भिगवण प्रकरण तापलं ! उद्या इंदापूर बारामती दौंड बंदच आवाहन सुट्टीच्या दिवशी प्रतिज्ञापत्र कसं बनवलं ? घनश्याम हाकेंचा सवाल
आधुनिक केसरी न्यूज
भिगवण : निलेश मोरे दि.२२ भिगवण येथे घडलेल्या तरुणी अपहरण प्रकरणाला प्रेमसंबंधाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न होत असला तरी हे सरळसरळ "लव्ह जिहाद” प्रकरण असल्याचा गंभीर आरोप धनगर समाजाचे नेते घनश्याम हाके यांनी केला आहे. तरुणीवर दबाव टाकून धर्मांतर घडवून आणण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. भिगवण पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले.
हाके यांनी सांगितले की, संबंधित तरुणीला जहीर शेख व आयान शेख यांनी पळवून नेल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. घटनेनंतर त्यांनी स्वतः तरुणीच्या आईची भेट घेतली असता, "मुलीचे अपहरण झाले आहे," असे आईने स्पष्ट सांगितल्याचा दावा त्यांनी केला. मात्र पोलिस तपासात मुलीच्या आई व भावाचा जबाब पूर्णपणे नोंदवण्यात आलेला नसल्याने तपास एकतर्फी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. घटना घडण्याच्या अवघ्या १५ मिनिटे आधी संबंधित तरुणीने ज्या युवकासोबत तिचे लग्न ठरले होते त्याला नथ घेतानाचा फोटो पाठवला होता, त्यामुळे अचानक प्रेमसंबंधाचा दावा संशयास्पद असल्याचे हाके म्हणाले. त्यानंतर तरुणीचा हिजाब परिधान केलेला व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्या व्हिडिओमध्ये ती दबावाखाली बोलत असल्याचा आरोप करत, “नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध होते" हा दावा विश्वासार्ह नसल्याचे त्यांनी नमूद केले. "बारा वर्षांची मुलगी प्रेमसंबंध समजू शकते का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
याप्रकरणात तरुणीला धमकावण्यासाठी तिचे फोटो किंवा संदेश वापरले असावेत, अशी शक्यता व्यक्त करत त्यांनी प्रतिज्ञापत्रावरही गंभीर शंका उपस्थित केली. सुट्टीच्या दिवशी तयार केलेले हे प्रतिज्ञापत्र बनावट असून त्यावरील शिक्के व सह्यांमध्ये तफावत असल्याचा दावा त्यांनी केला. काही वकिलांशी चर्चा केल्यानंतर हे शिक्के डुप्लिकेट असल्याचे समोर आल्याचेही त्यांनी सांगितले.
घटनेमागे अजहर शेख नावाच्या माजी सरपंचाच्या नातेवाईकांचा संबंध असल्याचा आरोप करत, त्याच्यावर गंभीर गुन्हे असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच काही लोकप्रतिनिधींचा या प्रकरणाला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी राजकीय हस्तक्षेपाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत पोलिसांना तिचे लोकेशन कसे सापडले नाही, व्हिडिओ कोणी तयार केला व पोलिसांपर्यंत कोणी पोहोचवला, याचा तपास करण्याची गरज असल्याचे हाके यांनी सांगितले. संबंधित तरुणी अद्याप दबावाखाली जबाब देत असल्याचा दावा करत तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची मागणी त्यांनी केली.
सोमवारी इंदापूर दौंड बारामती बंदच आवाहन
दरम्यान, सकल हिंदू समाजाकडून उद्या सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी बारामती, इंदापूर व दौंड येथे बंद पाळण्याची हाक देण्यात आली असून हा निर्णय समाजाच्या सुरक्षेच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “महिला व मुली सुरक्षितपणे फिरू शकतील, यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी," अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणातील मुख्य आरोपींसह त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करून निष्पक्ष तपास करावा, तसेच कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करू नये, असे आवाहनही त्यांनी पोलिस प्रशासनाला केले. भिगवण प्रकरणामुळे सामाजिक सलोखा, महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पुढील तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List