रयत माऊली : लक्ष्मीबाई भाऊराव पाटील

रयत माऊली : लक्ष्मीबाई भाऊराव पाटील

ज्यांच्या त्यागामधून रयत शिक्षण संस्था उभी राहिली असा दातृत्वाचा अखंड वारसा जपणाऱ्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. आदर्श पत्नी कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून लक्ष्मी वहिनी यांच्याकडे पाहिले जाते. लक्ष्मी वहिनी आपले पती भाऊराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्यामुळे भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था उभा करू शकले.एकदा पाहुणे घरी आले.… Continue reading रयत माऊली : लक्ष्मीबाई भाऊराव पाटील


ज्यांच्या त्यागामधून रयत शिक्षण संस्था उभी राहिली असा दातृत्वाचा अखंड वारसा जपणाऱ्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. आदर्श पत्नी कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून लक्ष्मी वहिनी यांच्याकडे पाहिले जाते. लक्ष्मी वहिनी आपले पती भाऊराव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्यामुळे भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था उभा करू शकले.
एकदा पाहुणे घरी आले. त्यांच्या समवेत भाऊराव जेवणाच्या ताटावर बसले होते. पाहुण्यांनी भाऊरावांना प्रश्न विचारला;” तुम्ही काय काम करता?” तेवढ्यात लगेच भाऊरावांचे वडील पायगोंडापंत उत्तरतात; “ काही नाही, दोन टाईम हादडतो आणि गावभर हिंडत राहतो”. भाऊरावांना याचे काहीच वाटले नाही. कारण त्यांच्या वडिलांनी खरी वस्तुस्थिती सांगितली होती. हे पाहुण्यांना जेवण वाढणाऱ्या लक्ष्मी वहिनींच्या कानावर आले. हृदयामध्ये घालमेल सुरू झाली. आपल्या पतीचा पाहुण्यांच्या समोर सासरेबुवांनी केलेला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला त्यांच्या डोळ्यात आसवं जमा झाली. भाऊरावांच्या ताटात पोळी वाढताना ते आश्रु भाऊरावांच्या ताटात पडली. भाऊरावांनी पत्नीकडे पाहिलं. लक्ष्मी वहिनीचे डोळे आसवांनी डबडबले होते. मनाचा स्वाभिमान जागा झाला. भरल्या ताटावरून उठले. मनात शपथ घेतली. काहीतरी काम करणार मगच घरी येणार. भाऊराव तडक साताऱ्यामध्ये गेले.जिथे स्रीच्या डोळ्यात आसव आली तिथे रामायण घडले .जिथे स्रीच्या डोळ्यात अश्रू आले तिथे महाभारत घडले. पण इकडे आमच्या लक्ष्मी वहिनीच्या डोळ्यातील आसवांनी भाऊरावांचा स्वाभिमान जागा होऊन नवनिर्मिती घडविणारी रयत शिक्षण संस्था उभा राहिली.
सातार्‍यात जाऊन शिकवण्या घेणाऱ्या भाऊरावांना चांगली फी मिळत होती.परंतु त्यांचे मन त्यामध्ये रमेना.त्यांना त्या बहुजन समाजातील लेकरांच्या जीवनाचे सोने करण्यासाठी शिक्षण संस्था उभा करायची होती. कोणत्याही यशस्वी पुरुषांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणारी स्री असावी लागते .आमच्या कर्मवीर अण्णांच्या पाठीशी सावलीसारखी माझी लक्ष्मी वहिनी उभा राहिली. म्हणूनच बहुजनांच्या ,गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, वंचितांच्या घरामध्ये ज्ञानगंगा पोहोचली.
जाती-धर्माचे सोवळे-ओवळे जपणाऱ्या लक्ष्मी वहिनी होत्या.परंतु भाऊरावांनी सुरू केलेल्या वसतीगृहा मध्ये अठरापगड जाती ,धर्म,पंथाची मुले शिक्षण घेत होती .त्या मुलांच्या मध्ये लक्ष्मीआई इतक्या रमून जात की जाती धर्माचं पांघरून कधी गळून पडले.त्यांना समजलेच नाही.एकदा वसतिगृहाला भेट देण्यासाठी पाहुणे आले होते .पाहुण्यांनी लक्ष्मी वहिनी ला प्रश्न केला काहो, वहिनी तुम्हाला मुले किती?ते ऐकल्यावर लक्ष्मी वहिनींनी वसतिगृहातील मुलांकडे हात करून सांगितले; “ही सगळी मुले माझीच आहे”. किती हा मनाचा मोठेपणा!!.. स्वतःचा तो बाबुराव व दुसऱ्याचे ते कारटे ! अशी स्वार्थी भावना असलेल्या समाजाला दिलेली फार मोठी ही चपराक आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते ;”कर्ण लाजुनी विचारी माझी माऊली बघून अरे आभाळाएवढे हिला कुणी दिले मन”.
भाऊराव रयत शिक्षण संस्थेच्या कामानिमित्त व शिकणाऱ्या मुलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सतत फिरतीवर असत. अशा वेळी वसतिगृहातील मुलांना आई-वडिलांचे प्रेम देण्याचे त्यांचे पालन पोषण करण्याचे सर्व काम लक्ष्मी वहिनी विनातक्रार चोखपणे पार पाडत असत. ज्यावेळी लक्ष्मी वहिनी व भाऊराव यांचे लग्न झाले होते तेव्हा लक्ष्मी वहिनींना शंभर तोळे सोने माहेराहून भेट म्हणून दिले होते. बहुजनांच्या लेकरांना शिक्षण देण्याचा वसा उचलणाऱ्या भाऊरावांना ज्या वेळी अडचण येत होती त्या त्या वेळी या लक्ष्मी वहिनीने तिचा एक दागिना सावकाराकडे मोडून मिळणाऱ्या पैशांचा मधून गोरगरिबांच्या लेकरांना ज्ञान दानामध्ये अमूल्य योगदान दिले आहे. लक्ष्मी वहिनींचे भाऊ आपल्या बहिणीला भेटायला आले. त्यांनी पाहिलं जिला सोन्यानाण्याने मढवून लक्ष्मी सारखी आपण पाठवले होते. त्या आपल्या बहिणीच्या अंगावर दागिनाच दिसत नाही .अशावेळी लक्ष्मी वहिनींचा भाऊ कर्मवीरांना म्हणतो; “ भावराव तुम्ही आमच्या बहिणीला लंकेची पार्वती करून टाकले” .भाऊरावांनी मान खाली घेतली. तेव्हा तडक लक्ष्मी वहिनीने आपल्या भावाला खडे बोल सुनावले. माझा सर्वात मोठा दागिना म्हणजे भाऊराव आहेत! त्यांच्यापुढे सर्व तुच्छ आहे.याला म्हणतात पतीवर असणारी निष्ठा व त्यांच्या कामात असणारे अमूल्य योगदान. हे आज या स्वार्थी जगात समजण्याची गरज आहे.
संक्रांतीच्या दिवशी मुले उपाशी झोपू नयेत म्हणून या माऊलीने स्वतःचा सौभाग्याचा अलंकार म्हणजेच स्वतःचे मनी मंगळसूत्र सावकाराकडे मोडून टाकले. त्या पैशामधून दुसऱ्याच्या लेकरांना गोड घास खाऊ घातला. म्हणून म्हणावेसे वाटते ;”गरिबांच्या लेकरांसाठी विकी सारे सोने-नाणे, सौभाग्याचा अलंकार तिने टाकला विकून ,अरे.. आभाळाएवढे हिला कोणी दिले मन..” याला म्हणतात दातृत्व.. अरे! कबूतराचे पंख काढा. त्याला जोडा गरुडाचे पंख आणि आदेश द्या कबुतराला की घे गगन भरारी. तो कबूतर गगन भरारी घेऊ शकत नाही. कारण ते सामर्थ्य पंखात नसते ते सामर्थ्य रक्तात असावे लागते. आज कोणी कितीही दातृत्वाची वल्गना करायला लागला तरीही तो भाऊराव व लक्ष्मी वहिनी होऊ शकत नाही. कारण ते सामर्थ्य रक्तामध्ये असावे लागते.
वसतिगृहातील कोणत्याही मुलाला काहीही कमी पडणार नाही याची दक्षता लक्ष्मी वहिनी घेत असत. एखादे लेकरू आजारी पडल्यास रात्रभर त्याच्या उशाशी बसून त्याचे डोके व हात-पाय दाबणारी आमची लक्ष्मी आईच होती. पत्नीच्या आपल्या कार्यात देत असलेल्या योगदानामुळे भाऊराव निश्चिंत होते. एकदा भावुक होऊन अण्णा लक्ष्मी वहिनीला म्हणतात ;”आपल्या संसारात मी तुला सुख देऊ शकलो नाही. तू लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरात आलीस. म्हणून मी बहुजनांच्या लेकरांसाठी रयत शिक्षण संस्था सुरू करू शकलो. मी तुला काहीच देऊ शकलो नाही. पण आज मी तुला वचन देतो. रयत शिक्षण संस्थेमधून मुलांच्याच प्रमाणे मुलींनाही समानतेने शिक्षण दिले जाईल”. ते वचन भाऊरावांनी शेवट पर्यंत पाळले. आजही रयत शिक्षण संस्थेच्या शाखांमध्ये जा तिथे मुलांच्या बरोबरीने मुलींनाही ज्ञानदान करण्याचे पवित्र काम केले जाते.
वसतगृहाचा डोलारा सांभाळताना, भाऊरावांनी उभा केलेला संसार जपत असताना लक्ष्मी वहिनींना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यास ही उसंत मिळत नव्हती. त्या आजारी पडल्या. आजार बळावला. डॉक्टरांच्या औषधोपचाराला वहिनींचे क्षीण झालेले शरीर साथ देत नव्हते. भाऊराव वहिनींच्या शेजारी बसले होते. वहिनींचे डोके आपल्या मांडीवर घेऊन लक्ष्मीला धीर देत होते. पण आता आपण जगूच शकणार नाही याची जणू पुसटशी कल्पना लक्ष्मी आईला आली होती. त्या क्षीण आवाजात अण्णांना म्हणतात;” उद्या पाडव्याचा सण.जर आज माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले .तरीही उद्या वस्तीगृहातील लेकरांना गोड जेवण खाऊ घाला. आई-बाबाच्या प्रेमाला पारखी झालेली ती लेकर आहेत .माझ्यानंतर या लेकरांना आईचे प्रेम तुम्ही द्या. मला वचन द्या. माझ्या पार्थिवाला खांदा ही विविध जाती धर्माची लेकर देतील”. अण्णांच्या डोळ्यात पाणी आले.खोटी आशा दाखवून ते लक्ष्मीला धीर देत होते. बोलण्यापासून थांबवत होते . वसतिगृहातील मुलांना वहिनींची अवस्था समजल्यावर प्रत्येक जण देवाला धावा करीत होता की आमची वहिनी जगू दे.. आमची आई आमच्यापासून हिरावून नकोस.. पण तो देवही निष्ठूर झाला व आमची माऊली काळाच्या पडद्याआड झाली. माणूस किती वर्षे जगला हे महत्त्वाचे नाही तर तो कसा जगला आणि त्याच्या जगण्यामुळे किती जणांच्या आयुष्याची सोने झाले . यावर त्या व्यक्तीचे कर्तृत्व समजते. आमची लक्ष्मी वहिनी यांना केवळ 36 वर्षांचे आयुष्य लाभले. पण या अल्प कालावधीमध्ये कित्येक बहुजन, गोरगरीब, शेतकरी ,कष्टकरी, लेकरांच्या जीवनाचे मात्र त्यांनी सोने केले या महामातेला स्मृतिदिनानिमित्त त्रिवार वंदन.
प्रा.प्रशांत जालिंदर खामकर रयतसेवक तथा व्याख्याते, बहि:शाल विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आ.डॉ.संजय कुटे यांना मातृ शोक, उर्मिला कुटे यांचे दुःखद निधन आ.डॉ.संजय कुटे यांना मातृ शोक, उर्मिला कुटे यांचे दुःखद निधन
आधुनिक केसरी न्यूज शेगाव : दि.१ जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ.संजय कुटे यांच्या आई उर्मिला श्रीराम...
बनावट नोटा करणारी टोळी पकडली ८८लाखाचा मुद्देमाल जप्त 
दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा शोध व सुटका
लवकरच एसटीचे रिटेल किरकोळ इंधन विक्रीत पदार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती..!
पलूस येथे बनावट सोने गहाण ठेवून स्टेट बँकेची फसवणूक,सहकार क्षेत्रात खळबळ..!
मानवत पोलिस स्टेशनवर मुक मोर्चा, माझ्या पप्पाच्या खुन्याला कधी पकडणार : गायत्री पवार
नाथसागराचे १८ दरवाजे  उघडले ; पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी