शिळवणी येथे वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज
देगलूर : तालुक्यातील शिळवणी येथे आज, सोमवार दि. १६ मार्च २०२६ रोजी निसर्गाचा भीषण कोप पाहायला मिळाला. शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने दीपिका संजय राठोड (वय १६ वर्षे) या तरुण मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली असून, यामुळे शिळवणी परिसरासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
सायंकाळच्या सुमारास देगलूर तालुक्यात अचानक पावसाचे वातावरण तयार झाले होते. विजांचा कडकडाट सुरू असताना दीपिका ही शेतात काम करत होती. त्याच वेळी कडाडलेल्या विजेचा भीषण धक्का लागल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.देगलूरचे तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, ही प्राथमिक माहिती असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी आणि शिळवणी येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. ऐन तरुण वयात मुलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणि सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे, नागरिकांनी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू असताना झाडाचा आश्रय घेऊ नये आणि सुरक्षित स्थळी थांबावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List