बहुजन प्रतिपालक : छत्रपती शिवाजी महाराज

बहुजन प्रतिपालक : छत्रपती शिवाजी महाराज

19 फेब्रुवारी हा बहुजन प्रतिपालक, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस.19 फेब्रुवारी 1630 मध्ये पुणे जिल्ह्ययातील जुन्नर शहराजवळ असलेल्या ‘शिवनेरी’ या डोंगरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्याच्या बाजूला बौद्धलेण्यांचा परिसरही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची व त्यांच्या कार्याची ओळख जगभर व्हावी, त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार सर्वसामान्यांपर्यंत व्हावा म्हणून 19 फेब्रुवारी रोजी त्यांची… Continue reading बहुजन प्रतिपालक : छत्रपती शिवाजी महाराज

19 फेब्रुवारी हा बहुजन प्रतिपालक, कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस.19 फेब्रुवारी 1630 मध्ये पुणे जिल्ह्ययातील जुन्नर शहराजवळ असलेल्या ‘शिवनेरी’ या डोंगरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरी किल्ल्याच्या बाजूला बौद्धलेण्यांचा परिसरही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची व त्यांच्या कार्याची ओळख जगभर व्हावी, त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार सर्वसामान्यांपर्यंत व्हावा म्हणून 19 फेब्रुवारी रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व हे दीपस्तंभाप्रमाणे होते ते अनेकांना प्रेरणा आणि स्फूर्ती देणारे आहे. त्यांचा आदर्श प्रत्येक क्षेत्रात कार्य करणारांनी डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनात कार्य करावे असेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीविरुद्ध व मोगलशाहीविरुद्ध संघर्ष करून आपले राज्य स्थापन केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे समतावादी होते. विषमतेला मात्र अजिबात थारा दिसत नाही. शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे,गरिबांचे, शेतकऱ्यांचे व जनसामान्यांचे राज्य होते त्यांनी कधी भेदाभेद किंवा विषमता केली नाही. त्यांच्या राज्यकारभारात सर्व जाती-धर्माची माणसं होती. त्यांच्या सैन्यात महत्त्वाच्या पदावर ही अनेक मुस्लीम होते. अंगरक्षकही मुस्लीम होते. छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रियांचे पाठीराखे होते. आजचा राज्यात स्त्रियांवर जे मोठ्या प्रमाणावर अन्याय,अत्याचार व बलात्कार होतात त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होत नव्हते. दुश्मनांची स्त्रीही सुखी असायची. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते. अठरापगड जातीतील लोकांना संघटीत करून समतेचे राज्य निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. कुळवाडीभूषण,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सगळ्यात पहिल्यांदा महात्मा जोतिराव फुले यांनी प्रचंड मेहनत घेऊन शोधून काढली. त्यावर त्यांनी चरित्र लिहिले. पोवाडाही लिहिला. त्यांचा खरा इतिहास शोधून अभ्यास करून त्यांनी जगासमोर मांडून पहिल्यांदा ‘ शिवजयंती ‘ही सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा जोतिराव फुले गुरु मानत असत. छत्रपती शिवरायांच्या कार्याविषयी नरहर कुरुंदकर म्हणतात, “शिवाजी महाराज अष्टपैलू, अष्टावधानी ,थोर मानवतावादी व संपूर्ण पुरूष म्हणता येईल. असं प्रथमदर्शनी छाप पाडणारं मोठं प्रभावी व्यक्तिमत्व होतं.आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी ,प्रजादक्ष ,परधर्मसहिष्णू ,चारित्र्यसंपन्न दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे कठीण. मुलगा ,पती, बाप, शिष्य इत्यादी संसारी नात्याने देखील घडणारे या महापुरूषाचे दर्शन मन भारून टाकते.राजे धार्मिक होते पण धर्मवेडे व धर्मभोळे नव्हते. व्यवहारी होते पण ध्येयशून्य नव्हते.साहसी होते पण आततायी नव्हते. त्यांना कठोर व्हायला लागत होतं. पण ते क्रूर नव्हते.ताठ नव्हते. नम्र होते. डौलदार होते. वैभव संपन्न अशी त्यांची राहणी असे.पण त्यात उधळमाधळ ,डामडौल नव्हता. कोणताही राजा महाराजांशी त्यांची तुलना करणे योग्य होणार नाही. कारण त्यांनी स्वतः शुन्यातून राज्य कमावले होते व इतराप्रमाणे त्यांना जनानखाना नव्हता. ते उपयोगितावादी असल्याने त्यांनी शोभेच्या डामडौलाच्या मोठमोठ्या इमारती उठविल्या नाहीत, तर आपला खजिना निरनिराळे किल्ले, जलदुर्ग, जहाजे बांधण्यात व त्यांच्या डागडुजीत, तसेच रयतेच्या कल्याणासाठी वापरला.त्यांनी सामान्य जनतेत स्वातंत्र्याची ,स्वराज्याची, राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवली, जी त्यांच्या निर्वाणानंतरही तेवत राहिली.”
भगवान आहिरे नावाचे कवी म्हणतात की,

” राजे तुम्ही दुश्मन वैऱ्याचे खरंच महाकाळ होता गनिमी धूर्त काव्यांचा पोलादी नांगर फाळ होता
पण आमचं काय राजे, सीमेवरती रोज मृत्यू ,
तरी शांततेचं भूत आहे
तुमच्या सारखी राजे ,
अहो आम्हाला कुठे पत आहे.”

या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेऊन प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये वागणे महत्वाचे आहे. आजचा तरुण हा दिशाहीन होत चालला आहे. शुरपणा हरवून बसत आहे. म्हणून अशानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आठवण करून देणे गरजेचे आहे. प्रा. गौतम निकम यांनी संपादित केलेल्या ‘शिवजागर’ ग्रंथात गणेश पवार म्हणतात की, “जिजाऊंच्या प्रेरणेने व संस्काराने शिवरायांची जडणघडण अतिशय सुंदर झाली होती. थोरामोठ्यांचा आदर करणे, स्त्रियांची इज्जत राखणे, गुणी जणांचे कौतुक करणे, उद्दामपणाने वागणा-यांना वेळीच वठणीवर आणणे हे गुण शिवरायांच्या रोमारोमात भरून होते.धाडस, करारीपणा ,दूरदृष्टी, संघटन कौशल्य इत्यादी गुण तर शिवरायांकडे उपजतच होते.”
छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनिती ही अतिशय उत्तम होती. आज घडीला आपल्या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली दिसून येते. महागाई खूप वाढली आहे. देश भयंकर आणि भयानक अशा आर्थिक संकटातून जात आहे. अनेक कंपन्या बंद पडल्या,पडत आहेत, अनेक कामगारांची नोकरी गेल्यामुळे जीवन, संसार उध्वस्त झाले आहेत. जातीयवाद व धर्मांधता प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जनता भयभीत झाली आहे. त्याला इथली शासनव्यवस्था आणि भ्रष्ट अर्थकारण जबाबदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील त्यांच्या अर्थांनीतीचा विचार केला तर ती अर्थव्यवस्था सक्षम अशीच होती. शेती उत्तम चालायची, शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जायचे, करही वेळेवर भरले जायचे, जहाज बांधणी केली जायची, व्यावसायिक कर घेतला जायचा आणि हा आलेला सर्व पैसा सर्वसामान्य जनतेसाठीच खर्च केला जायचा. खरे तर आज आमचे राजकारणी शासनाचा विविधांगी करावा लागणारा खर्च हा वेगवेगळ्या कामासाठी वापरला जातो, इतरत्र वळवला जातो किंवा तो तसाच ठेवला जातो. सामान्य जनतेची मात्र दिशाभूल केली जाते. ही जीवघेणी भयानकता आजची आहे. आमिष दाखवून आणि विकासाच्या नावावर सर्व भकास केले जात आहे.
आजच्या तरुणांना दिशादर्शक ,मार्गदर्शक ठरणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व होते हे ध्यानात घ्यायला हवे. त्याप्रमाणे प्रत्येकाने त्याचे विचार अंगीकारायला हवेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले राजकीय धोरणही सर्वांच्या कल्याणासाठीच होते. राजकीय धोरण करत असताना त्यांनी कधीच कुठल्याही धर्माच्या, जातीच्या किंवा आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी स्वराज्याचा उपयोग कधीच केलेला दिसून येत नाही. सामान्य माणसाला सन्मानाने आणि इज्जतीने कसे जगता येईल, सामान्य माणसांना आपल्या जीवनात कसे उभा करता येईल, त्यांना विविध प्रकारच्या राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर कसे काढता येईल यासाठीच त्यांनी आपल्या सत्तेचा उपयोग केलेला दिसून येतो. हल्ली सत्तेचा प्रचंड दुरुपयोग करून माणसांना विविध गुलामगिरीत लोटणारे अधिक आहेत. आई जिजाऊ च्या मार्गदर्शनामुळेच छत्रपती शिवाजी महाराज युद्धनीती व अनेक किल्ले सर करण्यात यशस्वी झाले.हे आजच्या जातीय, धर्मीय राजकारण करणा-या व जनतेस वेठीस धरणाऱ्या राजकारण्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.
खरे तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण केले जाते. त्यांच्या नावाचा उपयोग करून त्यांनी केलेल्या कार्याच्या विरुद्ध आजचे राजकारणी कार्य करताना दिसतात ही शरमेने मान खाली घालायला लावणारी अत्यंत वाईट गोष्ट आहे. यासंदर्भात गोविंद पानसरे म्हणतात की,”शिवाजीच्या नावानं मुसलमानांवर जसे हल्ले होतात तसेच दलितांवरसुद्धा हल्ले होतात.”जय भवानी, जय शिवाजी”या घोषणा होतात. राखीव जागांना विरोध करणारे”शिवाजी महाराज की जय”म्हणतात आणि हे विसरतात की, शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक आपल्या नोकरीत दलितांना ठेवलं होतं.त्यांना मोठं केलं होतं.”(शिवाजी कोण होता?,गोविंद पानसरे, पृ.६१) त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानना-यांनी, राजकारण करणा-यांनी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांनी वरील कार्याचे सतत स्मरण करून आपले वर्तन व कार्य करणे गरजेचे आहे. केवळ फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे व कृती मात्र त्यांच्याविरोधात करायची हे न शोभणारे आहे.हल्ली देशात जे जातीय आणि धार्मीय वातावरण गढूळ होताना दिसत आहे. त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जातीय,धार्मिक राजकारण केले जाते.ते आता कुठेतरी थांबवायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची जी व्यापक आणि विशाल भूमिका होती ती प्रत्येकाने आपल्या कार्यात आणि आचरणात आणायला हवी.
आजच्या तरुणांना, समाजसुधारकांना, राजकारण्यांना दिशादर्शक ,मार्गदर्शक ठरणारे, प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व होते हे ध्यानात घ्यायला हवे. त्यांचे नुसते नाव घेऊन उपयोगाचे नाही तर कृती करणे महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाने त्याचे विचार मनी अंगीकारायला हवेत.

प्रा. डॉ. सतीश मस्के
मराठी विभागप्रमुख,
कर्म. आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर ता. साक्री जि धुळे 424306
मो.9423397484

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आ.डॉ.संजय कुटे यांना मातृ शोक, उर्मिला कुटे यांचे दुःखद निधन आ.डॉ.संजय कुटे यांना मातृ शोक, उर्मिला कुटे यांचे दुःखद निधन
आधुनिक केसरी न्यूज शेगाव : दि.१ जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ.संजय कुटे यांच्या आई उर्मिला श्रीराम...
बनावट नोटा करणारी टोळी पकडली ८८लाखाचा मुद्देमाल जप्त 
दोन वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा शोध व सुटका
लवकरच एसटीचे रिटेल किरकोळ इंधन विक्रीत पदार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती..!
पलूस येथे बनावट सोने गहाण ठेवून स्टेट बँकेची फसवणूक,सहकार क्षेत्रात खळबळ..!
मानवत पोलिस स्टेशनवर मुक मोर्चा, माझ्या पप्पाच्या खुन्याला कधी पकडणार : गायत्री पवार
नाथसागराचे १८ दरवाजे  उघडले ; पाणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी