शेतातील पीक पाण्यात गेली,अस्मानी संकट ओढवले बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याने संपविले जीवन
आधुनिक केसरी न्यूज
महेश गायकवाड
सोलापूर : कर्ज काढलेले सगळे पैसे शेतात गेले पावसामुळे पीक पाण्यात गेले त्यामुळे अस्मानी संकट कोसळले आणि या संकटामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्याने आपले जीवन संपविले असल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
कर्ज काढलेले सगळे पैसे शेतात गेले अन् पीक पाण्यात गेले, त्यामूळे अस्मानी संकट ओढवले म्हणून बार्शी तालुक्यातील का गावातील शेतकऱ्याने आपले संपविले आपल्या बापाची व्यथा शेतकऱ्याच्या मुलीने वरील शब्दात मांडली.
लय मोठं कर्ज हाय म्हणून पप्पा सारखे रडायचे. काहीच सांगत नव्हतं. त्यादिवशी सकाळी हसत-हसत शेतात गेलतं. तू पोलिस होऊन दाखव, चांगलं राहा, असं सारखं म्हणायचं. मी पोलिस व्हावं, असं त्यांना वाटायचं. माझ्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी धाराशिवला घेऊन जायलेलं.
पण मीच नको म्हणलेलं. मी पैसं आल्यावर जाऊ म्हणलेलं. त्यांच्याकडं पैसंच नव्हतं. कर्ज काढून सगळं पैसं शेतात घातलं. ते संपलं म्हणून खासगी सावकारांकडून पैसं घेतलं. ते पण शेतात गेलं आन शेतातलं पीक पाण्यात गेलं. त्यांना सारखं फोन यायचं. आमच्या गळ्यात पडून रडायचं, त्यांची लय आठवण येते...'' कुणाचेही मन हेलावून टाकणारी ही व्यथा कारी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथे आत्महत्या केलेल्या शरद गंभीर यांची अकरा वर्षांची मुलगी श्वेता हिने मांडली आहे.
महापुराने शेकडो नागरिकांचे संसार, हजारो शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त केली, जनावरं दगावली. घरात खायला काही राहिलं नाही, होतं नव्हतं ते सगळं पुरात वाहून गेलं, आता पुढं काय? या प्रश्नाचं उत्तर शासकीय यंत्रणेची गती पाहता सध्यातरी कुणाकडेच नाही. अस्मानी संकटाने दिलेल्या जखमा किती खोलवर गेल्या आहेत, याचं प्रतिनिधिक अन् तितकंच हृदयद्रावक चित्र श्वेतानं तिच्या बोलण्यातून मांडल्याचं दिसून येत आहे.
अस्मानी संकटाने गंभीर कुटुंबीयांचे सर्वस्व हिरावून घेतले. शरद यांनी शेतात पेरलेल्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. ज्या डोळ्यांनी बागायती शेतीतून समृद्धी मिळविण्याची स्वप्ने पाहिली, त्याच डोळ्यांनी अतिवृष्टीने काळ्या आईवर कोसळलेले आभाळ अन् त्यामुळे ओढावलेले कर्जफेडीचे संकट पाहिले. पीक नुकसानीच्या संकटाशी दोन हात करण्याची धमकही बाळगली, पण बॅंकांचे कर्ज अन् सावकारांच्या जाचाचे चक्रव्यूह कसे भेदायचे, हे मात्र कळले नाही अन् शरद यांना मृत्यूला कवटाळावे लागले.
शरद गंभीर (वय ४०) यांनी बुधवारी (ता. २४) सकाळी शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गंभीर यांचे लहान बंधू श्रीकांत यांनी त्यांच्या कुटुंबावर ओढावलेल्या संकटाची माहिती दिली. ते म्हणाले, ''निम्मी बागायत अन् निम्मी जिरायत अशी एकूण सहा एकर शेती. थोरला भाऊ शरद हाच शेती बघायचा. शेतात तीन बोअर घेतले. दोन फेल गेले. एक थोडे चालते. त्यावर भागत नाही म्हणून आयडीएफसी बॅंकेकडून ६ लाख ८० हजार रुपये कर्ज घेऊन सोनेगाव तलावातून शेतात पाच किलोमीटर लांबवर पाइपलाइन आणली. त्यानंतर बॅंक ऑफ इंडियाकडून अडीच लाख रुपये कर्ज घेऊन ड्रीप केली. साडेआठ लाखांचे कर्ज काढून ट्रॅक्टर घेतले. त्याचे तीनच हप्ते भरले गेले आहेत.''
''शेतात ऊस लावला. पण मागील वर्षी संभाव्य पाणीटंचाईमुळे शासनाने तळ्याचे पाणी बंद केले होते. त्यामुळे ऊस गेला. याशिवाय अडीच एकर लिंबू बाग, दीड एकर पेरूची बाग लावली. यंदा उर्वरित क्षेत्रात कांदा लागवड करण्यासाठी रोप टाकले. उसाला उधारीवर ३० हजार रुपयांचा खताचा डोस टाकला; पण दुसऱ्याच दिवशी अतिवृष्टी झाली. त्यामुळे लिंबू बागेत गुडघाभर पाणी साचले. लिंबं गळाली, सडली. पेरू बागेतही चांगला माल लागला होता. त्याला फोम लावायचे होते. पण ते घेण्यासाठी त्याला कोणाकडूनच पैसे मिळाले नाहीत. पेरू बागेचे नुकसान झाले. माल खराब झाला. त्यामुळे आता कर्ज कसे फेडायचे, या चिंतेने त्याने बुधवारी सकाळी गळफास घेतला,'' असे सांगताना श्रीकांत यांना हुंदका आवरता आला नाही.
प्रमुखच गमावल्याने कुटुंबीयांवर संकट
गंभीर कुटुंबात शरद हे कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत होते. त्यांच्या पश्चात आता आई-वडील, पत्नी, एक ११ वर्षांची मुलगी, पाच वर्षांचा मुलगा, लहान भाऊ, भावजय असा परिवार आहे. श्रीकांत कळंब (जि. धाराशिव) येथे मामाच्या बॅटरीच्या दुकानात कामाला आहेत. त्यांचे नुकतेच लग्न झालेले आहे. शरद यांच्या जाण्याने आता कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे.
कुटुंबाचा तोच आधार होता. त्याला खासगी सावकारांचे फोन यायचे. पण तो पैसे कुणाकडून घेतले त्यांची नावं सांगत नव्हता. अतिवृष्टीनं लिंबं सडली, ऊस गेला. आताही शेतात गुडघाभर पाणी हाय. लय चुकीचा निर्णय घेतला त्यानी. कर्ता माणूस जाणं लय मोठी गोष्ट हाय. आता आम्ही काय करायचं? त्या लहान लेकरांनी कुणाकडं बघायचं? कुणाच्याही बाबतीत असं होऊ नये म्हणून शासनाने शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे.
- श्रीकांत गंभीर, शरद यांचे लहान बंधू
कारी गावात सुमारे ४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. द्राक्ष बागांसाठी आमचे गाव प्रसिद्ध आहे. साधारण ६०० एकरांवर द्राक्ष बागा आहेत. बाकी पेरू बागा, ऊस, कांदा ही पिके आहेत. सर्वांत जास्त क्षेत्रावर सोयाबीन आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने या पिकांचे ८० टक्के नुकसान झाले आहे. अजूनही शेकडो एकर पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
- खासेराव विधाते, उपसरपंच, कारी तालुका बार्शी
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List