पिंपरी शिवारातील शेततळ्यात चौदा वर्षीय साई घुनावत मृतावस्थेत आढळला; आई-वडिलांचा घातपाताचा आरोप खुलताबाद तालुक्यात खळबळ एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने हळहळ
आधुनिक केसरी न्यूज
किशोर जाधव
खुलताबाद : तालुक्यातील पिंपरी शिवारात गुरुवारी (दि. ४ जुलै) दुपारी १ वाजेच्या सुमारास एका शेततळ्यात चौदा वर्षीय मुलगा मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. साई बाबुलाल घुणावत (वय १४) असे मृत मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील गट क्रमांक ८० मधील शेतकरी सुकलाल भिका महेर यांच्या शेतातील शेततळ्यात साईचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला. साई हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, साईच्या आई-वडिलांनी या घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार बीट जमादार राकेश आव्हाड करीत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List