लोहा शहरातील लॉजवर पोलिसांचा धडक छापा; अनैतिक व्यवसायाविरोधात मोठी कारवाई
आधुनिक केसरी न्यूज
लोहा : शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून गंगाखेड रोड, नांदेड रोड, कंधार रोड तसेच लातूर रोड परिसरात अनेक नवीन लॉज सुरू करण्यात आले आहेत. व्यापार, बांधकाम तसेच विविध व्यावसायिक कारणांमुळे बाहेरील नागरिकांची शहरात मोठी वर्दळ वाढल्याने लॉज व्यवसायातही झपाट्याने वाढ झाली होती. मात्र, शहरातील काही लॉजमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात होत्या. विशेषतः काही ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकारांबाबत नाराजी व्यक्त करत पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, चंद्रकांत जाधव तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राम केदार यांच्या पथकाने शहरातील विविध लॉजवर अचानक धाडसत्र राबवत मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी लोहा शहरातील विविध लॉजची तपासणी केली असता अनेक ठिकाणी संशयास्पद हालचाली आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. काही लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचेही समजते. या प्रकरणी संबंधित लॉज चालक, व्यवस्थापक तसेच आठ जोडप्यांविरोधात लोहा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांच्या या अचानक कारवाईमुळे शहरातील लॉज व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी मात्र या कारवाईचे स्वागत केले आहे.दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
लोहा शहरात एकेकाळी मोठ्या प्रमाणात देहविक्री व्यवसाय सुरू होता. मात्र यातून एड्स रोगामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी १९९६-१९९७ मध्ये स्वतः पुढाकार घेऊन व शिवसैनिकांना पाठवून देहविक्री करणाऱ्या महिलांना शहराबाहेर पिटाळून लावून लोहा शहरातील वेश्याव्यवसाय पूर्णतः बंद पाडला होता. अनेक कुटुंबेच्या कुटुंबे या रोगाने उध्वस्त झाली होत होती. लोह्यात कोणी मुलगी द्यायला कुणी तयार होत नव्हते. किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कोणतीही बिमारी झाल्यास रुग्ण तपासासाठी गेला असता लोह्यातील प्रत्येक रुग्णास पहिली एड्स (HIV)या बिमारीचा रिपोर्ट आणावा लागत असे, सदरील देहविक्री करणाऱ्या महिलांसमोर तत्कालीन आमदार रोहिदास चव्हाण यांनी तीन पर्याय ठेवले होते. गरिबी असेल तर तुमच्या मुलाबाळांचा शिक्षणाचा भार मी उचलतो किंवा मोल मजुरीचा पर्याय उपलब्ध करून देतो. नाहीतर शहराच्या बाहेर निघून जा असे सांगितले होते. पण त्यांनी नाही ऐकल्यानंतर त्यांना शहराबाहेर पिटाळून लावले, त्यामुळे लोहा शहरातील अनेक पिढ्या एड्स पासून वाचल्या. कालांतराने सर्व सुरळीत असताना नांदेड - लातूर महामार्गावर अनेकांनी परमिट रूमच्या माध्यमातून व्यापारी व छोटे व्यवसायिक यांना व नागरिकांना मुक्कामी राहण्यासाठी शहर परिसरात थांबण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यामध्ये लोहा शहरासह पारडी शिवारात व बेरळी फाटा येथे परमिट रूमच्या माध्यमातून व लॉजिंगच्या माध्यमातून व्यवसायिक मंडळींनी कमाई सुरू केले. मात्र लॉजिंग मध्ये झटपट पैसे कमावण्याच्या मोहापायी मुक्कामी येणाऱ्या मंडळी कडून त्यांची आधार कार्ड व इतर ओळख या पुराव्याशिवाय त्यांना परमिट रूम मध्ये खोली देणे या प्रकारात मोठी वाढ झाली होती. त्यातून अनेक देहविक्री करणाऱ्या महिला मुली या दिवसाढवळ्या व रात्री - अपरात्री काही तासासाठी स्वतःसह लॉज मालकांचा गल्ला भरत असल्याची ओरड सामान्य नागरिकासह अनेकांतून होत होती. नुकत्याच झालेल्या छाप्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कायमस्वरूपी यावर आळा बसावा यासाठी लोकप्रतिनिधी सह पोलीस प्रशासन व सर्वसामान्य जागरूक नागरिकांनी मोठे पाऊले उचलणे सध्यातरी गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List