या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करतो,पाडगावकरांच्या सानिध्यातील, क्षण आनंदे भरतो.!

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करतो,पाडगावकरांच्या सानिध्यातील, क्षण आनंदे भरतो.!

अत्तर क्षणांचा सुगंध – प्रा.बी.एन.चौधरी , संपर्क : ९४२३४९२५९३ माणसाचं आयुष्य सुख, दुःख, लोभ, मोह, मद आणि मत्सराने भरलेले आहे. यातून जीवनाची वेगवेगळी रुपं शोधून, त्यांना शब्दात गुंफत जगण्याचं तत्वज्ञान मांडणारे गीतकार, कवी मंगेश पाडगांवकर म्हणजे साक्षात शब्दप्रभू. जगण्यातला आनंद शोधून, जगण्याचा सार, शब्दात मांडणाऱ्या या भावगीतकाराने लिहलेली अनेक गीतं, मराठी माणसांचा जगण्याचा आधार बनली… Continue reading या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करतो,पाडगावकरांच्या सानिध्यातील, क्षण आनंदे भरतो.!

अत्तर क्षणांचा सुगंध

– प्रा.बी.एन.चौधरी , संपर्क : ९४२३४९२५९३

माणसाचं आयुष्य सुख, दुःख, लोभ, मोह, मद आणि मत्सराने भरलेले आहे. यातून जीवनाची वेगवेगळी रुपं शोधून, त्यांना शब्दात गुंफत जगण्याचं तत्वज्ञान मांडणारे गीतकार, कवी मंगेश पाडगांवकर म्हणजे साक्षात शब्दप्रभू. जगण्यातला आनंद शोधून, जगण्याचा सार, शब्दात मांडणाऱ्या या भावगीतकाराने लिहलेली अनेक गीतं, मराठी माणसांचा जगण्याचा आधार बनली आहेत. त्यांच्या गीतातून माणसाला जगण्याचा अर्थ कळतो. जगण्यातला आस्वाद कसा घ्यावा याचं दर्शन होतं. आणि, त्यांची गीतं ऐकता ऐकता, माणूस जगण्यावर प्रेम करायला लागतो. या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.! असं म्हणणारा हा कवी, मला आनंदयात्री वाटायला लागतो. पाडगावकरांनी कवितेचे सर्व प्रकार हाताळले. बालगीत, बडबड गीत, बोलगाणी, कविता, भावगीत, भावगीत, असंख्य चित्रपट गीतं आणि पापड गीतंही त्यांनी लिहली. ती गाजली. अजरामर झाली. अश्या या शब्दप्रभूचं आकर्षण वाटलं नाही, तर नवलच.? मी ही त्यांच्या प्रेमात पडलो. आणि, त्या प्रेमातून त्यांची माझी एकदोनदा नव्हे, तर चक्क चार वेळा भेट झाली. त्यांना ऐकणं म्हणजे अमृतानुभव. त्यांच्या सोबतीत वेळ घालवणं, म्हणजे जीवानं काशी करणं आणि त्यांचं सानिध्य लाभणं म्हणजे, जीवन धन्य होणं. अश्या या शब्दप्रभूंसोबत घालवलेल्या क्षणांचे, अत्तर झाले नाही, तर ते नवलच. त्याच अत्तर क्षणांचा, हा आजचा मनमोहून टाकणारा शब्द-दर्वळ. हा दर्वळ मी मनात भरला आहे.
मला कळायला लागलं, तेव्हापासून आमच्या घरात एअरव्हाईस कंपनीचा, सहा बॅंडचा रेडीओ होता. तो ऐकणं म्हणजे माझा विरंगुळा होता. त्या काळापासून मी “भातुकलीच्या खेळा मधली, राजा आणि राणी. अर्ध्यावरती डाव मोडीला अधूरी एक कहाणी !” या भावगीतांच्या प्रेमात पडलो होतो. हे गाणं ऐकू आलं, म्हणजे मी हातातलं काम असो की अभ्यास, ते सोडून रेडीओला कान लावून बसे. या गाण्याची ओळनंओळ मी कानात साठवायचो. हृदयात जपायचो. कां कुणास ठाऊक ? मी व्याकूळ व्हायचो. राजा आणि राणीचा डाव अर्ध्यावर कां मोडला.? या प्रश्नाने मला ती व्याकूळता येत असावी. त्या काळातच मी अनेक गोष्टींची पुस्तकंही वाचली. ज्यात राजा राणी असायचीच. मात्र, या गीतातील राजाराणी लक्षात राहिली ती आजतागायत. मनाला व्याकूळ करणारा, अरुण दातेंचा कातर स्वर, मनावर गारुड करणारं यशवंत देव यांचं संगीत आणि शब्दाशब्दातून व्यक्त होणारी, अनाकलनीयता ! यांचा इतका सुरेख मेळ फार कमी गाण्यात जमला असेल. मुलांना ते बालगीत वाटतं. तरुण तरुणींना ते प्रेम गीत वाटतं. वयस्क लोकांना विरह गीत आणि अभ्यासकांना ते जीवनाचं तत्वज्ञान वाटतं. यात येणाऱ्या शब्दाची भाषा अन हाताची रेषा, दूरचा तारा अन गावचा वारा, राणी केविलवाणी अन उदास विराणी हे यमक, गीताला विसरुच देत नाही. या गीताने मी मंगेश पाडगावकरांचा फॅन झालो. पुढे त्यांची अनेक भावगीतं ऐकली. अनेक कॅसेट्स संग्रही ठेवल्या. आणि, यातून त्यांच्या भेटीची उत्सुकता वाढीस लागली.
पाडगावकरांना मी पहिल्यांदा भेटलो ते पुण्यातील सदाशिव पेठेतल्या, महात्मा फुले सभागृहात. मी एससीआरटीच्या ट्रेनींगला गेलेलो होतो. तिथंच निवास होता. आणि वसतीगृहासमोरील सभागृहात पाडगावकरांच्या बोलगाणी कॅसेटचं प्रकाशन होतं. माझा आनंद मनात मावत नव्हता. मी लवकर जावून पुढची जागा पकडली. पाडगावकरांना डोळेभरुन पाहिलं. मनभरुन ऐकलं. आणि त्यांची कॅसेट विकत घेवून, त्यावर त्यांची स्वाक्षरी मिळवली. मला आभाळ ठेंगणं वाटत होतं. माझा आवडता कवी, गीतकार प्रत्यक्ष समोर भेटणं, बोलणं, त्यांची स्वाक्षरी मिळवणं, हे मला स्वप्नवत वाटत होतं. पुढे कित्येक दिवस त्या कॅसेटची मी पारायणं केली. पाडगावकर त्यानंतर माझ्या मनावर अधोराज्य गाजवू लागले.
एकेदिवशी मित्रांकडून माहिती मिळाली जळगावला “शुक्रतारा” हा अरुण दातेंचा कार्यक्रम बालगंधर्वला होता. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कार्यक्रमाला, स्वतः मंगेश पाडगावकरही हजेरी लावणार होते. ही सुवर्णसंधी मी कशी हुकू देणार. मी माझ्या मित्रांना त्यासाठी तयार केलं. आणि जळगाव गाठलं. प्रचंड गर्दीत तो कार्यक्रम ऐकला आणि अरुण दाते, मंगेश पाडगावकर यांना डोळ्यांचे पारणे फिटेस्तोवर पाहून घेतलं. त्या स्वर्णीम क्षणांनी माझ्या कलासक्त मनाला, एक प्रकारची झालरच लावली. कार्यक्रम संपल्यावर आम्ही दोघांची भेट घेतली. मात्र, फोटो घेता आले नाहीत. निघतांना इतकी गर्दी झाली, की पायातल्या चपला हरवल्या. रात्री अकराच्या रेल्वे फास्टने धरणगावी परतलो. अनवाणीच ! पायातल्या चपला हरवल्या होत्या, मात्र, काही हृदयस्पर्शी रचना, नव्याने गवसल्या होत्या. ती गीत गुणगुणत घरी परतलो. चपला गमावल्याचं कोणतंही शल्य मनात नव्हतं. कारण, जे गवलं होतं त्याचं मुल्य अमोल होतं. पाडगावकर असे मनात घर करत होते.
दिवसा मागून दिवस जात होते. मीही शब्द जुळवून कविता लिहायला लागलो होतो. त्यांना बऱ्यापैकी दाद मिळू लागली होती. कवी म्हणून काही कवीसंमेलनांना हजेरीही लावली. दैनिकं, नियतकालिकात लिहत होतो. काही दिवसांनी पुण्याहून वि. दा. पिंगळेचा फोन आला. त्यांनी मला साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनातील कवीसंमेलनात निमंत्रित कवी म्हणून आमंत्रण दिलं. हा खरं तर सुखद धक्काच होता. मी आनंदानेच संमेलनाला गेला. मला सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे, फ. मु. शिंदे, प्रा. केशव देशमुख, मनोहर आंधळे यांच्यासोबत व्यासपिठावर बसण्याचा सन्मान मिळाला. याच संमेलनात एका सत्रात माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर यांची मुलाखत आणि त्यांचे गीत अशी मैफिल आयोजित केलेली होती. त्या कार्यक्रमापूर्वी जेष्ठ कवी रामदास फुटाणेसह पाडगावकरांसोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. मी निमंत्रित कवी असून कवी संमेलना आलो आहे, असे सांगत, त्यांना माझा कविता संग्रह भेट दिला. तो चाळत असतांनाच, त्यांनी संग्रहातल्या काही कविता गेय असून, त्यांना चाली लावता येवू शकेल, असं मत प्रदर्शन केलं. एखाद्या नवोदित कवीला, त्याच्या कविता चांगल्या आहेत असं सांगून, त्यातील बलस्थानं तिथल्या तिथं दाखवून देणारा हा कवी, मला शब्दांइतकाच मनानेही खूप मोठा असल्याचं दर्शन झालं. पाडगावकरांनीही त्याच्या हातात असलेला “जिप्सी” संग्रहावर, त्यांची लफ्फेदार सही उमटवत, त्यावर कवी प्रा. बी.एन.चौधरी यांना सस्नेह, असं लिहून मला दिला. मी धन्य झालो. ज्यांच्या भावगीतांनी माझा देह कवी म्हणून पोसला जात होता, त्या शब्द प्रभूंनी मला कवी म्हणून उल्लेखणं, ही माझ्या कवी असण्यावर उमटलेली मोहरच होती. एका अर्थाने साहित्यिक कलावंताच्या संमेलनाने, मला श्रीमंत केले होते. त्यांना आणि सुप्रसिद्ध चित्रकार रवीजी परांजपे यांना याच मंडळाने वाग्यज्ञ जीवनगौरव पुरस्कार दिला होता. त्या क्षणांचा साक्षीदार होण्याचं भाग्यही मला लाभलं होतं. हे दोन्ही क्षण मी कॅमेऱ्यात कैद करुन चिरंजीव केले होते.
पुढे पाडगावकरांची मुलाखत आणि गीत कार्यक्रम रंगला. त्यात त्यांची कविता लेखनाची शक्तीस्थळं, कविते मागची प्रेरणा, कविता निर्मितीतील गमती जमती उलगडत गेल्या. वेंगुर्ल्याला १० मार्च १९२९ ला जन्मलेल्या पाडगावकरांना समुद्र, पाऊस आणि फुलांचा सहवास बालपणीच लाभला होता. तेथूनच त्यांची कवितेशी गट्टी जमली. देखणा निसर्ग, सुंदर वातावरणाचा त्यांच्या मनावर, व्यक्तित्वावर आणि कवितेवर परिणाम होत गेला, असं ते म्हणाले. मनात जाणिवांचे बीज पडत गेले आणि मी कविता लिहू लागलो.! इतकी त्यांची कविता लेखनाची साधी, सरळ व्याख्या. कविता ही मेंदूत सूचते आणि हृदयातून अवतरते, तेव्हा कवितेचं गाणं होतं असं त्यांनी सांगितले. दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे, असा बेभान हा वारा, या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणि, शुक्रतारा मंद वारा, तुझे गीत गाण्यासाठी सूर लाभू दे, ही भावगीतं रसिकांना स्वर्गसुखाची अनुभूती देत होती. यातल्या प्रत्येक गीतामागील कहाणी लक्षवेधी होती. ती सांगतांना पाडगावकर ज्या मिश्किलपणे ती खुलवत होते, तो आनंद तेच निर्माण करु जाणोत. त्यांनी लिहलेली बालगाणी, सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का.? टप टप करती अंगावरती प्राजक्ताची फुले, सावर रे सावर रे उंच झूला, झुले बाई झुला माझा…. यांची निर्मिती म्हणजे साक्षात परमेश्वराशी संवाद असं त्यांनी नमूद केलं. बालकांमध्ये परमेश्वर असतो, असं संत म्हणतात. त्या परमेश्वरांसाठी शब्द अर्पण करुन लिहिलेलं गीतं, म्हणजे त्याची प्रार्थनाच नाही कां.?
पाडगावकर जगण्याचं गहन तत्व सोपं करुन मांडतात. जीवन मृत्यू यांना शब्दधाग्यात ओवतात. आनंद – दुःख याला लयबध्दता देतात. अशी गीतं रसिकांच्या ओठांवर सहज विलसतात. तरुणांशी थेट संवाद साधताना, त्यांच्यातला मिश्किल कवी प्रेमाला सर्वव्यापी करतांना सांगतो, प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे, प्रेम असतं. तुमचं आणि आमचं सर्व सेम असतं. इश्क, लव्ह, प्यार, प्रीत शब्द वेगळे असले तरी प्रेमाची एकच रित. हे वैश्विक सत्य पाडगावकर किती सहज मांडतात. या गीतातून ते पिढ्यांचं, धर्माचं, जातीचं, गरीब आणि श्रीमंत यांच्यातलं अंतर सहज कमी करुन टाकतात. सर्व प्रेम करणाऱ्यांना ते एकाच पातळीवर घेवून येतात. मात्र, प्रेम हे निखळ, शुध्द, प्रामाणिक असावं ! हे सांगायला त्यांची गीतं विसरत नाहीत. जिवन कसं जगायचं ? हे सांगतांना ते म्हणतात, सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत.? तुम्हीच ठरवा. खरंच आहे हे. आपलं जीवन आनंदी करायचं की दुःखी ? हे आपल्याच हाती आहे. तोच मंत्र पाडगावकर देतात.
पाडगावकरांची धारानृत्य, मोरु, जिप्सी, सलाम, आनंदाचे डोही, उदासबोध, उत्सव, कबीर हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर या त्रिकूटाने मराठी कविता वाचनाचे कार्यक्रम, तिकिट लावून लोकप्रिय केले. मराठी कविता मनामनात, घराघरात पोहोचविली. त्यांनी अनेक भाषांतरही केली आहेत. ही साहित्य सेवा इतकी महान आहे की त्यांना त्यासाठी २००८ साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. तत्पूर्वी १९८० साली त्यांना सलाम या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. भारत सरकारने त्यांच्या शब्दसाधनेला मानाचा मुजरा करत, २०१३ ला त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत केले. सुरवातीच्या काळात पाडगावकर प्राध्यापक म्हणून सेवेत होते. नंतर त्यांनी साधनाला संपादकीय विभागात काम केले. पुढे आकाशवाणीत निर्माता म्हणून सेवेत लागले. या ठिकाणी त्यांच्या सोबत साक्षात पु. ल. देशपांडे सहकारी होते. एव्हढा महान साहित्यिक असून त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लाभलं नाही ही शोकांतिका. ती भर, त्यांना २०१० साली, दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देवून, भरुन काढण्यात आली.
पाडगावकरांचा यशोदाबाईंशी आंतर्धमीय विवाह केला होता. आपण जात, धर्म, पंथ, वंश मानत नाही, असं ते म्हणत. मी फक्त माणसाला ओळखतो आणि माणुसकी मानतो ही त्यांची विचार प्रणाली, संतांच्या परंपरेशी नातं सांगणारी होती. आपल्या पत्नीलाच ते आपल्या कवितेची प्रेरणा मानत. काॅलेजला असतांना, पाडगावकरांनी यशोदाबाईंना पहिल्यांदा प्रपोज केलं. त्यांनी होकार भरला. आणि, त्याच क्षणी या कवीच्या मनात, एक कविता जन्माला आली. मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं. आणि, सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं. हे गीत निखळ प्रेमाची साक्ष बनलं. ३० डिसेंबर २०१५ ला पाडगावकरांनी या जगाचा निरोप घेतला. अखेरचे येतील माझ्या, हेच शब्द ओठी. लाख चूका असतील केल्या, केली पण प्रीती असं म्हणत हा प्रेमाला अजरामर करणारा शब्दप्रभू देहरुपाने इहलोक सोडून गेला. मात्र, त्यांचेच शब्द या जगण्यावर, या जन्मावर, शतदा प्रेम करावे.! हा मोलाचा संदेश देवून गेला. जो कधीही मिटू शकणार नाही. अश्या या शब्दप्रभूंच्या सानिध्यात घालवलेले क्षण, मला अत्तर क्षणच वाटतात. त्यांचा दरवळ माझं जगणं सुगंधी करतो.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पाच हजार रुपयांची लाच घेताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकाला रंगेहात अटक. पाच हजार रुपयांची लाच घेताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकाला रंगेहात अटक.
आधुनिक केसरी न्यूज चंद्रशेखर अहिरराव  साक्री : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे कर्जाच्या व्याज परताव्याचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाकडे पाठवण्यासाठी...
आक्षेपार्ह फलक प्रकरण योग्य चौकशी करा : प्रशांत कदम
शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाच्या 'विक्री'! शहरात लागलेल्या फलकांमुळे खळबळ
तहसीलदारांनी केला नदीच्या पाण्यातून ट्रॅक्टरचा पाठलाग  तहसीलदार मुंगाजी काकडे यांच्या धाडसाने वाळू तस्कर हादरले
ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..!
आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री महोदययांची मुंबई येथे भेट  
बँकेतील सहकारासाठी शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे भाजपात ; सीडीसीसी बँकेवर भाजपची सत्ता बसणार?