हिंदोळा : हरवले रे बालपण..!
© कस्तुरी देवरुखकर ,मुंबई,संपर्क : ८२९११४९९९२. बालपणाचा तो सोहळा अजूनहीश्वासात आहे,अल्लडपणाचा ऋतू कोवळा अजूनही डोळ्यात आहे..! बालपण म्हटलं की..दंगा,मस्ती, फुलपाखरासम बागडणे आलेच. आता शालेय विद्यार्थांच्या उन्हाळी सुट्टया सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी उन्हाळी सुट्टी म्हणजे बैठे खेळ, मैदानी खेळ, सहल, रंगारंग कार्यक्रम असे समीकरण ठरलेले असायचे. आजकाल या मध्ये काळानुरूप बदल झाला आहे. मुलांच्या हातात खेळाचे… Continue reading हिंदोळा : हरवले रे बालपण..!
© कस्तुरी देवरुखकर ,मुंबई,
संपर्क : ८२९११४९९९२.


बालपणाचा तो सोहळा अजूनही
श्वासात आहे,
अल्लडपणाचा ऋतू कोवळा अजूनही डोळ्यात आहे..!
बालपण म्हटलं की..दंगा,मस्ती, फुलपाखरासम बागडणे आलेच. आता शालेय विद्यार्थांच्या उन्हाळी सुट्टया सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी उन्हाळी सुट्टी म्हणजे बैठे खेळ, मैदानी खेळ, सहल, रंगारंग कार्यक्रम असे समीकरण ठरलेले असायचे. आजकाल या मध्ये काळानुरूप बदल झाला आहे. मुलांच्या हातात खेळाचे साहित्य जाऊन त्याची जागा इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी घेतली आहे. जसे की विडीओ गेम, मोबाईल..इ.
कहर म्हणजे हल्ली मुले सापशीडी, लुडो, बुध्दीबळ सारखे खेळ मोबाईल अँपवर सर्रास खेळताना दिसतात. ती बालपणातली निखळ गंमत जमंत कुठेतरी हरवल्या सारखी वाटतेय.
माझे बालपण ज्या चाळीत गेले त्या चाळीत तब्बल चाळीस कुटुंब वास्तव्य करत होती. त्यामुळे बाल मित्र मैत्रिणींची संख्या पटीने जास्तच. वार्षिक परिक्षेचा शेवटचा पेपर झाला की, शाळेच्या आवारातून बाहेर पडताना आमचा मैत्री परिवार बोरं,चिंच,आवळे, कच्ची बडीशेब,पेरू..तत्सम चटकदार जिन्नसांकडे मोर्चा वळवायचा. मग काय, गाभुळलेल्या चिंचा,लाल चुटूक टपोरी बोरं..जिभेचे चोचले पुरवत, गप्पा गोष्टी करत रमत गमत घरी परतणे व्हायचे. घरी आल्यावर पाठीवरले दफ्तराचे ओझे एका कोप-यात ठेवून, “आता दोन महिन्यांनी त्यांचे दर्शन घ्यायचे” असा मनाशी ठाम निश्चय करून खेळाच्या मैदानाकडे कूच करायचो. दुस-या दिवशी सूर्य उगवल्या पासून ते मावळे पर्यंतचा दिनक्रम ठरलेला असायचा. सुट्टीतला एकही दिवस न खेळता वाया जाऊ नये अशी योजनाच आखलेली असायची म्हणा ना..!
सकाळचे चार तास आणि संध्याकाळचे चार तास “खोखो, कबड्डी, लंगडी, छप्पी छप्पी ,लगोरी,दोरीवरल्या उड्या, नाव नाव कोणते, रंग रंग कोणता..? डोंगर की पाणी,पकडा पकडी,आंधळी कोशिंबीर..”आदी मैदानी खेळ खेळले जायचे.
तर दुपारचे तीन तास ऊन माथ्यावर आल्यामुळे या कालावधीत जेवण करून झाल्यानंतर “नाव-गाव-फळ-फुल, चोर पोलिस चिठ्ठया,सागरगोटे,नवा व्यापार,कँरम बोर्ड, पत्ते,सापशिडी..” सारख्या बैठ्या खेळांनी सुट्टीत धम्माल उडवून द्यायचो. बरे हे बैठे खेळ कोणाच्या घरात बसून न खेळता उंबरठ्या बाहेर चटई अथवा सतरंजी हंतरून भारतीय बैठक व्यवस्था केली जायची. दारा समोर डोलणारा आंब्याचा डेरेदार वृक्ष,त्यावर लगडणा-या हिरव्या कंच कोवळ्या कै-या पाहताना अन् अचानक येणारी थंड हवेची मंद शिरशिरी झेलताना वाटायचे, ह्या आम्रवृक्षावर आलेला मोहोर, त्याचा आल्हाददायक सुगंध माझ्या नसा नसात भिनून तना मनाला मोहरून जातोय.
कधी भातुकलीचा डाव रंगायचा. चिमुकले स्वयंपाकघर,इवलीशी भांडी, पोलपाट लाटणे, कप बशी, हंडा कळशी..असा घरंदाज थाट. “कट्टी बट्टी” नामक निराळाच खेळ अस्तित्वात होता.खेळच म्हणता येईल कारण, अल्लडपणे लुटूपुटू च्या भांडणात कट्टी घेऊन रूसवा-फुगवा, अबोला धरल्यावर तुमच्या सख्या लाडीगोडी लावायला येणार हे माहित असल्याने कट्टी घेण्याचे नाट्य रंगायचे. तो राग क्षणिक असायचा..मैत्रिणीने मनधरणी केल्यावर लगेच निघून जाणारा. वाढत्या वया बरोबर, जाणीवा प्रगल्ब झाल्यावर रागाचे स्वरूप अहंकारात होते हे कटू सत्य आहे. विचार करायला लावणारी बाब आहे. अजाण वयातील सवंगड्यांना सहजा सहजी माफ करून मोठेपणा दर्शवणारे आपण,आज जर कोणी अंतकरणातून चूक कबूल करून दिलगीरी व्यक्त करत असेल तर त्या व्यक्तीला चटकन माफ करण्याचे औदार्य दाखवतो का..?
तर नाही. तशी कृती क्वचितच घडत असेल.
चाळीतील माझा सर्वांत आवडता सोहळा कुठला असेल तर ती,
“श्री सत्यनारायणाची महापूजा”.हा कार्यक्रम सार्वजनिक असल्याने सर्व कुटुंब समावेशक असायचा. दोन दिवस अगोदर “चमचा गोटी, पळण्याची शर्यत, बटाटा शर्यत..”इत्यादी स्पर्धा घेतल्या जायच्या. पूजेच्या दिवशी नृत्य,गायन असे कलाविष्कार सादर करायचे असल्याने त्याचे नियोजन आठ दिवस अगोदर चालायचे. संपूर्ण चाळ लाल,हिरव्या,पिवळ्या, जांभूळी त्रिकोणी पताकांच्या माळांनी सुशोभित होत दृष्टीस पडताना प्रसन्न वाटायचे. पूजेचा दिवस आम्हा मुलांची स्वयंघोषीत शालेय रजाच.
दिवसभर नवे कपडे घालून आनंदी मुद्रेने चाळभर हिंडणे,पूजेला येणा-या जाणा-यां वडीलधा-या मंडळीं कडून कौतुक करून घेणे,आठवडाभर सराव करून बसवलेले नृत्य,नाटक असे कलेचे नमुने सादरणीकरण करणे,गाण्यांच्या भेंड्या..हे सोपस्कार पार पाडून झाले की, रात्री भाड्याने आणलेल्या विसियारवर सर्वां सोबत सिनेमे पाहण्याचा खास बेत असायचा. त्यावेळी दूरदर्शन संचावर नेमक्याच वाहिन्या प्रसारित व्हायच्या. नव नवीन सिनेमे चित्रपट गृहात जाऊन पहावे लागे. घरोघरी विसियार नव्हते. त्यामुळे अर्थातच अप्रूप वाटे. चाळीतले काका-काकू,आई- बाबा, ताई-दादा, कच्चा लिंबू कंपनी सारेच एकत्र बसून या सिनेमांची गंमत अनुभवायचे. आता सतराशे पन्नास वाहिन्या प्रसारित होतात त्यावर मोठ्या संख्येने सिनेमांचे पेव फुटलेले असले तरी होणा-या मनोरंजनात ती मजा वाटत नाही.
बालपणीचा एक गंमतीशीर किस्सा सांगते. मी आणि माझ्या पाच सहा मैत्रिणी खेळता खेळता घरापासून लांब अंतरावर निघून आलो होतो. वाटेत सुंदरस उंबराच झाड दिसल. त्या झाडाखाली परिपक्व झालेली उंबराची मधाळ फळे पडली होती.मोह आवरेना. ती फळे उचलून खायला सुरवात केली. त्यांची अवीट गोडी चाखल्यावर घराचा विसर पडला. खेळायला जाऊन बराच काळ लोटल्याने आई काळजीत होती. आजूबाजूला शोधाशोध करून आम्ही न सापडल्याने चिडलेल्या माता दुर्गावतार धारण करत,मागोवा घेत घेत आमच्या समोर उभ्या ठाकल्या. त्यांचा लालबुंद चेहरा सांगत होता, “आता घरी चला. तुमची खैर नाही.” अपेक्षेप्रमाणे बेदम मार खाल्ला. मला खरे तर प्रश्न पडला होता, आईने नेमके का मारले? उंबराची पडलेली फळे खाल्ली म्हणून..की न सांगता घरा पासून लांब आलो म्हणून..!
असो,अशा सप्तरंगी क्षण धाग्यांनी तर बालपणीचा गालिचा विणला आहे. आजच्या व्यवहारी युगात नातेवाईकांना, आप्तेष्टांना एकमेकांकडे जायला वेळ नाही. घरात मुलांच्या आवडी निवडी कडे लक्ष द्यायला वेळ नाही. समाज आत्मकेंद्री होत चाललाय. माझ्या चौसष्ट क्षेत्रफळाच्या लहान घरात येणारे पै पाहूणे, आपुलकीचा सहवास, कुठलाही उत्सव स्व: कुटुंबा पूरता मर्यादित नसून एकोप्याने सामुदायिक रित्या साजरा करायचा असतो व एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होण्यातच माणूसपण आहे हे शिकवणारी चाळ संस्कृती नजरेआड झाल्याची खंत वाटतेय.
बालविश्वातले मोकळे आकाश अती यांत्रिकीकरण, बेगडी जीवन पध्दतीच्या मायाजालामुळे झाकोळले गेले आहे. माझ्या बालपणाची मालिका नजरेच्या पटलावर चित्रित होताना…”मामाचे पत्र हरवले” खेळताना लागलेला सूर आठवतो. एक तीव्र ईच्छा आहे,अशावेळी जेव्हा माझे ओठ आपसूक गुणगुणतात “आमचे बालपण हरवले” तेव्हा माझ्या मुलांच्या तोंडून पुढले वाक्य यावे..
“ते आम्हाला सापडले.”
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List