गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे

प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या ‘ऊब ही महीतली’ पुस्तकाचे प्रकाशन

गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे

आधुनिक केसरी न्यूज 

छत्रपती संभाजीनगर : गुरूंचा महिमा आपल्याला संतांनी सांगितला आणि त्यांच्या ग्रंथांतून तो आपल्याला आजही वाचायला मिळतो. तीच परंपरा आजही अनेकदा पाहायला मिळते. आजच्या कार्यक्रमात एका गुरु-शिष्याचे हेच नाते दिसून येत असून ‘ऊब ही महीतली’ या शीर्षकातला ऊब हा शब्द सर्जनाचे प्रतिनिधित्व करतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. कैलास अंभुरे यांनी केले. पक्षी आपली अंडी उबवताना अंड्यांना ऊब देत नवनिर्मिती करतात, त्याच अर्थाने एका गुरुकडून सर्जनशीलपणे शिष्याचे ज्ञानपोषण कसे होते हे या निमित्ताने पाहायला मिळत असल्याचे उद्गारही अंभुरे यांनी काढले. सुप्रसिद्ध समीक्षक सुधीर रसाळ यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध कंगोर्‍यांना कविवर्य प्रा. इंद्रजित भालेराव यांनी सजवलेल्या ‘ऊब ही महीतली’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. या कौटुंबिक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. कैलास अंभुरे आणि प्राचार्य विवेक मिरगणे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

प्राइड सेंचुरी कम्युनिटी हॉलमध्ये झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक, प्रकाशक बाबा भांड, बा. भो. शास्त्री, कविवर्य फ. मुं. शिंदे, नंदिनी चपळगावकर, प्रवीण बर्दापूरकर, अनंतराव उमरीकर, हनुमानदास वर्मा, राधाकृष्ण मुळी, कविवर्य दासू वैद्य आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना अंभुरे म्हणाले की, हे पुस्तक म्हणजे इंद्रजित भालेराव यांच्या मनात आपल्या गुरुवर्यांबद्दल असलेला आदर, व्याकुळता, आर्तता, गुरुनिष्ठा आदी सर्वच भावनांचा सुंदर मेळा असून रसाळ सरांच्या साहित्यविषयक, समीक्षाविषयक अनेक गुणांचे पदर या पुस्तकातून उलगडले गेले आहेत. एखाद्या विषयासाठी वाहून घेऊन तळमळीने एखादे काम उभे करणे म्हणजे काय असते हे रसाळ सरांकडून आजच्या आमच्या पिढीने समजून उमजून घेतले पाहिजे असेही यावेळी अंभुरे म्हणाले.
सुधीर रसाळ आणि त्यांच्या पत्नी सुमती रसाळ यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या सत्कारानंतर बालाजी काळे यांनी ‘सुंदर ते ध्यान’ हा अभंग गाऊन सभागृहातले वातावरण प्रसन्न केले. त्यानंतर  उपस्थित पाहुण्याचे स्वागत  आदित्य प्रकाशनाचे प्रकाशक विलास फुटाणे यांनी केले त्यानंतर इंद्रजित भालेराव यांनी आपल्या प्रास्ताविकात रसाळ सरांबद्दलच्या भावना व्यक्त करत पुस्तकाचा उद्देश स्पष्ट केला. प्राचार्य विवेक मिरगणे यांनी यावेळी रसाळ सरांच्या कारकीर्दीतल्या अनेक आठवणी सांगून त्यांच्या शिकवण्याच्या वैशिष्ट्याचे आजही महात्म्य टिकून असून आजची प्राध्यापकांची पिढी त्यांच्याच पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यांचे शिकवणे जीवाचा कान करून ऐकणारे विद्यार्थी आजही त्यांचा अभिमानाने उल्लेख करत असतात, असे सांगून रसाळ सरांनी, मसाप किंवा सरस्वती भुवन या संस्थांसाठी ज्या निकोपपणे काम केले, ते आजही आम्ही विसरलेलो नाही आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सरस्वती भुवन संस्था पुढे नेत राहू, असेही मिरगणे यांनी याप्रसंगी त्यांना आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण चव्हाळ यांनी केले, तर बबन आव्हाड यांनी आभार मानले.

इंद्रजितने माझे चरित्रच उभे केले
आज या अवचित कार्यक्रमामुळे मी संकोचून गेलो आहे आणि आनंदूनही गेलो आहे. कारण एक शेतकर्‍याचा मुलगा साहित्यात रुची ठेवून रसज्ञ होतो, नरहर कुरुंदकरांसारख्या मोठ्या समीक्षकाच्या सान्निध्यात राहून साहित्य समजून घेतो हे पाहताना मला फार आनंद व्हायचा. त्याचे प्रेमळ बोलणे मला जास्त भावून जाते अशी भावना सत्कारमूर्ती सुधीर रसाळ यांनी बोलून दाखवली. या पुस्तकातून माझ्या साहित्याच्या अंगाने माझे चरित्रच त्याने उभे केल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पोटच्या लेकरांना विहिरीत टाकून बापाने केली आत्महत्या; जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना  पोटच्या लेकरांना विहिरीत टाकून बापाने केली आत्महत्या; जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना 
आधुनिक केसरी न्यूज  सागर झनके जळगाव जा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भालांजन गावाशेजारी असलेल्या...
शेतकऱ्याच्या गोठ्याला आग अंदाजे चार लाखाचे नुकसान आल्फर येथील घटना
मुखेड पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी व सेवा निवृत्त विस्तार यांच्या विरोधात; मुखेड पोलिस ठाण्यात २० हजार रुपयांची लाच घेतल्याचा गुन्हा दाखल 
गुंजेवाहीच्या जंगलात वाघाचा भयानक हल्ला एकाच वेळी चार महिलांचा मृत्यू
रोटाव्हेटरवर पडून शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
डॉ मोटेगावकर यांच्या क्लासेससह खाजगी कोचिंग क्लासेस अघोषित बंद 
बनायेंगे मंदिर या गुन्ह्यातून जिल्हा चिटणीस तथा कारसेवक किशोरसिंह चौहान यांच्यासह 12 आरोपींची निर्दोष मुक्तता