वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार..!
आधुनिक केसरी न्यूज
गोंदिया : शेतात काम करत असलेल्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सडक अर्जुनी तालुक्यातील माहुली शेतशिवारात शुक्रवार 30 जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. लक्ष्मीबाई हेमराज सय्याम (55) रा. माहुली असे मृताचे नाव आहे. शांत आणि कष्टकरी म्हणून परिचित असलेल्या लक्ष्मीबाई यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे व शोककळेचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मीबाई नेहमीप्रमाणे मक्याच्या शेतात काम करत असताना झुडपांमधून दबा धरून आलेल्या वाघाने मागून झडप घातली. अचानक झालेल्या या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेजारील शेतातील शेतकरी, मजूर, गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. परिसरात वाघाचा मुक्त संचार वाढल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून, तत्काळ पिंजरा लावून वाघाला जेरबंद करण्याची मागणी होत आहे. घटनेमुळे माहुली व परिसरातील शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, मानवी जीवाला धोका निर्माण होत असताना वनविभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
घटनास्थळावर वाघाचे पगमार्क आढळले.
घटनास्थळी चिखल असल्याने पगमार्क स्पष्ट दिसून येत नाही. काही प्रत्यक्षदर्शीनी वाघाला पाहिल्याचे सांगीतले जाते. घटनास्थळावर ट्रॅप कॅमेरे बसविण्यात येत आहेत. हल्ला करणारा वाघ कोणता आहे. याची सहनिशा करून तसा अहवाल वरीष्ठांना पाठविण्यात येईल.
- पवन जोंग उपवनसंरक्षक, गोंदिया
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List