जिवंत असूनही असहाय! कोमात असलेल्या वृद्ध महिलेसाठी बँक ठरली अंतिम थांबा..!
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रकांत पतरंगे
नियम महत्त्वाचे की माणूस? या घटनेने पुन्हा एकदा व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ठळक मुद्दे
▪ कोमात असलेल्या वृद्ध महिलेला बँकेत प्रत्यक्ष हजेरीची सक्ती
▪ स्ट्रेचरवर रुग्णालयातून थेट बँकेत नेण्याची वेळ
▪ घटनेनंतर काही दिवसांतच वृद्ध महिलेचा मृत्यू
▪ बँक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरते
गडचिरोली : गंभीर आजारी व कोमात असलेल्या एका वृद्ध महिलेला केवळ बँकेतून स्वतःची रक्कम काढण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची अट घालण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर काही दिवसांतच संबंधित वृद्ध महिलेचे दुर्दैवी निधन झाले असून, या प्रकारामुळे बँकिंग यंत्रणेच्या असंवेदनशीलतेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
संबंधित वृद्ध महिला गेल्या अनेक दिवसांपासून कोमात होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारासाठी व घरगुती गरजांसाठी बँक खात्यातील रक्कम काढणे आवश्यक असल्याने कुटुंबीयांनी संबंधित बँक शाखेशी संपर्क साधला. यावेळी डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, उपचार अहवाल व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली होती. मात्र, एवढी कागदपत्रे सादर करूनही बँक प्रशासनाने “खातेधारक स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे” अशी भूमिका घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. नॉमिनी, पॉवर ऑफ ॲटर्नी किंवा वैद्यकीय सवलतींचा विचार न करता नियमांचा कठोर आधार घेतल्याने कुटुंबीयांसमोर मोठी अडचण निर्माण झाली.
बँकेच्या या भूमिकेमुळे नाईलाजाने कोमात असलेल्या वृद्ध महिलेला रुग्णालयातून थेट बँकेत आणण्यात आले. स्ट्रेचरवर बँकेत आणलेल्या या महिलेचे दृश्य पाहून उपस्थित नागरिक सुन्न झाले. अनेकांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत बँक प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनेनंतर काही दिवसांतच संबंधित वृद्ध महिलेचे दुर्दैवी निधन झाले. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट होणार असले तरी, या संपूर्ण प्रक्रियेमुळे महिलेला सहन करावा लागलेला मानसिक व शारीरिक त्रास दुर्लक्षित करता येणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारी व अपंग व्यक्तींसाठी बँकिंग व्यवस्थेत अस्तित्वात असलेल्या सवलती व पर्यायी प्रक्रियांचा या प्रकरणात वापर का करण्यात आला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बँक अधिकारी व जबाबदार यंत्रणांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List