माझ्या प्रकाशन संस्थेचे जन्मदाते : प्रा. सुरेश पुरी
आधुनिक केसरी
- वैजनाथ वाघमारे ,शब्दवेध बुक हाऊस (प्रकाशन) ,औरंगाबाद.
मो- ८६३७७८५९६३
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड विद्यापीठाच्या जर्नालिझम विभागाचे माजी प्रमुख प्रा. सुरेश पुरी सर हे आज ७३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या मदतीस उजाळा देणारा हा लेख इथे आम्ही प्रकाशित करत आहोत. - संपादक
एमजीएम कॉलेजला शिपाई म्हणून काम करत होतो. त्यावेळी प्रा. पुरी सर तिथे यायचे. स्मृतीशेष माधव आंबुलगेकर यांच्याकडून मी औरंगाबादला येण्याअगोदरच पुरी सरांबद्दल बरंच ऐकलं होतं. आम्ही सोबत कंधारला बातमीदारी करत होतो. सर कॉलेजमध्ये यायचे, त्यावेळी माझ्या राहणीमानाकडे बघून सरही आपलेच आहेत असं वाटायचं. तिथं सरांशी संपर्क आला. त्यांना चहापाणी देणे, काही फाईल देणे असे कामं मी तिथं करायचो. मी ते शिपायाचे काम सोडले आणि दैनिक लोकपत्रमध्ये उपसंपादक म्हणून रुजू झालो. तिथली नोकरी सोडली अन् डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमधील प्रा. सुरेश पुरी सरांची कॅबीन गाठली. सरांना सांगितलं, ‘मला नवीन ठिकाणी नोकरी मिळवून द्या.’ सरांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सांगितले, ‘दैनिक पुण्यनगरीत जा. तिथं महादेव कुंभार आहेत. त्यांना माझं नाव सांग, पुरी सरांनी पाठवले आहे. एवढा निरोप दे.’ बाबा पेट्रोल पंपाजवळ पुण्यनगरीचे ऑफिस होते. तिथं आलो. कुंभार साहेबांना भेटलो. त्यांनी मला वाळूज ऑफिसला पाठवले. माझे कात्रणं बर्यापैकी होती. तिथे डुंबरे साहेबांनी माझी कात्रणं आणि बातमीसोबत कॉम्प्युटर ज्ञान तपासून मला नोकरी दिली. मी दुसर्या दिवसापासून दैनिक पुण्यनगरीत काम करू लागलो. कुंभार साहेबांनी इतकी मोकळीक दिली की, मी माझ्या मर्जीनुसार वाटेल ते लेख छापू लागलो. महाराष्ट्रातून त्या लेखांबद्दल चांगल्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. कुंभार साहेब लातूरला गेले अन् पुण्यनगरी राजकारण सुरू झालं. एका दिवशी पुण्यनगरीचे सर्वेसर्वा बाबा (मुरलीधर शिंगोटे) आले. त्यांनी विचारले, ‘वाघमारे कोण आहे?’ मी त्यांच्या समोर उभा राहिलो. त्यावेळी ते म्हणाले, ‘किती शिकलास?’ मी, ‘दहावी पास.’ (मुक्त विद्यापीठात अॅडमिशन सुरू होतं.) तेव्हा ते हसले आणि म्हणाले, ‘बातमीसाठी आणि लेखनासाठी डिग्रीची गरज नाही. फक्त अक्क्ल आणि समाजाचे आकलन किती, हे महत्त्वाचे आहे.’ मग मी तिथे उपद्रवी ठरू लागलो. ज्यांची हयात पत्रकाच्या पलीकडे नव्हती, अशांनाही मी वृत्तसंपादक असल्याचा भास होऊ लागला. त्यांनी माझ्या बाबतीत राजकारण सुरू केलं. मग अचानक एकेदिवशी माझ्या बदलीचे फर्मान निघाले. ती गोष्ट माझ्या मनाला पटली नाही. मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता नोकरीचा राजीनामा दिला, माझ्यावर घरच्या जबाबदारी असतानाही. मी मस्त फकीरच जिंदगी जगत गेलो. राजीनामा दिला अन् परत पुरी सरांची कॅबीन गाठली.
दुपारची वेळ होती. त्यावेळी विद्यापीठाच्या डिपार्टमेंटला पोहोचलो. सर कॅबीनमध्ये बसेलेले होते. त्यांच्याजवळ माझी अडचण सांगितली. सरांनी, ‘नोकरी कुठे करायची?’ विचारले. मी म्हणालो, ‘मला नोकरी करायची नाही. प्रकाशन चालवायचे आहे.’ ‘मनाची पक्की तयारी झाली का?’ सर म्हणाले. मी, ‘हो.’ म्हणालो. डिसेंबर २००८ चा तो पहिला आठवडा होता. सर म्हणाले, ‘तुला माझ्याकडून काय अपेक्षित आहे?’ मी म्हणालो, ‘मला कॉम्प्युटर घेऊन द्या. सोबत डीटीपीचे कामे करील आणि प्रकाशन व्यवसायही चालवील.’ ‘तू उद्या शहरात जाऊन कॉम्प्युटरचे कोटेशन घेऊन ये.’ सरांनी सांगितले. मी दुसर्या दिवशी दोन तीन दुकानावरून कोटेशन घेऊन आलो. सरांना दाखवले. सर म्हणाले, ‘तू आता गावी जा. एक तारखेला पगार होतो. पगार झाला की, मी तुला फोन करतो.’ मी गावाकडे आलो. कधीच घरी एक दिवसापेक्षा जास्त दिवस न राहणारा मी चक्क आठ दिवस झाले तरी औरंगाबादला जायचे नाव घेत नव्हतो. माय चौकशी करू लागली. मी थातुरमातूर उत्तर देऊन वेळ काढली. २००९ साल उजाडलं आणि बरोबर २ तारखेला सरांचा फोन आला. ‘वैजनाथ तू औरंगाबादला ये.’ मी लागलीच औरंगाबादला आलो. जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर आणि जीवन कुलकर्णी यांचे माझे चांगले संबंध होते. सरदार जाधवही तिथेच आपले मुखपृष्ठ तयार करायचे. जीवन कुलकर्णीनी शिंदे यांच्याकडून कॉम्प्युटर असेंबल करून घेतले. सरांना बोलावले. सरांनी सहकार नगर येथील मीरा बुक्स अॅन्ड पब्लिकेशनच्या ऑफीसमध्ये येऊन दिनांक ३ जानेवारी २००९ रोजी कॉम्प्युटरचे बटन दाबून माझ्या प्रकाशनाचा आरंभ केला. त्यावेळी बब्रुवान रुद्रकंठवार उपस्थित होते. ते म्हणाले, ‘वैजू, तुझ्यात म्हातार्याचा जीव आहे.’ सर निघून गेले.
दरम्यानच्या काळात एक वर्षे मला खूप अडचणीचे गेले. त्या अडचणींचा अन् माझ्या कष्टाचा मला बाऊ करायचा नाही. मग मी पीएच. डी. चे थेसीस डीटीपी करून द्यायचा. माझा स्पीड चांगला होता. त्यामुळे मला पुण्यनगरीच्या पगाराइतकेच रुपये त्या डीटीपीच्या कामातून मिळत होते. कामही मिळाली. दैनिकातील नोकरीमुळे महाराष्ट्रात बराच संपर्क होता. त्यामुळे प्रकाशनाचे काम बर्यापैकी सुरू झाले. पण माझ्या काही अडचणीमुळे मी पुरी सरांना एकदाही भेटायला गेलो नाही. माझ्या दुबळ्या जिभीमुळे मला काही नुकसान सहन करावे लागले. कारण माझ्याजवळ दहा हजार रुपये आले की, कोणीतरी यायचे आणि ते महिना दोन महिन्यात परत करतो सांगून न्यायचे अन् ते रुपये परत यायचेच नाही. असे मला काही नातेवाईकांनी आणि दुसर्यांनी फसवले. या वागण्यामुळे मी पुरी सरांनी ज्या विश्वासाने मला उभं करण्यासाठी तन-मन-धन ओतलं होतं, त्यास मी पात्र ठरत नव्हतो. त्यामुळे मी कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे जाऊ, या भीतीमुळे मी त्यांना टाळत होतो. भेटत नव्हतो. सरांनीही कुठेही चकार शब्द काढला नाही. पण जे कोणी भेटतील त्यांना मात्र सांगत होतो की, हे प्रकाशन मला प्रा. पुरी सरांनी सुरू करून दिले आहे.
मग कामाची गती वाढली अन् पैसे जमा झाले. तब्बल सहा वर्षांनी सरांना फोन न करता मी घरी गेलो. त्यांना भेटलो. त्यांना माझी सर्व अडचणी कथन केल्या. त्यांनी तितक्याच मायेच्या ममतेने मला स्वीकारलं अन् जगण्याचा मूलमंत्र सांगितला. प्रकाशन सुरू करण्याच्या अगोदर सरांनी एक सल्ला दिला होता. तो मी पाळला नाही. त्याचे परिणामही भोगावे लागले.
बहिणीचे लग्न ठरले. लग्नासाठी काही म्हणजे जवळपास लाखभर रुपये कमी पडत होते. माझ्याकडे पुस्तकांचा साठा बराच होता. त्यावेळी मी सरांच्या नावाचा वापर केला. काही ग्रंथपालांना पुरी सरांनी हे प्रकाशन उभे केले आहे. तुम्ही काही पुस्तके खरेदी करा अन् मला सहकार्य करा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यात मला विद्यापीठातील ग्रंथालयाचे क्लार्क गायकवाड सरांची खूप मदत झाली. त्यांनीही पुरी सरांचे नाव ऐकून सर्वोतोपरी मदत केली. गायकवाड सरांना पुरी सरांचे नाव ऐकताच काय आनंद झाला, हे कोणत्याही कॅमेर्याला टिपता येत नाही. त्यामुळे मला कुणापुढे हात पसरावे लागले नाहीत.
नंतर माझ्या आयुष्यात अनेक चढउतार आले. त्याही काळात ज्यांच्यावर पन्नास हजार रुपये खर्च केले ते पळाले. मी मात्र आपला मार्ग सोडला नाही. जगत राहिलो. आजारी पडलो. मला औरंगाबाद काही दिवस सोडावं लागलं. चार वर्षे मी नांदेडला राहिलो. या काळात मी एकदम ‘आऊट ऑफ कव्हरेज’च होतो.
कोवीडचे संकट जागतिक पातळीवर सुरू झाले. सर्वत्र हाहाकार सुरू असल्याच्या बातम्या बघत होतो. वाचत होतो. कोणी कुणाला विचारत नव्हतं. एकमेकांच्या घरी जाण्याचा प्रश्नच नव्हता. लोकांशी संपर्क नसल्याने काही मोजकीच कामं सुरू होती. त्यात मला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानरूपी ‘बेरर चेक’ दिला. तो मी वापरत होतो. म्हणजे एक संविधानाचा ग्रंथ मला गरजेइतक्या रुपयांचा पुरवठा करत होता. सारखा आजारी. त्यामुळे कामेही जास्त करता येत नव्हती. पुस्तके घेऊन कुठे कार्यक्रमाला जाता येत नव्हतं. त्यात कोवीडचे संकट उभं राहिले. अचानक एका दिवशी सरांचा फोन आला, ‘वैजनाथ, कुठं आहेस?’ त्यावेळी माझ्या मनाला काय आनंद झाला, मला शब्दांत सांगता येत नाही. माझ्या अंगातला आजार काही काळ पळून गेला. तो मायेचा ओलावा मी अंत:करणात जपून ठेवला. सरांनी कोवीडपासून स्वत:ला वाचविण्यासाठी सूचना केल्या. त्यावेळी मला एका हृदयात दोन अंतकरण अनुभवता आली. ती म्हणजे एक माय आणि दुसरा बाप. माझा आजार कमी होत होता. प्रा. पुरी सर तर जनसंपर्क तज्ज्ञ आणि मी आऊट ऑफ कव्हरेज. तरीही सरांनी मला मुलाइतकेच प्रेम दिले. ते माझ्या प्रकाशन संस्थेचे जन्मदाते. त्यांनी आपण ज्या परिस्थितीतून आलो, त्याची जाणीव ठेवून ‘मदतीचा’ वारसा पुढे चालू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तो मी माझ्या कुवतीप्रमाणे सुरू ठेवला आहे. यापुढेही त्यांच्याच मार्गाने जाण्याचा माझा दृढ निश्चय आहे.
सरांनी अनेक विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत केली. ते आजही करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही फिरताना सरांचे नाव निघाले की, तो मिळणारा जिव्हाळा आयुष्याला मोठा उभारा देणारा आहे. याचा अनुभव मी गेली बारा वर्षे झाले घेतो आहे. कारण प्रकाशनाच्या कामानिमित्त पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर आदी ठिकाणी सरांच्या नावावर माझे अनेक कामे होतात.
आदरणीय, पुरी सरांचा आणि माझा संबंध आला नसता, तर आज मी कुठे असतो? याचा काहीच अंदाज घेता येत नाही. सरांचा ‘आसरा’ मला मिळाला म्हणून मी आज सुखानं दोन घास खाऊन कुणाच्यातरी आयुष्याला ठिगळ लावतोय, याचं समाधान आहे. पण याचं सर्व श्रेय ‘जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेशरी पुरी’ सर यांना जाते. या वाढदिवसाच्या निमित्ताने निसर्गाकडे एकच अपेक्षा आहे की, त्यांना दीर्घाष्यू मिळावे अन् सुख-दु:खात ‘वैजनाथ, कुठं आहेस?’ हा शब्द माझ्या शेवटापर्यंत जावा.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List