स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे शिबिर नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे : अजित पवार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे शिबिर नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे : अजित पवार

आधुनिक केसरी न्यूज

नागपूर दि. १९ सप्टेंबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे शिबिर नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे असून धाडसी व ठोस निर्णय घ्यायचे आहे. आजच्या चिंतन शिबिरातून आराखडा तयार करणार आहोत त्याला नागपूर डिक्लेरेशन म्हणून मांडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चिंतन शिबिरात दिली. लोकांना विश्वास देणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्वाचे असून लोकशाही - न्याय - समता या विचारावर आज शिबिर होत आहे. अनेक वर्षे समाजकारण, राजकारण करणारे लोक उपस्थित आहेत.सर्वधर्मसमभाव मानणारा हा पक्ष आहे. शिव - शाहू - फुले- आंबेडकर यांची विचारधारा घेऊन काम करत आहोत असेही विचार अजित पवार यांनी मांडले. 

पक्षाच्यावतीने बुथ, जनसंवाद, रोजगार शिबिरे घेणार आहोत. त्यावेळी पक्ष लोकांच्याजवळ राहणार आहोत. सत्ता किंवा पदासाठी आम्ही पाऊल उचलले नव्हती तर राज्याची प्रगती व्हावी... ठोस निर्णय घेता यावा या हाकेला ओ दिली आणि आम्ही महायुतीमध्ये सहभागी झालो अशी माहितीही अजित पवार यांनी दिली. पक्ष हा कोणत्याही एका जातीचा - पातीचा नाही हा पक्ष सर्वसामान्य जनतेचा लोकांचा आहे. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम आपण करतो. आजचा नागरीक आपल्याकडून अपेक्षा करत आहे. जनता संवाद निरंतर सुरू राहिला पाहिजे. जनतेला हेलपाटे मारायला लावू नका. सरकार आणि पक्ष यांच्यातील समन्वय अधिक घट्ट करूया. जमिनीवर सक्रीय रहा लोकांना भेटा आपले उपक्रम कोणते आहेत याची माहिती दिली पाहिजे असे आदेशच अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. 

एक दिवस पक्ष सांगतो त्यावेळी तुम्ही वेळ देऊ शकत नाही. यापुढे जबाबदारी आल्यावर भान ठेवले पाहिजे. मंत्री महोदयांना पक्षापेक्षा काम जास्त असेल तर त्यांनी आपलं पद मोकळं करायला हरकत नाही. पालकमंत्री ज्यांना मिळाले आहे त्यांनी इतर दिवशी जावंच लागेल. आणि लोकांची कामे पूर्ण करा. लोकांची कामे होणार नसेल तर खुर्ची खाली करावी लागेल हा निर्वाणीचा इशाराही अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिला. 

सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयावर चर्चा या शिबिरामध्ये झाली आहे. पुढील काळात प्रत्येक कार्यकर्ता लोकांशी जोडला पाहिजे. दर तीन महिन्यांनी प्रत्येक जिल्हयात जनसंवादाचा कार्यक्रम घेणार आहे. प्रत्येक महिन्याला नवीन मोहीम... नवीन विषय घेऊन लोकांपर्यंत जायचे आहे. असेही अजित पवार यांनी जाहीर केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या पवित्र भूमीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबिर घेतले यातून नक्कीच चांगले विचार सर्वांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत असेही अजित पवार म्हणाले. 

आगामी मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये मांडण्यात आलेल्या मुद्द्यांचा विचार करणारी भूमिका नक्कीच कार्यक्रमात घेतली जाईल असा शब्दही अजित पवार यांनी यावेळी दिला. 

आपल्या नेतृत्वाने आपल्याला दिशा देण्याचे काम केले आहे - प्रफुल पटेल

आपल्या नेतृत्वाने आपल्याला दिशा देण्याचे काम केले आहे. सत्तेत आहोत त्याचा सदुपयोग पक्षासाठी करायचा आहे असे सांगतानाच त्यात आपल्याला छाप निर्माण करायची आहे. पक्षाला सहकार्य कायम राहिले पाहिजे. पक्षाला नुकसान होईल असे वक्तव्य कुणी करू नये त्यावेळी पक्षाला किंमत मोजावी लागते अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. 

सर्वधर्मसमभाव विचाराने आपला पक्ष काम करत असून याच विचारांचा पूल म्हणून पक्ष काम करत आहे असेही प्रफुल पटेल म्हणाले. शेतकऱ्यांचा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचा पक्ष आहे परंतु सध्या शहरीकरण वाढत आहे आणि त्यांचे प्रश्न वाढायला लागले आहे. शहरी भागात मोठ्याप्रमाणात मतदारसंघ वाढले आहेत. याचा विचार झाला पाहिजे. आपल्या नेत्यांना शहर आणि ग्रामीण भागाची जाण आणि माहिती आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोचण्याची आवश्यकता आहे असेही प्रफुल पटेल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. 

मंत्र्यांनी दोन तासाच्या पर्यटनासाठी विदर्भात येऊ नये. यायचं असेल तर माझ्या लोकांच्या प्रश्नासाठी यावे. शिवाय विदर्भातील ज्या जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री आहे त्यांनी झेंडा वंदनासाठी येऊ नये. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी यावे. पक्षाचे प्रश्न सोडवावे असे खडेबोलही प्रफुल पटेल यांनी सुनावले. 

लोकशाहीचा मुलभूत सिध्दांत घेऊन जाणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - सुनिल तटकरे : लोकशाहीचा मुलभूत सिध्दांत घेऊन जाणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून दादांची झेप राज्यातून देशातील प्रगतीवर असणार आहे. पक्षाच्या विचाराची बांधिलकी सर्वसामान्य जनतेशी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपले विचार मांडले. 

पक्षाच्या इतिहासात आगळे वेगळे चिंतन शिबिर असून आधुनिक वाटचाल पक्षाच्या चिंतन शिबिरातून पहायला मिळणार आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या इतिहासात झाले नाही असे आपल्या पक्षाचे शिबिर होत आहे. आज शिबिरात पक्षासाठी व्यापक विचार मांडण्यात आले. त्यात आठ गटाच्या प्रमुखांनी चांगल्या विषयाची मांडणी केली. आपल्यावर टिका होते याचा अर्थ आपलं काम चांगल्या पध्दतीने सुरू आहे हे निश्चित आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले. या विदर्भातील नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दिक्षाभूमीवरुन दिशा घेऊन पक्ष शिबीरातून घेऊन जाणार आहोत. दिनांक ३० सप्टेंबरपर्यंत लिखित अहवाल शिबिरातील गटप्रमुखांनी द्यायचा आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. 

दादांची शैली ही दादाची शैली आहे. काहींना ती भावत नसेल. त्यामुळे टिका होते पण वैचारिक सिध्दांतावर आपण त्या टिकेला सामोरे जायचे आहे असेही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणली. पण ही योजना मांडण्याचे काम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. राज्याच्या इतिहासाला याची नोंद घ्यावी लागली आहे. ही योजना आणून लाडक्या बहिणींना ओळख देण्याचे काम केले आहे अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी दादांचे कौतुक केले. 

विधानसभा निवडणुकीत जो स्ट्राईक रेट जनतेने आपल्याला दिला तोच स्ट्राईक रेट कायम ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. पक्ष आपल्या मागे आहेच पण एक वेगळा ठसा उमटवणारे काम करायचे आहे. सामाजिक राजकीय आव्हाने पेलायची आहे असा मौलिक सल्लाही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.कोणतेही हेवेदावे न ठेवता एक परिवार म्हणून अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी यावेळी केले. 

पक्षावर टिका होणार हल्ले होणार पण घाबरून मागे हटून चालणार नाही - छगन भुजबळ

निवडणुकीत उतरताना आपल्या कार्यकर्त्यांकडे विषय असला पाहिजे. फक्त पक्षाचे लेबल उपयोगी पडणार नाही त्यासाठी झटून काम करावे लागणार आहे. पक्ष सोबत असेलच असे स्पष्ट करतानाच पक्षावर टिका होणार... हल्ले होणार... पण घाबरून मागे हटून चालणार नाही असे आत्मविश्वास निर्माण करणारे विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनेत्राताई पवार,कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक,महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आदींसह पक्षाचे आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सोलापुरातील  तडीपार गुंडाचा लातूर मध्ये पाळत ठेवून खून सोबत असलेल्यासोनाली भोसले या तरुणीलाही भोसकले  सोलापुरातील  तडीपार गुंडाचा लातूर मध्ये पाळत ठेवून खून सोबत असलेल्यासोनाली भोसले या तरुणीलाही भोसकले 
आधुनिक केसरी न्यूज महेश गायकवाड  सोलापूर : सोलापुरातील  तडीपार गुंडाचा लातूर मध्ये पाळत ठेवून काल रात्री खून  करण्यात आला आहे....
खडकीजवळ बस अपघात; चालक जखमी पण प्रवासी थोडक्यात बचावले
एसटीसाठी १७४५० कंत्राटी चालक व सहाय्यक भरती प्रक्रिया राबवणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे शिबिर नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे : अजित पवार
शंभरी पूर्ण करणाऱ्या रा.स्व.संघाने नथुराम व विखारी विचार सोडून संविधान व गांधी विचार स्विकारावा: हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र शासनाचा विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार; रू.८०,९६२ कोटीं गुंतवणूक तर ४०,३०० रोजगार निर्मिती
अचलेर येथील तमाम शेतकऱ्यांचे लोहारा तहसिलदारांना निवेदन एकरकमी आर्थिक मदत देण्याची मागणी