गुगल सर्चचा कायापालट; शोधापासून संवादाकडे..!

गुगल सर्चचा कायापालट; शोधापासून संवादाकडे..!

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : आपण सर्वजण गुगल सर्चचा विपुल वापर करतो. मी तर तब्बल गेल्या २६ वर्षांपासून  याचा खूप वापर करत आहे. प्रारंभीच्या काळातील याहू, नेटस्केप नेव्हीगेटर, वेब क्रॉलर, गोफर आदींसारख्या प्रतिस्पर्ध्यांना गारद करत गुगलने सर्चमध्ये एकछत्री अंमल प्रस्थापित केला. अर्थात, याचमुळे अब्जावधी इंटरनेट युजर्ससाठी गुगलचा सर्च बॉक्स जीवाभावाचा बनला. हाच सर्वांचा चिरपरिचीत सर्च बॉक्स आता आमूलाग्र बदलणार असून याची नांदी आय/ओ २०२६ या वार्षीक परिषदेत झडली आहे. याचा तुमच्या-आमच्यासह सर्वांच्या वापरावर विलक्षण परिणाम होणार आहे.

*शेखर पाटील* 

इंटरनेटच्या विश्वात अब्जावधी वेब पेजेस असून यातील युजरला हवी असणारी अचूक माहिती काढून देण्यात गुगलची बरोबरी कुणी करू शकली नाही. गुगलने पेजरँक अल्गोरिदमच्या माध्यमातून बिनचूक माहिती देण्याची प्रणाली विकसित केली असून गत पाव शतकात याचा अब्जावधी युजर्सला लाभ झाला. यात कुणालाही हवी असणाऱ्या माहितीचा कि-वर्ड गुगलच्या सर्च बॉक्समध्ये टाकताच क्षणार्धात त्या व्यक्तीला त्या टर्मशी संबंधीत माहितीच्या लिंक्स दिसू लागतात. यातील  पहिल्या पेजवर दहा लिंक असून नंतर प्रत्येकी दहा लिंक्सचे पेजेस युजरसमोर  उघडतात. आधी फक्त वेबपेजेसची माहिती देणाऱ्या गुगलचा गत सत्तावीस वर्षात  प्रचंड विस्तार झाला. यामुळे यात आता वेब पेजेससह प्रतिमा, व्हिडीओ, बातम्या, मॅप्स, पुस्तके, शॉपींग आदींची बिनचूक माहिती मिळते. गुगल आता हीच आपली प्रणाली मुळापासून बदलण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

https://shekharpatil.in

खरं तर, डेटाच्या विशालकाय महासागरात गुगलने एक वाटाड्या आणि दीपस्तंभ म्हणून आपली भूमिका अतिशय चोखपणे पार पाडली आहे. यामुळे केवळ युजर्सला माहितीच मिळाली नाही तर यातून आधुनिक डिजिटल अर्थव्यस्था देखील आकारास आली. त्याने  'सर्च-क्लिक-ब्राउझ' ही वर्तणूक निर्माण केली, जिने सामूहिक मानवी अनुभवाशी असलेल्या आपल्या संवादाला परिभाषित केले. एकीकडे गुगलचा प्रचंड पटीत विस्तार होत असतांनाच युजर्सला अचूक माहिती मिळण्यात अडचणी निर्माण होऊ  लागल्या. जगभरातील हुशार मंडळी कमअस्सल मजकूराला गुगलच्या अल्गोरिदमशी  सुसंगत करत पेजरँकमध्ये पुढे जाऊ लागल्याने युजर्सची कुचंबणा झाली.

यातच चॅटजीपीटीसारख्या एआय टुल्सचे आगमन झाले. ज्यामुळे युजरला संवादात्मक पध्दतीत सर्च टर्मची माहिती मिळू लागल्याने युजर तिकडे वळला. याची दखल घेत गुगलने देखील बदल स्वीकारले.  आधी सर्च जनरेटीव्ह एक्सपेरियन्स आणि  नंतरच्या काळात एआय ओव्हरव्ह्यूज सारख्या फिचर्सच्या माध्यमातून आपल्याला  याची चुणूक दिसली होती. आता गुगलने याचाही पुढचा टप्पा गाठण्याची तयारी सुरू केली आहे.

खालील व्हिडीओत पहा गुगलच्या बदलांची झलक !

https://youtu.be/p6EBMG8OEBI?si=WQO6WUt1XMz8OmDb

आय/ओ परिषदेच गुगलचा सर्च बॉक्स  आमूलाग्र पध्दतीत बदलणार असल्याची घोषणा करण्यात आली.  वास्तविक पाहता  गुगलने आपल्या सर्च बॉक्समध्ये आजवर बदल केला नव्हता. आता मात्र गुगलचा आत्मा असणारा सर्च बॉक्सच आमूलाग्र बदलणार आहे. आधी आपण टेक्स्टमध्ये सर्च  करून माहिती मिळवत होतो. यापुढे शब्दांच्या सोबतच प्रतिमा, व्हिडीओ, ऑडिओ आदींचा उपयोग करून देखील माहिती मिळवता येणार आहे. अर्थात, ही माहिती संवादात्मक स्वरूपात मिळेल. म्हणजे मी जळगावबाबत माहिती विचारली असता, गुगल तात्काळ जळगावशी संबंधीत माहितीचा संक्षीप्त गोषवारा मला सादर करेल. यात मला अजून काय हवे ? याबाबत मी संवाद साधून माहिती मिळवू शकेल. 

हा बदल इतका मोठा आहे की, इंटरनेटच्या इतिहासात तो “मोबाईल इंटरनेट क्रांती”  किंवा “सोशल मीडिया क्रांती” इतकाच प्रभावशाली मानला जात आहे. आज सर्चचा अर्थ फक्त शोध घेणे राहिलेला नाही; तो “उत्तर मिळवणे” असा झाला आहे. या बदलामुळे वेबसाइट्स, पत्रकारिता, ब्लॉगिंग, जाहिरात, ई-कॉमर्स, एसईओ, सोशल मीडिया, शिक्षण, डिजिटल अर्थव्यवस्था आणि अगदी मानवी विचार करण्याची पद्धतदेखील बदलत आहे. ही गोष्ट सामान्य वापरकर्त्यांसाठी अतिशय सोयीची वाटते. कारण वेळ वाचतो. माहिती संक्षिप्त आणि स्पष्ट मिळते. पण यामुळे इंटरनेटच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. कारण इंटरनेटची पारंपरिक रचना “ट्रॅफिक”वर आधारित होती. वेबसाइट्स लेख लिहायच्या, गुगल त्या  वेबसाइट्सना ट्रॅफिक द्यायचे, आणि त्या ट्रॅफिकमधून जाहिरात महसूल मिळायचा. आता मात्र कोणत्याही युजरला वेबसाइटवर जाण्याची गरजच उरत नाही.

यामुळे सर्वात मोठा फटका बसत आहे स्वतंत्र ब्लॉगर्स, न्यूज वेबसाइट्स आणि कंटेंट क्रिएटर्सना. कारण अनेक वर्षे त्यांनी गुगलसाठी कंटेंट तयार केला. पण आता  एआय त्या सर्व लेखांमधून माहिती घेऊन थेट उत्तर तयार करत आहे. याचा अर्थ असा की, आपला कंटेंट असून देखील युजर्स आपल्या वेबसाइटवर येतच नाही.  किंबहुना त्यांच्या येण्याचा मार्ग गुगलच्या बदलामुळे अवघड बनला आहे. याचाच अर्थ असा की, गुगलच्या नवीन अवताराचा युजरला मोठा लाभ होणार असून त्याला हवी ती उत्तरे अचूकपणे मिळण्यास मदत होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला जगभरातील कोट्यवधी वेबसाईटस् आणि कंटेंट क्रियेटर्स यांच्या मार्गात मात्र अडसर निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.  

गुगलच्या बदलामुळे इंटरनेट हळूहळू “वेबसाइट-आधारित” मॉडेलमधून “उत्तर-आधारित” प्रणालीत प्रवेश करत आहे. पूर्वी इंटरनेटवर नेव्हिगेशन महत्त्वाचे होते. आता “संवाद” महत्त्वाचा होत आहे. हे बदल अतिशय व्यापक असल्यामुळे भविष्यात वेबसाइट्सची रचना देखील बदलू शकते. आज वेबसाइट्स दोन प्रकारात विभागल्या जात आहेत. पहिल्या त्या ज्या फक्त माहिती देतात. दुसऱ्या त्या ज्या अनुभव देतात. माहिती देणाऱ्या वेबसाइट्सना एआय सहजपणे बदलू शकतो. पण अनुभव देणाऱ्या वेबसाइट्स - जसे समुदाय, व्हिडिओ, प्रत्यक्ष सेवा, इंटरॅक्टिव्ह साधने, विश्लेषणात्मक लेख, मानवी दृष्टिकोन यांना एआय बदलू न शकल्यामुळे त्यांचे महत्व वाढीस लागण्याची शक्यता आहे. 

आज बहुतांश वेबसाईट या माहिती देणाऱ्या असल्या तरी भविष्यातील वेबसाईट या संवादात्मक स्वरूपातील असतील असे तज्ज्ञांचे मत आहे. गुगलमधील हे बदल पत्रकारितेच्या मूळावर येणारे आहेत. कारण जर वेबसाईटपर्यंत युजर्सच पोहचणार नाहीत तर त्यांना ट्रॅफीक आणि यातून  उत्पन्न देखील मिळणार नाही. डिजीटल माध्यमामुळे आधीच मेनस्ट्रीम मीडियावर विपरीत परिणाम झाला असतांना आता गुगलच्या बदलांमुळे माध्यमांच्या समोरील आव्हान हे अजून कठीण होणार आहे. याहून महत्वाची बाब म्हणजे या बदलांमुळे युजर्सला अतिशय अचूक माहिती सहजसोप्या प्रवाही व संवादात्मक स्वरूपात मिळणारी असली तरी याचे संपादन हे गुगलचा एआय अल्गोरीदम करणार असल्याने ते निरपेक्ष असेलच याची खात्री कुणालाही देता येणार नाही. 

गुगल सर्चमधील अजून अतिशय बाल्यावास्थेत असलेला एक बदल म्हणजे आता एआय एआय एजंट हे देखील युजर्सच्या मदतीला येणार आहेत. यात पहिल्यांदा इन्फॉर्मेशन एजंट सादर करण्यात आले असून ते युजरची आवड-निवड लक्षात घेऊन त्याला हवी असणारी माहिती जमा करून ती सुटसुटीत स्वरूपात सादर करेल.  विशेष बाब म्हणजे हे काम अहोरात्र सुरू राहणार असून युजर ऑनलाईन नसतांना देखील हा एजंट त्याचे काम करत राहील. याच्याच पुढील टप्पा देखील लवकरच येणार आहे. यात समजा मी जळगावहून मुंबईला जाण्याचे ट्रेनचे तिकिट शोधतोय, तर गुगल फक्त माहितीच देणार नाही, तर माझ्या वतीने माझा एजंट थेट तिकिट खरेदीचेही काम करू शकणार आहे. म्हणजेच गुगलचा प्रवास हा शोधाकडून संवादाकडे असा होत असतांनाच पुढील टप्पा हा मदतनीसाचा देखील राहणार असल्याचे आपल्याला समजून घ्यावे लागेल.

भविष्यातील इंटरनेट कदाचित अधिक वैयक्तिक असेल. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे उत्तर,  वेगळी माहिती आणि वेगळा अनुभव तयार केला जाईल. एआय प्रत्येक युजरची आवड, भाषा, स्थान, सवयी आणि उद्दिष्टे समजून घेईल. म्हणजेच इंटरनेट सार्वत्रिक नसून पर्सनलाईज्ज म्हणजे “व्यक्तिनिष्ठ” होऊ शकते. भारतातील संदर्भात पाहिले, तर हा बदल आणखी मोठा ठरू शकतो. कारण भारतात अनेक लोक प्रथमच इंटरनेट वापरत आहेत आणि  त्यांच्यासाठी एआय-आधारित संवाद सर्चपेक्षा अधिक नैसर्गिक वाटतो. स्थानिक भाषांमधील एआय सर्चमुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. मराठी, हिंदी, तमिळ, बंगाली किंवा इतर भाषांमधील वापरकर्त्यांना आता इंग्रजीवर  अवलंबून राहावे लागणार नाही.

यामुळे प्रादेशिक कंटेंटला मोठी संधी आहे. अलीकडेच गुगलने आपल्या कि-बोर्डमध्ये अहिराणी बोलीस दिलेले स्थान हे बाबत लक्षणीय मानता येईल. पण त्याचवेळी गुणवत्तेचे आव्हानदेखील आहे. कारण एआयला योग्य आणि समृद्ध स्थानिक भाषिक डेटा हवा असतो. त्यामुळे स्थानिक पत्रकारिता, सांस्कृतिक लेखन आणि प्रादेशिक ज्ञान यांचे मूल्य वाढू शकते. ज्या  प्रकारे मुद्रणयंत्राने ज्ञानाचा प्रसार बदलला, रेडिओने संवाद बदलला, टेलिव्हिजनने माहितीचे स्वरूप बदलले आणि सोशल मीडियाने समाजाचे मानसशास्त्र बदलले, त्याच प्रकारे एआय-संचालित सर्च इंटरनेटची पुढची व्याख्या ठरवत आहे.

आणि म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न “गुगल कसे बदलत आहे?” हा नसून - “या बदलानंतर इंटरनेट कसे दिसेल?” हा आहे. कदाचित भविष्यात इंटरनेटवर कमी क्लिक असतील, पण अधिक संवाद असतील. कमी वेबसाइट्स उघडल्या जातील, पण अधिक थेट उत्तरे मिळतील. कमी माहिती वाचली जाईल, पण अधिक  संक्षिप्त निष्कर्ष मिळतील. आणि त्या जगात मानवी सर्जनशीलता, विश्वासार्हता आणि मौलिकता यांची किंमत पूर्वीपेक्षा अधिक असेल. कारण  एआय माहिती निर्माण करू शकतो, पण अर्थ निर्माण करण्याची क्षमता अजूनही माणसाकडेच आहे.  

गेल्या तीन दशकात आपण इंटरनेटला अनेकदा रूप बदलताना पाहिले आहे. वेब १.० हे केवळ माहिती वाचण्याचे साधन होते, वेब २.० ने सोशल मीडिया आणि कन्टेंट निर्मितीच्या माध्यमातून युझर्सना संवाद साधण्याची संधी दिली. वेब ३.० अर्थात सेमेंटिक वेब मध्ये माहितीचे विकेंद्रीकरण झाले. तर आता आपण वेबच्या विकासाच्या ४.० म्हणजे चौथ्या टप्प्यात असतांना मानव आणि मशीन यांच्यातील संवादाच्या युगात प्रवेश करत आहोत, त्याला 'एआय-चालित वेब' म्हणता येईल. 

गुगल सर्चमधील हे बदल केवळ एका सर्च इंजिनचे परिवर्तन नसून, ते संपूर्ण इंटरनेटला एका नव्या साच्यात बसवत आहेत. हे नवे इंटरनेट अधिक हुशार, वेगवान  आणि थेट उत्तरे देणारे आहे, पण त्याच वेळी ते मूळ कन्टेंट क्रिएटर्ससाठी आव्हानात्मक आहे. या नव्या डिजिटल जगात टिकून राहण्यासाठी केवळ माहिती देणे पुरेसे नाही, तर ती माहिती अत्यंत विश्वासार्ह, सखोल आणि मानवी अनुभवाने समृद्ध असणे गरजेचे आहे. इंटरनेट बदलत आहे, आणि त्यासोबतच तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आपली संस्कृतीही एका नव्या उंचीवर पोहोचत आहे.

गुगल  सर्चमधील हे बदल म्हणजे केवळ एक तांत्रिक सुधारणा नसून माहितीशी असलेल्या आपल्या नात्याला आमूलाग्र बदलून टाकणारी आहे. इंटरनेट आता 'स्थिर पानांच्या' जगातून 'जिवंत आणि प्रवाही संवादाच्या' जगात प्रवेश करत आहे. जरी एआय आपल्याला वेगाने माहिती पुरवत असला आणि निष्कर्ष काढून देत असला, तरी त्या माहितीला 'अर्थ' देण्याचे काम मानवी प्रज्ञाच करू शकते. भविष्यातील इंटरनेटमध्ये 'विश्वास' हेच सर्वात मौल्यवान चलन ठरेल. माहितीच्या या अथांग प्रवाहात एआय आपल्याला वेग देऊ शकतो, परंतु दिशा देण्याचे आणि अनुभवाचा अर्थ लावण्याचे सामर्थ्य केवळ मानवी सर्जनशीलतेतच असेल. मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील हा सुसंवादच येणाऱ्या 'नव्या इंटरनेट'चा भवितव्य ठरवेल. तूर्तास गुगलचा होणारा कायापालट आपण सर्वांनी डोळसपणे अनुभवावा हेच उत्तम !

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शेखर गोरे नाराज; ९ जूनला कार्यकर्त्यांची बैठक, पुढील भूमिकेकडे लक्ष शेखर गोरे नाराज; ९ जूनला कार्यकर्त्यांची बैठक, पुढील भूमिकेकडे लक्ष
आधुनिक केसरी न्यूज  सचिन सरतापे  म्हसवड : सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर...
गुगल सर्चचा कायापालट; शोधापासून संवादाकडे..!
परतूर शहरात व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून पैशाची बॅग पळवण्याचा प्रयत्न आरोपी इस्पितळात तर आरोपी फरार 
सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
माढा विधानसभा चे आमदार अभिजीत पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे कोळेगाव धरणातून सिना नदीला पाणी सोडण्याची केली मागणी
राजुरा हत्याकांड : हर्षवर्धन सपकाळ रोहित पवार यांचा जळगाव पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या..!
कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार : हर्षवर्धन सपकाळ