चिंचोली लिंबाजी येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जबाजारीपणा व पिकांचे नुकसान कारणीभूत
आधुनिक केसरी न्यूज
चिंचोली लिंबाजी : चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड) येथील तरुण शेतकरी दिपक किसन दांगोडे (वय ३५) यांनी शनिवार(ता.१२) पहाटे सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत दिपक दांगोडे हे शेती व्यवसाय करत होते. त्यांच्या वडिलांच्या नावे चिंचोली लि. शिवारातील गट क्रमांक ३७२ मध्ये सुमारे ०.८९ आर जमीन आहे. या जमिनीवर वि. वि. का. सेवा सहकारी सोसायटी, चिंचोली लिंबाजी यांचे सुमारे 37500 रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात येते. तसेच नातेवाईक व मित्रांकडूनही हात उसनवारी घेतल्याची माहिती सांगण्यात आली आहे. मात्र, हे कर्ज ७/१३ उताऱ्यावर नोंदलेले नसल्याचेही सांगितले जाते. यावर्षी खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी तसेच अलीकडील गारपीट व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे कर्जफेडीची चिंता वाढल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, मागील पंधरवड्यात कर्जबाजारीपणा व गारपीटीमुळे परिसरातील दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने तात्काळ मदत व योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List