शंभरी पूर्ण करणाऱ्या रा.स्व.संघाने नथुराम व विखारी विचार सोडून संविधान व गांधी विचार स्विकारावा: हर्षवर्धन सपकाळ
आधुनिक केसरी न्यूज
मुंबई : दि.१९ सप्टेंबर २०२५ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या रा. स्व संघाने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता व सामाजिक न्यायाचे संविधान व गांधी विचार स्विकारावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारताचे संविधान ही ऐतिहासिक घटना असून संविधान भारताची प्रेरणा आहे. संविधान हे मनुस्मृतीवर आधारीत असावे अशी रा. स्व. संघाची अपेक्षा होती, गोलवलर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तसे पत्र पाठवले होते. पण आम्ही विशिष्ट लोक हा संघाचा विचार आहे तर संविधानाचा विचार हा आम्ही भारताचे लोक असा आहे. गोलवलकर यांचे बंच ऑफ थॉट हे रा. स्व. संघ व भाजपाचे बायबल आहे. संविधान नाकारणारा विचार भाजपाचा आहे. स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्ष रा. स्व. संघाने त्यांच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंगा सुद्धा फडकवला नव्हता. आता शंभर वर्ष होताना संघाने विखारी व विषारी विचार सोडून संविधानाचा विचार स्विकारला पाहिजे असे सपकाळ म्हणाले.
काँग्रेस पक्षाची नेहमीच संविधान रक्षणाची भूमिका राहिली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या पुढाकाराने २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान संविधान सत्याग्रह यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा नागपूरच्या दिक्षाभूमीपासून सुरु होऊन सेवाग्रामपर्यंत जाणार आहे. २८ तारखेला महान क्रांतीकारी भगतसिंह यांच्या बलिदानदिनी मशाल मोर्चा काढला जाणार आहे तसेच नागपूरच्या संविधान चौकात एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २९ तारखेपासून यात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी रा. स्व. संघाला संविधान भेट देणार असल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
फडणवीस, निवडणूक आयोगाची दलाली बंद करा
एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी झाल्याचे पुरावे दिले आहेत, मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृहमंत्रालयही आहे, त्यांच्या पोलिसांनी राजुरा विधान सभेतील मतचोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तरिही देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाची दलाली करत आहेत, त्यांनी ही दलाली बंद करावी. देवेंद्र फडणवीस हे चोर मुख्यमंत्री आहेत, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पूर्वी सुसंस्कृत, सभ्य, विचारवंत व कवी पदरी असायचे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही नालायक व विकृत लोक पदरी ठेवले आहेत. जयंत पाटील यांच्याबद्दल केलेले विधान हे बेलगामपणाचा कळस असून फडणवीस हे लाचार व अधर्मी मुख्यमंत्री आहेत असे सपकाळ म्हणाले.
पनवेलच्या भाजपा नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
पनवेल महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक हरिश केणी, रविकांत म्हात्रे, कैलास घरत यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
काँग्रेस तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखती
टिळक भवन दादर येथे काँग्रेस तालुकाध्यक्ष पदासाठी निरीक्षकांनी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य खासदार चंद्रकांत हांडोरे, नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, यु. बी. व्यंकटेश, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड गणेश पाटील उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List