सगरोळी येथे ओव्हरलोड रेतीच्या हायवाखाली चिरडून एकाचा मृत्यू ;स्थानिक नागरीकांचा प्रशासना विरुद्ध प्रचंड संताप
आधुनिक केसरी न्यूज
बिलोली : देगलूर–बोधन मार्गावर सगरोळी येथे भरधाव व ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या हायव्याने एका व्यक्तीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली असून सगरोळी येथील विठ्ठल लवटे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाच्या निष्काळजी पणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बिलोली तालुक्यातील गंजगाव, माचनूर व बोळेगाव येथे सध्या रेती घाट सुरू आहेत. बोळेगाव येथून रेती भरून हायवा एम एच २० जी सी ०७९० क्रमांकाची हायवा सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास देगलूर कडे जात होता. याच दरम्यान सगरोळी येथील अनुसयानगर परिसरात रस्त्यावरून जात असलेल्या विठ्ठल लवटे यांना या हायव्याने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की लवटे यांचा जागीच मृत्यू झाला. मृत विठ्ठल लवटे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच आई-वडील असा परिवार आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवैध व ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे अशा अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित हायवा वेगात व नियमांकडे दुर्लक्ष करून धावत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने वेळोवेळी कारवाई न केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे.या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अवैध रेती वाहतूक तात्काळ बंद करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अशा प्रकरणांत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. घटनेचा पुढील तपास बिलोली पोलीस करत आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List