माहुर वन विभागाची तत्परता: विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : माहुर तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे गुरुवारी (ता.१९) पहाटे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे. गोकुळ येथील शेतकरी शिवम राजू यमजलवाड यांच्या शेतातील कठडा असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचे शेतकऱ्याला दिसून आले, लगेच घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना देण्यात आली. त्यावरून वनविभागाची टीम,पिंजरा व आवश्यक त्या सुरक्षा साहित्यासह घटनास्थळी दाखल होऊन विहिरीत पडलेल्या बिबट्यावर रेस्क्यू करून वाचविण्यात आले.
तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथील शेतकरी यमजलवार यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पाण्यात असलेल्या दगडावर बसलेला होता. पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा सुरक्षित विहिरीत सोडण्यात आला. बिबट्याला पंधरा मिनिटांच्या आतच सुरक्षित पिंजऱ्यामध्ये घेण्यात आले. वन विभागाने पशुधन विकास अधिकाऱ्यामार्फत बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून घेतली. तो सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्या हा नर असून,तो सुमारे ६ ते ७ वर्षे वयाचा आहे.भक्ष्याचा पाठलाग करताना किंवा पाण्याच्या शोधात तो विहिरीत पडला असावा,असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला.दरम्यान रेस्क्यू करण्यात आलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचे स्थानिक कर्मचारी व परिक्षेत्र कार्यालयात संपर्क साधावा,असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी केले आहे. उपवनसंरक्षक नांदेड मनिषा पाटील व किनवट चे सहाय्यक वनसंरक्षक किरण चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव, सिनखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी व एमएच २९ रेस्क्यू टीम यांना घेऊन सदर बिबट्यास सुखरूप रेस्क्यू केले. सदर रेस्क्यू मध्ये वनपाल मीर साजिद अली, मनोहर कतूलवार, वनरक्षक ज्ञानेश्वर माळेकर, ओम वरकड, संदीप तुपे, राकेश सोपरवर, मसू मजलवाड,वनसेववक वसंता चव्हाण, वसंत कुमारे व तसेच रेस्क्यू टीम चे मोहन मुर्खे, शिवानंद कुटे, श्याम कुटे, सैफ अली शेख, ऋषिकेश कोटावर, विवेक तराडे निलेश मेश्राम, अंकित कोथले, दिनेश पिंपरे जीवन तडसे, सचिन कोकणे यांनी मोलाची कामगिरी बजावली. विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी बघायची गर्दी जमल्याने मॉब कंट्रोल साठी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांना तातडीने पाचारण करण्यात आल्याने अनावश्यक जमलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळू शकले यावेळी त्यांच्या समवेत पोलीस कर्मचाऱ्यांची ही उपस्थिती होती.
हेल्पिंग हॅन्ड टीमच्या मदतीने रेस्क्यू
नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात सक्रिय कार्यरत असलेल्या वन्यजीव प्रेमी संघटना हेल्पिंग हँड याचे प्रतिनिधी घटनेची माहिती मिळताच यवतमाळ वरून गोकुळ गोंडेगाव येथे डेरे दाखल झाले होते.स्थानिक जिल्हा अध्यक्ष मोहन मुरखे यांच्या नेतृत्वात संपूर्ण टीम ने वन विभागाला रेस्क्यूमध्ये सहकार्य केले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List