लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे, जिल्हाधिकारी
मतदान केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी; गुलाब पुष्प देऊन मतदारांचे स्वागत
आधुनिक केसरी न्यूज
गडचिरोली, दि. २ : नगरपरिषद निवडणूक २०२५ अंतर्गत आज जिल्हाभरात सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. सकाळपासून विविध मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाची गती, सुविधा व व्यवस्थापनाची माहिती घेताना त्यांनी मतदानासाठी आलेल्या मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असून मतदानाचा हा लोकशाही उत्सव अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळा, कारमेल हायस्कूल, पी.एम. श्री पंडीत जवाहरलाल नेहरू नगरपरिषद शाळा, तसेच लांजेडा नगरपरिषद शाळा या मतदान केंद्रांना भेट दिली. प्रत्येक केंद्रावर मतदार यादी, मतदानाची टक्केवारी, ईव्हीएम मशीनची स्थिती, रांग व्यवस्थापन आणि मतदारांसाठी उपलब्ध सुविधा याची सविस्तर माहिती घेतली.
मतदानासाठी आलेल्या नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मूलभूत सुविधा – पिण्याचे पाणी, सावली, प्रवेशमार्ग – नियमानुसार उपलब्ध आहेत की नाहीत, याची त्यांनी विशेष तपासणी केली. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना मतदानात प्राधान्य देण्याच्या सूचनादेखील त्यांनी मतदान कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी गडचिरोली नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे व इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List