महालक्ष्मी पूजनाचा खरा अर्थ

महालक्ष्मी पूजनाचा खरा अर्थ

आधुनिक केसरी न्यूज

ज्येष्ठा गौरी आवाहन हा गणपतीमध्येच अतिशय धूमधडाक्यात साजरा होणारा उत्सव आहे. या उत्सवामध्ये गौरीची पूजा केली जाते. तसे पाहिले तर स्कंदपुराण, मार्कंडेय पुराण, पद्मपुराण, देवीभागवत या सर्वच ग्रंथांमध्ये देवीची उपासना सांगितलेली आहे. कधी तिला आद्यशक्ती म्हटलेले आहे, कधी राक्षसांचा संहार करणारी म्हणून तिचे पूजन केलेले आहे, तर कधी धन, धान्य, ऐश्वर्य, संपत्ती देणारी महालक्ष्मी म्हणून तिचे पूजन केलेले आहे.

आपल्या सनातन धर्मामध्ये पुरुष देवता आणि स्त्री देवता असा काही भेदभाव नाही. पूर्वी साधारणतः शंकर, विष्णू, देवी, सूर्य आणि गणपती या देवतांची सर्व पूजा केली जायची. वैष्णव हे विष्णूला प्रमुख देवता मानायचे आणि इतर सर्वांचीही पूजा करायचे. शैव शंकराला प्रमुख देवता मानायचे आणि इतर सर्वांचीही पूजा करायचे. त्याचप्रमाणे काही लोक देवीला प्रमुख देवता मानायचे, तर काही सूर्याला, तर काही गणपतीला. परंतु इतर सर्व देवतांची पूजा केली जायची.

ज्येष्ठा गौरी हे सुद्धा देवीचे स्वरूप आहे. देवीचीच ती पूजा आहे. ही धन, धान्य, ऐश्वर्य, संपत्ती देणारी महालक्ष्मी आहे. आपला समाज प्रामुख्याने गृहस्थाश्रमी समाज आहे. गृहस्थाश्रमी माणसाला नेहमीच त्याच्या परिवाराची, मुलाबाळांच्या भविष्याची चिंता असते. त्यामुळे “आज माझ्याजवळ जी सुख-संपदा आहे ती भविष्यातही कायम राहील की नाही?” ही चिंता त्याला नेहमी सतावत असते.

त्याला वाटते की ही सुखसंपत्ती माझ्या आयुष्यापर्यंत तर राहिलीच पाहिजे, पण माझ्या मुलांनाही कशाची कमतरता पडू नये. ज्यांच्याजवळ आज धन-धान्य, ऐश्वर्य, संपत्तीची कमतरता आहे, त्यांना वाटते की आमच्या जीवनात जरी कमतरता आजपर्यंत राहिलेली असली तरी उद्या ती राहू नये, आणि मुलांच्या जीवनात तर अजिबातच राहू नये. त्यामुळे हा समाज विविध निमित्ताने महालक्ष्मीची पूजा करीत असतो. ज्येष्ठा गौरी आवाहन हे  महालक्ष्मीचेच आवाहन आहे.

आपल्या धर्मामध्ये लक्ष्मी आणि अलक्ष्मी अशी दोन रूपे सांगितलेली आहेत. परंतु सात्विक समाज हा फक्त लक्ष्मीची पूजा करतो. अलक्ष्मीला चांगले म्हटले गेलेले नाही. आज आपल्या समाजामध्ये काळा पैसा आहे, तो अलक्ष्मीचे स्वरूप आहे, असे मानले गेलेले आहे. या अलक्ष्मीमुळे कधीही सुखशांती येत नाही.
आज आपण समाजामध्ये रोज निरनिराळे घोटाळे उघडकीस येताना पाहतो. एखादा मोठा राजनेता त्याचे आयुष्य खूप मोठ्या ऐश्वर्यात गेलेले असते, पण त्याच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्याला तुरुंगात जावे लागते. हा अलक्ष्मीचा परिणाम आहे. मोठ्या प्रमाणावर अलक्ष्मीची साधना करून भरपूर काळा पैसा जमवणाऱ्या लोकांना सतत हा पैसा पांढरा कसा करता येईल याची चिंता लागलेली असते. ज्यावेळी नोटबंदी झाली, त्यावेळी बँकेत विचारले जायचे की “हे पैसे कुठून आणलेत? याचा उगम काय?” त्यावेळी तो स्रोत सांगावा लागायचा. त्यामुळे अनेकांनी घरी पोत्यांमध्ये भरून ठेवलेले पैसे शेवटी पेटवून दिले, तर काहींनी ते उकिरड्यावर फेकले. तात्पर्य काय? अशांच्या जीवनात चिंता ही लागूनच राहते. चिंता हे अनेक रोगांचे कारण असते. त्यामुळे आयुष्यभर असा पैसा सांभाळणाऱ्या लोकांना अनेक शारीरिक व्याधी चिकटतात. इतिहास आपल्याला सांगतो की, ज्यांनी लोकांकडून लुबाडलेला पैसा गोळा केला, त्यांचा अंत त्या पैशाच्या राशीकडे पाहता-पाहता झालेला आहे. मग तो महंमद गजनी असो, अल्लाउद्दीन खिलजी असो किंवा आजचे सत्ताधीश आणि अब्जाधीश असोत.
श्रीमंत असणे, वैभवसंपन्न असणे हे चांगलेच आहे. अनेक मोठे व्यापारी अगदी चिकाटीने आपला व्यवसाय करतात व हळूहळू मोठी संपत्ती तयार करतात. अशा लोकांबद्दल समाजालाही आदर असतो. आणि असे लोक समाजासाठी मुक्तहस्ते खर्च करण्यामध्येही मागेपुढे पाहत नाहीत.

       मागे मी एक लेख वाचला होता. त्यामध्ये सारांश असा होता की बिल गेट्स जगातील इतका श्रीमंत माणूस आहे, तो तर महालक्ष्मीची पूजा करत नाही, मग त्याच्याकडे एवढी लक्ष्मी कशी आहे? अनेक वेळा मोठमोठे लोक खूप छोटे प्रश्न विचारतात.
अमेरिकेमध्ये राहणारा माणूस “अमेरिका माता” म्हणत नाही, जपानमध्ये राहणारा माणूस “जपान माता” म्हणत नाही. पण भारतामध्ये राहणारा माणूस मात्र भारताला भारत माता म्हणतो. भारतामध्ये राहणारा माणूस हा भारतमातेचे देवीस्वरूपात दर्शन घेतो, तिची पूजा करतो. मूळ वंदे मातरम् मध्येही दुर्गेचे वर्णन आहे “त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी ” असे म्हटलेले आहे. त्यामुळे हा पाश्चिमात्य आणि भारतीय दृष्टिकोनाचा फरक आहे.

आपण नेहमीच आपल्यापेक्षा उच्च आदर्शांकडे पाहिले पाहिजे. पोट तर पशू सुद्धा भरतात, परंतु पशू जसे खातात तसे आपण खात नाही. पशू जसे राहतात तसे आपण राहत नाही. ज्या गोष्टी बिल गेट्सला आपल्यापेक्षा चांगल्या येतात त्या त्याच्याकडून शिकाव्यात, आणि ज्या गोष्टी आपल्याकडे चांगल्या आहेत त्या त्यालाही दिल्या पाहिजेत. जो माणूस व्यवसाय करतो त्याच्याकडे पैसे हे येणारच आहेत. तो बिल गेट्स असेल, नाहीतर अंबानी असेल. परंतु मानवीय सभ्यतेचा उगम आपल्या देशात फार पूर्वी झाला आहे. आपल्या देशातील ऋषीमुनींनी, महापुरुषांनी सर्वसामान्य माणसाला जीवन कसे जगावे हे सांगितले आहे. जीवनामध्ये पैशाचे महत्त्व आहे, तो फार महत्त्वाचा आहे. परंतु तरीही जीवनामध्ये तो असेल किंवा नसेल, तरी माणसाने आपली सचोटी आणि प्रामाणिकता सोडू नये.

वाल्या कोळी नावाचा एक दरोडेखोर होता. तो दरोडे टाकून, लूटमार करून पैसे मिळवित असे. देवर्षी नारदांनी त्याला विचारले  “तू असे काम का करतोस? कामधंदा करून पैसे का मिळवत नाहीस?” त्यावर तो म्हणाला “हाच माझा व्यवसाय आहे.”
मग नारद म्हणाले  “लोकांना लुबाडणे हे पाप आहे. मग असे का करतोस?” त्यावर वाल्या म्हणाला – “माझे कुटुंब चालविण्यासाठी मला पैशांची आवश्यकता आहे म्हणून मी हे करतो.”
तेव्हा नारद म्हणाले – “ज्यांच्यासाठी हे पाप करतोस त्यांना विचारून पाहा की ते तुझ्या पापाचे वाटेकरी होतील का?”
वाल्या जाऊन पत्नीला आणि मुलांना विचारतो – “मी जे पैसे घरी आणतो त्यावर आपले घर चालते. ज्या वेळी मी पैसे आणतो, त्या वेळी तुम्हाला खूप आनंद होतो. पण मला आत्ताच एका साधूने सांगितले की अशा प्रकारे पैसे कमावले तर पाप लागते. त्यामुळे तुम्ही माझ्या पापाचे वाटेकरी आहात का?”
त्यावर पत्नी आणि मुलं म्हणाली  “आमच्यासाठी पैसे कमवून आणणे आणि आमचे पोट भरणे हे तुमचे कर्तव्य आहे. पण आम्ही तुमच्या पापाचे वाटेकरी होणार नाही, कारण आम्ही तुम्हाला या प्रकारे पैसे कमवून आणा असे सांगितलेले नाही.”
हे भारतीय दर्शन आहे. हा भारतीयांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. मिळेल ते खाऊन पोट तर जनावरं सुद्धा भरतात, पण पोट कसे भरले पाहिजे हे आपल्या ऋषीमुनींनी, साधुसंतांनी, महापुरुषांनी सांगितलेले आहे. मनुष्य कधीतरी पशू होता असे म्हणतात. पण पशुत्वाकडून त्याने मनुष्यत्वाकडे प्रवास सुरू केला. काही मनुष्य मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे गेले. आणि असे श्रेष्ठ पुरुष आपल्या समाजाला मार्गदर्शन करत गेले.

 समाजमाध्यमावर एक व्हिडिओ पाहिला होता. त्यामध्ये म्हटले होते – “Your mind can control your money.” तुमचे मन तुमच्याकडे येणाऱ्या पैशाला नियंत्रित करू शकते. आपण जर सतत असा विचार करत राहिलो की “माझ्याकडे हे नाही, ते नाही, मी दरिद्री आहे”, तर जगातील दारिद्र्य आपल्याकडे खेचले जाईल.
आकर्षणाचा नियम सुद्धा हेच सांगतो. ज्येष्ठा गौरीचे आवाहन करणे म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी माझ्या घरी आलेली आहे. “मला आता यापुढे काही कमी पडणार नाही. महालक्ष्मीचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या परिवारावर सदैव आहे आणि राहील”अशा पद्धतीचा विचार जर आपण केला, तर आकर्षणाचा सिद्धांत आपल्या मदतीला नक्कीच येईल आणि आपल्या घरात समृद्धी येईलच.
ज्येष्ठा गौरीचे आवाहन हे लक्ष्मीचे आवाहन आहे. महालक्ष्मी आमच्या घरात नित्य वास करते. पण त्या लक्ष्मीचे आवाहन करून तिची पूजा करण्याचा हा दिवस आहे.

ज्याप्रमाणे माहेरी आलेल्या मुलीची आपण खूपच काळजी घेतो, तिला मनाप्रमाणे व प्रसन्न राहता येईल असे पाहतो, तिला जे आवडते ते सर्व काही करतो, त्याप्रमाणेच ज्येष्ठा गौरीचे आवाहन म्हणजे आमच्या जीवनाला लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता करणारी महालक्ष्मी. तिचे आवाहन व पूजन करण्याचा हा दिवस आहे.
या महालक्ष्मीचा वास आमच्या घरात नित्य राहावा, आमच्या देशातही ही महालक्ष्मी स्थिर राहावी यासाठी महालक्ष्मीची पूजा आणि तिच्यासाठी प्रत्येकाने वर्षभर चांगले प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी समाजाने स्वदेशीची कास धरणे पण आवश्यक आहे. असे झाल्यास भारत परमवैभवशाली होईल आणि ज्येष्ठा गौरीचे आवाहनही सफल होईल.

अमोल पुसदकर
सुप्रसिद्ध वक्ता व लेखक
 955 25 35 813

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महालक्ष्मी पूजनाचा खरा अर्थ महालक्ष्मी पूजनाचा खरा अर्थ
आधुनिक केसरी न्यूज ज्येष्ठा गौरी आवाहन हा गणपतीमध्येच अतिशय धूमधडाक्यात साजरा होणारा उत्सव आहे. या उत्सवामध्ये गौरीची पूजा केली जाते....
माहूर तालुक्यातील एका नामांकित शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृृृृत्य मानवतेला काळीमा फासणारी घटना..!
भटक्या विमुक्तांना विविध दाखले देण्यासाठी स्वतंत्र समिती : ना. अतुल सावे
पोलीस महानिरीक्षकांनी घेतली आमदार करण देवतळे यांची भेट
राज्यस्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेत नागपूर विभाग प्रथम..!
मराठा आरक्षणासावर मंत्री चंद्रकांत पाटील यांची खडसावून टीका अन् म्हणाले..!
हॉटेल मटण भाकरीच्या नावाखाली सुरू होता वेगळाच कार्यक्रम