गडचिरोली,कोरची येथे भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला जबर धडक
आधुनिक केसरी न्यूज
कोरची–मोहगाव मार्गावर भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला मागून दिलेल्या जबर धडकेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही भीषण घटना आज सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास कोरचीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर मोहगाव फाट्याजवळ घडली. झेंडेपार गावाजवळ जलसंधारण विभागाच्या वतीने सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या कामासाठी चांदोना येथून सेंट्रींग व लोखंडी साहित्य घेऊन एमएच 40-बी 9573 क्रमांकाचा ट्रॅक्टर जात होता. दरम्यान, हैदराबादहून रायपूरकडे दगडांची चुरी घेऊन जाणाऱ्या CG07-BA-9284 क्रमांकाच्या ट्रकने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टर उलटून त्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
या अपघातात सागर कल्लो (वय 19/20, रा. झेंडेपार/चांदागड) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कैलास कोवे (वय 35, रा. मोहगाव/वाकडी) यांचा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. अपघातात ट्रॅक्टरवरील चार मजूर दबले गेले, तर एक मजूर दूर फेकला गेला.
राजेश गंगबोईर (वय 28, रा. चमरोटोला/चिंचगाव) व प्रदीप नैताम (वय 24, रा. चीचटोला) यांचे हात फ्रॅक्चर झाले असून ट्रॅक्टर चालक पुरुषोत्तम मडकाम (वय 51) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्रथम कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 108 रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी बाहेर असल्याने पोलिस व नागरिकांच्या मदतीने खासगी वाहनातून व नंतर कुरखेडा येथील रुग्णवाहिकेने त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातानंतर ट्रकचालक अभिषेक शर्मा (वय 30, रा. चितवाडा, जि. बलिया, उत्तरप्रदेश) हा घटनास्थळावरून पसार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, कोरची पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून पाठलाग करत संशयित ट्रक अडवून चालकास ताब्यात घेतले. पोलिस तपासात संबंधित चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, डोंगरगाव फाट्याजवळ सर्रास दारूविक्री होत असल्याने अनेक जड वाहनचालक तेथे मद्यपान करून कोरचीमार्गे छत्तीसगडकडे प्रवास करतात. परिणामी बेळगाव घाट परिसरात वारंवार अपघात व वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर अवैध दारूविक्रीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकरणी कोरची पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List