नैसर्गिक अनुदान घोटाळा, 1.30 कोटींचा अपहार करणारा तलाठी प्रवीण सिनगारे अटकेत
आधुनिक केसरी न्यूज
राजेंद्र मोताळे
अंबड प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या अनुदानात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सुमारे 1.30 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तलाठी प्रवीण भाऊसाहेब सिनगारे (वय 36, रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर शासनाने विविध जी.आर. काढून बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. मात्र अंबड व घनसावंगी तालुक्यात अनुदान याद्या अपलोड करण्याचे काम करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थ्यांची नावे समाविष्ट केल्याचे निष्पन्न झाले. तसेच लाभार्थ्यांच्या नावावर जमा झालेली अनुदानाची रक्कम परस्पर परत घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेऊन तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित केली. समितीच्या अहवालानुसार 240 गावांमध्ये सुमारे ₹24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा शासकीय अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 453/2025 अन्वये विविध कलमे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक, जालना यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हे शाखा, जालना करीत आहे. यापूर्वी या प्रकरणात 10 आरोपींना अटक करण्यात आली होती. दरम्यान, चार महिन्यांपासून मोबाईल व ठिकाणे बदलत पोलिसांना गुंगारा देणारा फरार आरोपी प्रवीण सिनगारे धाराशिव जिल्ह्यात सापडल्याने त्याला अटक करण्यात आली. त्याच्यासह आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी व प्रभारी उपअधीक्षक श्री. सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. मिथुन घुगे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List