गेवराई बाजारातून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २३ जनावरांची सुटका; जालना येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
आधुनिक केसरी न्यूज
सोपान कोळकर
बदनापूर : बदनापूर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री (ता. ११) मौजे गेवराई बाजार परिसरात धडक कारवाई करत कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या नेण्यात येत असलेली २३ गोवंशीय जनावरे जप्त केली. या कारवाईत जालना येथील पाच संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक एम.टी.सुरवसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर तातडीने पथक तयार करून रात्री सुमारे ११.४५ वाजता गेवराई बाजारतळात छापा टाकण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच काही संशयित अंधाराचा फायदा घेत पळून गेले.
छाप्यात बाजारातील शेडमध्ये एकूण ११५ गोवंशीय जनावरे आढळून आली. यापैकी ९२ जनावरांबाबत बाजारतळ ठेकेदार वसी अली झेदी यांनी वैध कागदपत्रे सादर केल्याने ती त्यांच्या ताब्यात देण्यात आली. मात्र उर्वरित २३ जनावरे कोणतेही वैध दाखले नसताना, चारा-पाण्याविना व आखूड दोरीने निर्दयपणे बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे ही जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
पंचनाम्यानुसार जप्त २३ गोवंशीय जनावरांची अंदाजित किंमत सुमारे ३ लाख ४९ हजार रुपये आहे. ही सर्व जनावरे पंचासमक्ष रामखेडा येथील गोशाळेत हलविण्यात आली आहेत.या प्रकरणी जावेद शरीफ, नियाजोद्दीन शेख लाल, इलियास अब्दुल रहिम, आवेज अब्दुल गफार आणि रामलाल इंगळे (सर्व रा. जालना) यांच्याविरुद्ध सहायक फौजदार बाबासाहेब जऱ्हाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पो.नि. एम.टी.सुरवसे, स.पो.नि. अविनाश राठोड, पोहेकॉ इस्माईल शेख, स.फौ.बाबासाहेब जऱ्हाड, पो.कॉ.दीपक कराड, पो.कॉ.परमेश्वर ढगे, पो.कॉ. पूनंसिंग गोळवाल, पो.कॉ रियाज पठाण व चालक कुंटे यांनी सहभाग घेतला.
बेकायदेशीर जनावर तस्करीविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरु राहील, असा इशारा पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी दिला.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List