावयास सांगितले आणि चौघे चहा व खाणे कधी येते याची वाट पाहात बसले. पण रमय्या अन्य ग्राहकांमधेच अडकून पडल्याने त्याला बराच वेळ या चौघांसाठी चहा-अल्पोपहार घेऊन येता आले नाही.
चौघेही वाट पाहून पाहून कंटाळले होते. तेवढ्यात शंकर यांनी “रमय्या वस्तावय्या.....रमय्या वस्तावय्या....” (रमय्या लवकर ये) असे गुणगुणण्यास सुरुवात केली. शंकर यांना असे गुणगुणताना पाहून जयकिशन यांनी टेबलावर तबल्यासारखा ताल धरला. शंकर यांना हे दोनच शब्द वारंवार गुणगुणताना पाहून गीतकार हसरत जयपुरी काहीसे वैतागले. ते शंकरना म्हणाले, की या दोन शब्दांवरच अडून बसणार आहात की पुढे काही म्हणणार आहात ? हसरत यांचे हे वाक्य पूर्ण होते न होते तोच गीतकार शैलेन्द्र यांच्या तोंडून अभावितपणे शब्द बाहेर पडले....”मैंने दिल तुझको दिया....!” या दोन्ही ओळी एकत्र करून शंकर गुणगुणावयास लागले तेव्हा आणखीनच छान वाटू लागले. त्यांच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली. या दोन्ही ओळी वाढवीत नेऊन त्यांच्यावर एखादे गीत लिहिले गेले तर फारच सुंदर गीत तयार होईल, असे शंकरना वाटले. तेवढ्यात रमय्याने त्या सगळ्यांसाठी चहा आणि अल्पोपहार टेबलावर आणून ठेवला. चहा आणि अल्पोपहार घेऊन सगळे खंडाळ्याला रवाना झाले.    
चौघेही खंडाळ्याहून मुंबईला परतल्यावर त्या दोन ओळी आणि त्यांना लावलेली चाल राज कपूर यांना ऐकविण्यात आली. ती ऐकून राज कपूर कमालीचे प्रभावित झाले आणि त्यांनी हे गीत त्वरित पूर्ण करण्यास शैलेंद्र यांना सांगितले. या गीतासाठी चित्रपटात एक खास प्रसंग समाविष्ट करण्यासही राज कपूर यांनी संबंधितांना सांगितले. हे गीत लिहीत असताना शैलेन्द्र यांनी आपले गीतकौशल्य पणाला लावून `रमय्या वस्तावय्या’ हे शब्द बदलण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण हिंदीत त्यांना चपखल प्रतिशब्द मिळू शकले नाहीत. त्यामुळे तेलुगु शब्द बदलू नयेत असेच मत सगळ्यांनी व्यक्त केले. अखेर `रमय्या वस्तावय्या’ हे तेलुगु शब्द गीतात जसेच्या तसे वापरण्यात आले. या गीतात वारंवार येणाऱ्या `रमय्या वस्तावय्या’ या दोन शब्दांचा अर्थ  हिंदी चित्रपटाच्या बहुतांशी प्रेक्षकांना भलेही समजला नसेल पण मोहम्मद रफी, लता मंगेशकर, मुकेश आणि सहगायकांनी गायिलेले हे गीत चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाप्रमाणेच गाजले. गल्लीबोळापासून ते घराघरांत गेलेल्या या गीताने हिंदी चित्रपटसंगीत जगतात आपली वेगळी ओळख तर निर्माण केलीच शिवाय ते मैलाचा दगड म्हणूनही परिचित झाले. अिनल तोरणे, तळेगाव दाभाडे, पुणे

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शाळेतील व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू  पिंपळगाव काळे येथील दुर्दैवी घटना शाळेतील व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू  पिंपळगाव काळे येथील दुर्दैवी घटना
आधुनिक केसरी न्यूज  सागर झनके  जळगाव जामोद : तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील सरस्वती आश्रम शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी मोहित अनिल...
जालना–बीड महामार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक; विद्यार्थी व प्रवासी जखमी
अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा नालेवाडीचे सरपंच अरुण घुगे यांची गळफास घेऊन आत्महत्या
बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी आम्ही सज्ज; अनधिकृत शाळांवरही होणार कारवाई: किरीट सोमय्या
वडूजमध्ये ३० लाखांचा बनावट खतसाठा जप्त; पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा
चौदा वर्षीय बालकास  वानराचा कडाडून चावा ;नांदेड येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल
पत्रकार च्या नावाखाली गुटखा तस्करी; बिलोली पोलिसांची धडक कारवाई, ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त