आम्हाला घाबरू नका ! आम्ही वाघ नाही !
विशेष संपादकीय ! राज्यपाल, त्यांचे कार्य, व्यवस्थेला त्यांचा होणारा फायदा (तोटा), त्यांचा राजेशाही थाट, सत्तेतली अनावश्यक ढवळाढवळ, ज्या पक्षात आयुष्य घातले त्या पक्षाला गैरमार्गाने झुकते माप देणे.
विशेष संपादकीय
डॉ.प्रभू गोरे , संपादक
राज्यपाल, त्यांचे कार्य, व्यवस्थेला त्यांचा होणारा फायदा (तोटा), त्यांचा राजेशाही थाट, सत्तेतली अनावश्यक ढवळाढवळ, ज्या पक्षात आयुष्य घातले त्या पक्षाला गैरमार्गाने झुकते माप देणे. या व आणखी कितीतरी आपल्याला माहीत नसलेल्या इतर गोष्टी (भानगडी) हा अतिशय महत्त्वाचा आणि संशोधनाचा विषय आहे. यापूर्वी अनेकांनी या विषयाचे संशोधन केले. त्यावर राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे झाली. अनेकांनी शोधपेपरही (इकडून तिकडून शोधाशोध करून, चोरून नव्हे) वाचले. पण राज्यपाल ज्या विद्यापीठाचे कुलपती असतात (कुणाचे नाही, कुलाचे पती) त्या विद्यापीठात जशी संशोधने आणि चर्चासत्रे होतात व लाखोंचा खर्च होतो. पण पेपरात बातम्या येण्यापलीकडे त्यांचा काडीचाही उपयोग होत नाही. तसेच राज्यपाल आणि त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या संशोधनाचे आणि चर्चांचेही झाले आहे. मागे कुणीतरी राज्यपालांना राजकीय पेन्शनर्स आणि राज्यपाल भवनाला वृद्धाश्रम अशी मार्मिक (धार्मिक नव्हे) उपमा दिली होती.ती खरी का खोटी हे तुम्हाला आम्ही कसे सांगणार ? असो..! राज्यपाल हा विषयच या पदासारखा मोठा (खोटा नव्हे). त्यावर किती लिहावे आणि किती लिहू नये. हा विद्यापीठातल्या संशोधनासारखा विषय आहे. आज राज्यपाल चालिसा पठनामागे काल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलेली भीती हे कारण आहे. सध्या ते राज्यस्तरीय वादळी (वादग्रस्त वाचले तर हरकत नाही) दौऱ्यावर आहेत. सत्तेवर आल्यापासून (भाजपला झटका देऊन) कायम शिवसेनेचा वाघ राज्यपाल भवनाला घेरून बसला आहे. त्यांनी नुसते खोकलले तरी पठ्ठ्या डरकाळ्या (कोरड्या) देत आहे. आपण बघतो त्या सर्कसमध्ये वाघ पिंजऱ्यात आणि त्याचा मालक बाहेर असतो. या सर्कशीत उलटे आहे. वाघ बाहेर आणि मालक पिंजऱ्यात आहे. या वाघामुळे राज्यपालांना सध्या कशाचीही भीती वाटू लागली आहे. म्हणूनच त्यांनी ‘मुझे दुनिया में सबसे ज्यादा डर लगता है, ताे वाे मीडियासे!’ असे वक्तव्य केले की काय ? असा प्रश्न आमच्यासह तमाम महाराष्ट्राला (यात जय महाराष्ट्रवालेही आले) पडला आहे. वाघाला (खऱ्या) घाबरणे आम्ही समजू शकतो, पण माध्यमांना ते का घाबरत असतील बरे? याचे संशोधन ते ज्या विद्यापीठाचे कुलपती आहेत, तिथल्या एखाद्या कुलगुरूने (प्राध्यापकांच्या आवाक्याबाहेरचा विषय असल्याने) केले तर अपेक्षित तथ्य सापडेल. तूर्त आमचे महामहीम राज्यपाल महोदयांना एकच सांगणे आहे की, आम्हाला घाबरू नका, आम्ही वाघ नाही !
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List