संत तुकाराम बीज विशेष:शब्दसाधनेचे ‘आनंदयात्री ‘ संत तुकोबाराय !
-ह.भ.प.प्रा.डॉ.विठ्ठल खं.जायभाये (व्याख्याता, कवी, कीर्तनकार, समीक्षक, लेखक, योग-प्राणायाम प्रशिक्षक)कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठजि. परभणी (महाराष्ट्र)मो. ९१५८०६४०६८ जीवन संघर्ष आणि संसारासह परमार्थाची अखंड तपश्चर्या करून, आनंदी जगण्याचे अवघड जीवन तत्व सोप्या भाषेत सामान्यजनांना मुक्त वाटप करणारे शब्द्साधनेचे आनंदयात्री म्हणजे संत तुकोबाराय ! तुकोबा येथील मातीत एव्हढे एकरूप झाले कि; त्यांनी येथील मातीलाच शब्द-सुवर्णकांचनाने सुशोभित, सुगंधित केले !… Continue reading संत तुकाराम बीज विशेष:शब्दसाधनेचे ‘आनंदयात्री ‘ संत तुकोबाराय !
-ह.भ.प.प्रा.डॉ.विठ्ठल खं.जायभाये
(व्याख्याता, कवी, कीर्तनकार, समीक्षक, लेखक, योग-प्राणायाम प्रशिक्षक)
कै.रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ
जि. परभणी (महाराष्ट्र)
मो. ९१५८०६४०६८


जीवन संघर्ष आणि संसारासह परमार्थाची अखंड तपश्चर्या करून, आनंदी जगण्याचे अवघड जीवन तत्व सोप्या भाषेत सामान्यजनांना मुक्त वाटप करणारे शब्द्साधनेचे आनंदयात्री म्हणजे संत तुकोबाराय ! तुकोबा येथील मातीत एव्हढे एकरूप झाले कि; त्यांनी येथील मातीलाच शब्द-सुवर्णकांचनाने सुशोभित, सुगंधित केले ! महाराष्ट्राच्या मराठी मातीला आणि येथील सृजन संस्कृतीला आपल्या अलौकिक शब्दसामर्थ्याने ललामभूत करून मानवी क्षुद्र जगण्याला अमरत्व प्रदान केले ते केवळ तूकोबांनीच ! हा महाकवी म्हणजे मानवी हृदयाची स्पंदनं मोजणारा आणि चितारणारा जणू ईश्वरी वरदानप्राप्त चित्रकारच ! लोककवी तुकोबांचे जीवन आणि त्यांचे वाङ्म य याचे सिंहावलोकन केले असता ते जे जगले तेच बोलले. अगदी त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर, "अनुभवं आले अंगा, ते या जगा देत असे" असे लिहून लोकांना आपले अनुभवविश्व उलगडून दाखवतात. प्रत्येक शब्द जिवंत करतांना तुकोबा आपला एक एक अनुभव खर्ची घालतांना स्वतः आनंदाचे डोही डुंबून जातातच आणि सोबत आपल्या वाचक-श्रोत्यांना आपल्या संगतीने आनंदाचे अखंड स्नान करायला भाग पाडतात. तेराव्या शतकांत संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर या महान संतद्वयांनी आपल्या कीर्तन, भजन आणि प्रबोधनाच्या ताकदीवर सर्वसमावेशक अशा वारकरी संप्रदायाला नवसंजीवनी देऊन लोकाभिमुख केले. वर्णव्यवस्थेच्या जोखडात असलेला वारकरी संप्रदायाचा हा भक्तीरूपी अमृतकुंभ सामान्य जणांसाठी खुला करून नवक्रांतीची दैदिप्यमान रुजुवात केली. मधला काही काळ खडतर असतांना सतराव्या शतकांत संत तुकारामांनी आपल्या घरातील अनेक पिढ्या चालू असलेली वारी, भजन-कीर्तन परंपरा पुनुरुज्जीवीत करण्याचे महत्कार्य केले. यासाठी
माझ्या वडिलाची मिरासी गा देवा । तुझी चरणसेवा साधावया॥
हा अभंग याचीच साक्ष देतो. तत्कालीन परिस्थिती उपदेश आणि लोकजागृतीसाठी फारसी पोषक नव्हती. संत तुकोबांचे जीवनही मोठे खडतर आणि वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जाऊन तावून सुलाखून निघाले. मोठा भाऊ संसारात न थांबल्यामुळे तुकोबांना कमी वयात घर-संसाराकडे लक्ष द्यावे लागले. कमी वयात खांद्यावर संसाराचे ओझे आणि दुसरीकडे भक्ती मार्गांत अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणे हे तुकोबांना चिंतनशील बनवत गेले. अगदी याच अवस्थेचे हुबेहूब चित्रण तूकोबांनी
बरा कुणबी झालो । नाही तरी दंभे असतो मेलो ॥
अभंग लिहून समकालीन कर्मकांड आणि वर्णव्यवस्थेने गांजलेल्या व्यवस्थेवर सडेतोड भाष्य करून आपल्या अंतरीच्या वेदनेला वाट करून दिली. इथे तुकाराम अगदी कमी वयात प्रगल्भ झालेले दिसून येतात. ज्ञान, संतसेवा, गर्व, दुराभिमान, दंभ इत्यादी गोष्टींचा त्यांना लवकरच प्रत्यय आला हे विशेषच म्हणावे लागेल.
संत तुकारामांचा संसार आणि परमार्थ हातात हात घालून चालत होते. त्यांचे अभंग आणि जीवन प्रसंग एकमेकाचे सांगती असलेले दिसून येतात. Literature is the mirror of Life प्रमाणे तुकोबांचे अभंग-वाङ्मय जीवनानुभवांचेच चित्रण आढळून येते.
पहा न्याय कमळीणीचा । शोध न करी जीवनाचा ॥
आणि असेच संसारिक अनुभूतींचे अभंग त्यांची कमी वयातील प्रगल्भ विचारक्षमता प्रकट होतांना अधोरेखित होते. जेमतेम सतरा वर्षे वयात आईं-वडिल आणि पहिल्या पत्नीचा मृत्यू, दुष्काळ इत्यादी एकावर एक संकटाच्या श्रुंखलांनी तरुण तुकोबांना अवेळी प्रौढत्वाची भूमिका पार पाडण्याचे सामर्थ्य सिद्ध करावे लागले. संसारातील संकटे, दुष्काळ आणि त्यात व्यापार-उदीम चालवणे हे तुकोबांना मोठे आव्हानात्मक झाले. त्यांच्या जीवनातील ह्या विपत्ती त्यांना वैराग्य-विरक्त विचार करायला प्रवृत्त कर्त्या झाल्या.
अनुतापे तुझे राहिले चिंतन । झाला हा वमन संसार॥
असे अभंग लिहून तुकोबा मोकळे झाले. त्यांची जीवनानुभूती त्यांच्या अभंगाद्वारे सहजतेने बाहेर पडतांना मानवी संसार आणि जगण्याचे मूलगामी सूत्र ते सहजतेने लिहून जातात. संत तुकोबा हे लगेच संतत्वाला गेले नाही. सामान्य कुटुंब चालवणारा तरुण तुकाराम ते संत तुकाराम यामधील जो अलौकिक प्रवास आहे तोच त्यांच्या अभंगरुपी चरित्रातून व्यक्त होतांना आढळून येतो.
संत तुकारामांना त्यांच्या परिस्थिती आणि अनुभवांनी बहुआयामी जगणे शिकवले ते इतिहासात नोंद घेण्यासारखे आहे. त्यांना सहजतेने आलेला भक्तीचा आणि वैराग्याचा अनुभव म्हणजे संसारात वैतागून आलेला नसून आपल्या डोळ्यासमोर जीवनानुभव आणि त्यानंतर त्यांनी लोकांची बुडवलेली कर्जखते याचा निकटचा संबंध सहजतेने लक्षात येतो. त्यांची अनुभूतीच जगणे बोलत गेली.
सत्य असत्यासी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता ॥
हे लिहता लिहिता त्यांना तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेने जंग जंग पछाडले. त्यांना त्यांचे जीव की प्राण असलेले अभंग बुडवायला लावले असतांना सुद्धा ते आपली भक्ती आणि आत्मविश्वास तसूभरही न ढळू देता लिहितात
बुडविल्या वह्या बैसलो धरणे । केले नारायणे समाधान॥
म्हणजे त्यांचे अभंग लोकोक्ती होऊन तरले. लोकांनी त्यांच्या कीर्तन-भजनातील ऐकलेले जिवंत अनुभव लक्षात ठेऊन त्यांना येऊन कथन केले. त्यांचे अभंग लोकांचे जगणं आणि श्वास झाले.
लोकांना सहज उपदेश करतांना डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्याचे काम संत तुकारामांनी आपल्या अभंगातून केलेले दिसून येते. “हेंदरी शेंदरी दैवते”, “नवसे कन्या पुत्र होती”, “भगवे तरी स्वान,” “वेदांचा तो अर्थ आम्हांसीच ठावा,” “संतांचे ते आप्त नव्हती संत” असे अनेक परखड आणि दांभिक, लोकांना साधू-संतत्वाच्या नावाखाली लुबाडणारे भोंदू उघडे पाडले. याशिवाय तूकोबांनी आपल्या कीर्तनातून सहजतेने उपदेश करतांना पाप-पुण्य सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. भक्ती करण्यासाठी आणि माणसाचा देव होण्यासाठी माणसाने सरळमार्गी जीवन जगले पाहिजे. रंजल्या गांजल्या लोकांना मदत केली, तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न देणे म्हणजे खरी ईश्वरप्राप्ती होय. देव देवळात किंवा प्रार्थना स्थळी नसून तो संपूर्ण चराचरांत वसलेला आहे. देव भेटण्यासाठी जंगलात जायची गरज नाही. माणूस अंतर्बाह्य शुद्ध झाला की तोच देव होतो. तो कुणालाही उपद्रव करत नाही. तो सर्वत्र ईश्वराचे अस्तित्व पाहतो. असे सहज, साधे. सोपे जगण्याचे जीवनतत्व तुकोबा लोकांना सांगून गेले.
आज तुकाराम बीज ! संत तुकाराम महाराजांचा आज निर्वाण दिन. त्यानिमित्त वारकरी संप्रदाय आज संत तुकाराम बिजोत्सव साजरा करीत आहे. संत तुकारामांनी जीवनवादी जगण्याचे अभंग बीज इथे रुजविले आहे आणि त्यावरच हा वटवृक्ष उभा आहे. संत तुकारामांचे निर्वाण कसे झाले (?) या विषयी अनेक मतमतांतरे आहेत. ते सदेह वैकुंठाला गेले अशी वारकरी श्रद्धा आहे तर काही संशोधक त्यांचे टाळ आणि गोधडी कशी खाली राहिली (?) असा प्रश्न उपस्थित करून विचार करायला भाग पाडतात. विवेक आणि विज्ञानवादी विचार केला असता त्यांच्या मृत्युचे गूढ हे गूढच राहतांना दिसते. श्रद्धा किंवा दैवत म्हणून ते जरी सदेह वैकुंठाला गेले असले तरी अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात. शेवटी कोणत्याही वादात न पडता त्यांचे अलौकिक वाङ्मय पावलोपावली सर्वांनाच दिशादर्शक आहे. दररोज एक तरी संत तुकोबांचा अभंग वाचून आपल्या जीवनात कृतीशील बदल करून अनमोल मिळालेला मानवी जन्म आणि देह सत्कारणी कसा लागेल (?) याचा विचार करून आपले जीवन कृतार्थ बनवावे हीच आज बिजेच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज यांना आदरांजली असेल ! जय तुकोबाराय !
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List