चोर घेऊन आलेल्या गाडीमुळेच फसले; पोलिसांची सिनेमा स्टाईल कारवाई, मोठी चोरी टळली
आधुनिक केसरी न्यूज
प्रणव वराडे
लोणार : दि.२० जून २०२५ शहरातील मापारी गल्ली परिसरात चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा पोलिसांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करून पर्दाफाश केला आहे. ही घटना २० जूनच्या सकाळी ३.३० ते ४.१५ वाजेच्या दरम्यान घडली असून पाच चोरट्यांनी एका इर्तिका गाडीमधून शहरात प्रवेश करून शरद लुनीया यांचे किराणा दुकान फोडले. परंतु त्यांच्या गाडीतूनच त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पाच जणांनी शहरातील मापारी गल्लीतील शरद लुनिया यांच्या किराणा दुकानावर लक्ष्य ठेवले होते. रात्रीच्या सुमारास दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील काही रोख रक्कम आणि किरकोळ साहित्य चोरले. चोरटे शहरातील अजूनही इतर दुकाने फोडण्याच्या तयारीत असतानाच गस्त घालणाऱ्या लोणार पोलिसांना संशयास्पद हालचालींचा सुगावा लागला.लोणार पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे, सहा पोलीस निरीक्षक गणेश इंगोले, धनंजय इंगळे, संतोष चव्हाण, आणि त्यांच्या टीमने या चोरट्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. यावेळी चोरट्यांनी आपली इर्तिका गाडी घेऊन घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अत्यंत तात्काळ आणि धाडसी निर्णय घेत चोरट्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. सिनेमा स्टाईलमध्ये काही अंतर चाललेल्या या पाठलागा दरम्यान मेहकर रोडवरील वैभव पेट्रोलियम समोर चोरट्यांच्या गाडीचा अचानक टायर फुटला. त्यामुळे गाडीचा ताबा सुटून ती अपघातग्रस्त झाली.अपघात होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांना शिताफीने अटक केली. यामध्ये पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून त्यांच्याकडून चोरीला गेलेली रोकड आणि साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली इर्तिका गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. प्राथमिक चौकशीत हे आरोपी परजिल्ह्यातील आरोपी
१) कृष्णा सुदाम छोडीदार (वय ३४ रा बोकुड ता पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर)
२) साहेबराव उर्फ बाप्पा पराजी चाळक ( वय ५० वर्ष )
रा खडी रोड , बीड बायपास छत्रपती संभाजी नगर)
३)परमेश्वर अशोक गायकवाड (वय ३० वर्ष रा कुंभेफळ ता जिल्हा छत्रपती संभाजी नगर)असून यापूर्वीही अशा चोरीच्या घटना घडविल्याचा पोलिसांना संशय आहे.या संपूर्ण कारवाईबाबत लोणार पोलिसांनी अचूक माहिती मिळवून वेळेत हालचाल करून शहरात घडणाऱ्या चोरीची मोठी घटना टाळली आहे. पोलीस निरीक्षक मेहेत्रे यांच्या मार्गदर्शना खालील टीमच्या सतर्कतेमुळे शहरातील इतर दुकानांना होऊ शकणारी हानी टळली आहे.
घटनेनंतर शहरात पोलिसांचे कौतुक होत असून व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईबद्दल आभार व्यक्त केले आहेत. अटकेतील चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.लोणार पोलिसांच्या या धाडसी आणि वेळीच केलेल्या कारवाईमुळे शहरात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेवरील विश्वास अधिक बळकट होतांना दिसून येत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List