संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच गुरुचे कर्तव्य : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : दि.१० संस्कारक्षम नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षणाच्या माध्यमातून होत असते.देश आणि समाजासाठी असे संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच आजच्या गुरुचे म्हणजेच शिक्षकांचे कर्तव्य होय,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आज मुख्याध्यापकांची सहविचार सभा आयोजीत करण्यात आली. ‘विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता उपाययोजना’, याविषयावर आज शहर हद्दीतील मुख्याध्यापकांना या सहविचार सभेत मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आश्विनी लाटकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे, मनपा शिक्षणाधिकारी भारत तेलगोटे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन द.वि. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शालेय शिक्षण विभागाच्या दि.१३ मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार मुख्याध्यापक सहविचार सभेत विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता उपाययोना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यात पोक्सो कायदा, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक, अन्न सुरक्षा, शाळेची सुरक्षा, शाळेतील विविध सुरक्षा उपाययोजना, सीसीटीव्ही लावणे, विद्यार्थी व पालकांमध्ये करावयाची जनजागृती, हेल्पलाईन अशा विविध बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, शाळांमध्ये विद्यार्थी केवळ शिक्षण घेत नसतात तर ते संस्कारितही होत असतात. आपल्या देशाचे भावी नागरिक आपण घडवित असतो. शिक्षण देतांना विद्यार्थ्यांवर देशप्रेम, आई-वडील, शिक्षकांचा आदर, महिलांना सन्मानाची वागणूक, तंत्रज्ञान, आरोग्य ,आहार विषयक जागृती याबाबत संस्कार करणे आवश्यक आहे. त्यासाठी संतसाहित्यातील दाखले देऊन संस्कार करावे. सर्व जातीधर्मांचा आदर करणे, धार्मिक सलोखा राखणे अशा विविध बाबींबाबत आपण विद्यार्थ्यांना संस्कारित करावे. विद्यार्थ्याच्या जीवनात त्याच्या शिक्षकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. आई वडीलांनंतर विद्यार्थ्याच्या जीवनात गुरुचे, शिक्षकाचे महत्त्व असते. त्यामुळे संस्कारित विद्यार्थी घडविणे हे गुरुचे कर्तव्य असते,असे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले की, शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होण्यावर प्रतिबंध करण्यात यावा. विद्यार्थ्यांभोवती ड्र्ग्जचा विळखा होण्याचा धोका आहे. त्यामुळे आख्खी तरुण पिढी बरबाद होऊ शकते. याबाबत सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेतली जावी. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी शाळेतील कर्मचारी, स्वयंसेवक व पालकांच्या सहकार्याने वाहतुक व्यवस्थापन करुन विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुक होईल याकडे लक्ष द्यावे. शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. त्यामुळे काही गैरप्रकार घडल्यास त्यावर लक्ष ठेवून नियंत्रण करता येते, असे त्यांनी सांगितले. बालकांसाठी हेल्पलाईन १०९८, पोक्सो तक्रारीची तक्रार पेटी, चिराग ॲप याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करण्यात यावी असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकूंद यांनीही कार्यशाळेस मार्गदर्शन केले. तसेच परिवहन, अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शालेय सुरक्षा उपायांच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. आश्विनी लाटकर यांनी प्रास्ताविक केले.
०००००
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List