नांदेडच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा वावर; गावकऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : राज्यात अनेक ठिकाणी बिबट्याचे हल्ले होत असताना लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारात एका बिबट्याचा वावर आढळून आला आहे. एक ऑटो चालक रत्नेश्वरी मंदिरातून खाली येत असताना त्याला रस्त्यावर बिबट्या दिसला. ऑटो चालकानं तत्काळ बिबट्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी केशव वाबळे यांनी घटनेची माहिती घेऊन प्रथमदर्शनी बिबट्याचा वावर असल्याची पुष्टी केली. यानंतर, आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वनविभागानं खात्री केली : वडेपुरी शिवारात आढळलेल्या बिबट्याची खातरजमा करण्यासाठी वन विभागाचं एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं. माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी बिबट्या ज्या खांबाजवळ थांबला होता, त्या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली. तिथं बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळून आले. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची पुष्टी वन विभागाचे अधिकारी केशव वाबळे यांनी केली आहे
गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण : बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झाल्यानं परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अतुल सेन नामक व्यक्तीनं माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या करणे हॉटेलजवळ बिबट्याला पाहिलं. अतुल सेन यांनी तत्काळ त्यांच्या मोबाईलद्वारे बिबट्याचे दोन व्हिडिओ रेकॉर्ड केले. यानंतर सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागासह आसपासच्या सर्व गावांतील पोलीस पाटलांना सूचना देण्यात आली. यानंतर, सर्व गावांमध्ये दवंडी देऊन गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापपर्यंत कोणतंही नुकसान झालेलं नाही. तथापि, आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. विशेषतः शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि गावखेड्यात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभाग आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे परिसरातील तपास सुरू केला आहे. गावकऱ्यांना एकटं फिरू नये, रात्री उशिरा बाहेर पडू नये आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी सहकार्य करावं, असं वन विभागानं आवाहन केलं आहे
नांदेड जिल्ह्यात बिबट्यांच्या वास्तव्याबाबत वन विभागानं बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी (12 आणि 13 मे) विशेष सर्वेक्षण केलं. या पाहणीत जिल्ह्यात एकूण 31 बिबट्या असल्याचं समोर आलं. जिल्ह्यातील एकूण 12 वनपरिक्षेत्रांपैकी 9 वनपरिक्षेत्रांमध्ये बिबट्यांचा वावर नोंदवला गेला.
वनपरिक्षेत्रनिहाय बिबट्यांची संख्या खालीप्रमाणे-
माहूर वनपरिक्षेत्र: 8 बिबट्या (सर्वाधिक)
किनवट वनपरिक्षेत्र: 2 बिबट्या
बोधडी वनपरिक्षेत्र: 4 बिबट्या
अप्पाराव पेठ वनपरिक्षेत्र: 3 बिबट्या
इस्लापूर वनपरिक्षेत्र: 2 बिबट्या
हिमायतनगर वनपरिक्षेत्र: 2 बिबट्या
हदगाव वनपरिक्षेत्र: 1 बिबट्या
भोकर वनपरिक्षेत्र: 4 बिबट्या
नांदेड वनपरिक्षेत्र: 5 बिबट्या
या सर्वेक्षणाची माहिती वन विभागाचे अधिकारी केशव वाबळे यांनी दिली.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List