भिगवण कृषी उत्पन्न उपबाजारात आडतदारांचा अचानक संप; शेतकरी नाराज
आधुनिक केसरी न्यूज
निलेश मोरे
भिगवण : कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरच्या उपबाजार भिगवण येथे रविवारी(दि.२६)रोजी सकाळपासून आडतदारांनी अचानक संप पुकारल्याने व्यवहार ठप्प झाले. यामुळे माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना गाड्यांवरच माल ठेवावा लागला, वाहतूक खर्च वाढला आणि विक्री न झाल्याने आर्थिक ताण निर्माण झाला. अचानकपणे उद्भवलेल्या संपामुळे काही वेळ पुणे–सोलापूर सेवा मार्गावर वाहतूक जाम झाली. माल घेऊन येणारी आणि जाणारी वाहने यामुळे दुतर्फा वाहतूक विस्कळीत झाली, तर शेतकऱ्यांना माल माघारी घेऊन जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यावेळी शेतकऱ्यांनी आपली प्रचंड नाराजी व्यक्त केली आणि होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोणाला धरायचे हा प्रश्न उपस्थित केला. आधीच ओला दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त झालेले असून, अशा परिस्थितीत अतिरिक्त नुकसान सहन करण्याची त्यांची ताकद संपली आहे.
पावसाळ्यात ज्या ठिकाणी माल ठेवला जातो, तेथे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने माती चिखलमय होते. गोडाऊनच्या अभावामुळे माल सुरक्षित ठेवणे कठीण ठरते. अचानक पाऊस आल्यास माल भिजतो, झाकण्यासाठी शेड अथवा तात्पुरती आडोशाची व्यवस्था नसल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते, असे आडतदारांनी सांगितले.
उपबाजारातील प्रसाधनगृहांची दयनीय अवस्था हाही गंभीर मुद्दा आहे. रविवारी येथे मोठ्या संख्येने शेतकरी, शेतकरी महिला, गाळेधारक मालक आणि महिला व्यापारी येतात. मात्र पाणी नसणे, साफसफाईचा अभाव आणि तुटपुंज्या सोयींमुळे त्यांना प्रचंड अडचण होते. स्थानिकांनी या परिस्थितीला ‘पश्चिम बनवणारी’ म्हणत नाराजी व्यक्त केली.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव व माजी उपसभापती पराग जाधव यांनी शेतकरी आणि आडतदारांशी चर्चा करून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर वातावरण थोडे शमले असून, लवकरच पायाभूत सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List