लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
On
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी होतील. राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा संकल्प असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’ चा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव (ता. फुलंब्री) येथे झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दि.१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' राबविले जाणार आहे. किनगाव येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या आवारात आयोजित या सोहळ्यास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार डॉ. कल्याण काळे आणि संदीपान भुमरे, आमदार सर्वश्री संजय केणेकर, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, आमदार श्रीमती अनुराधा चव्हाण, आमदार श्रीमती संजना जाधव तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, तसेच आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, पाणी फाऊंडेशनचे अविनाश पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकसहभाग अभियानाचा गाभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठवाड्याची दुष्काळापासूनही मुक्ती करु असा निर्धार व्यक्त करुन श्री. फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे योजनांची अंमलबजावणी करुन लाभ देण्याचे अभियान तर आहेच, मात्र हे प्रत्येक ग्रामस्थाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे अभियान आहे. लोकसहभाग या अभियानाचा मूळ गाभा आहे.
लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य
श्री. फडणवीस म्हणाले की, आमच्या लाडक्या बहिणी यांना केवळ १५०० रुपयांवर अवलंबून रहावे लागू नये, त्यांना महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन लाडक्या बहिणींना सक्षम करण्यात येईल. प्रत्येक गावात लाडक्या बहिणींची एक पतसंस्था सुरु करुन जिल्हा बॅंकेमार्फत त्यांना १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन त्यांच्या पाठीशी शासन उभे राहील. अशाप्रकारे राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार,असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
*पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात लोकांच्या जीवनात परिवर्तन*
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा पंधरवडा' राबविण्यात येत आहे, त्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरु करण्यात आले आहे. पंतप्रधानाच्या नेतृत्वात देशाने प्रगती केली असून २५ कोटी लोक गरिबीच्या रेषेखालून वर आले आहेत. आज १५ कोटी लोकांना स्वतःचे घर उपलब्ध होऊ शकले. लोकांच्या जीवनात परिवर्तन आले, हे सगळे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात घडलं, असे मुख्यमंत्री म्हणाले.
*२८ हजार ग्रामपंचायती विकासाचे मॉडेल बनविणार*
ग्रामविकासाच्या अनेक योजना, अभियाने आलीत पण त्यात ठरविक गावेच पुढे गेली. आता या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून प्रत्येक गावांगावांतून समृद्ध महाराष्ट्र घडेल. अशा स्पर्धांमध्ये कोणतेही गाव मागे राहू नये यासाठी हे अभियान सुरु केलं आहे. या अभियानात केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना गावात राबविण्यात येतील. त्या माध्यमातून राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती आणि ४० हजार गावे मॉडेल म्हणून विकसित करू, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
*सहकारालाही बळकटी*
या योजनेचे प्रमुख सात स्तंभ आहेत.त्याद्वारे सुशासनयुक्त पंचायत, प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविणे, जल समृद्ध गावे करणे, प्रत्येक गाव स्वच्छ आणि जलसमृद्ध करणे, वृक्षारोपण, गावाच्या विकासासाठी मनरेगा आणि अन्य योजनांचे अभिसरण करण्यात येईल. गावातील अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी संस्थांचे बळकटीकरण करतानाच गावातील सेवा संस्थांना १७ उद्योग, व्यवसाय देऊन त्याद्वारे सहकारालाही बळकटी देऊ, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
*२५० कोटींची पारितोषिके देणारी पहिलीच योजना*
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या ग्रामपंचायतींना तब्बल २५० कोटी रुपयांचे पारितोषिके दिली जाणार आहेत. इतकी पारितोषिके देणारी ही देशातील पहिलीच योजना आहे.
*सुप्त शक्तीची आठवण करुन देण्यासाठी अभियान*
या अभियानामुळे वंचित घटकांच्या जीवनात बदल घडवू. त्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. गावात एकजूटीने राहून आपण समृद्धी आणू. राज्यातील अनेक गावांत लोक वेगवेगळे प्रयत्न करुन परिवर्तन घडवित आहेत. एआयचा कृषीत वापर केला जात आहे. आपल्या प्रत्येकामध्ये हे परिवर्तन घडविण्याची सुप्त शक्ती आहे. त्या सुप्त शक्तीची आठवण करुन देण्यासाठीच हे अभियान आहे. प्रत्येक ग्रामस्थाने हे अभियान आपले आहे असे समजून सहभाग द्यावा आणि सक्षम महाराष्ट्र घडवावा, आजपासून ही स्पर्धा सुरु झाली अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. त्यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली. या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुकास्तरावर प्रथम १५ लाख,द्वितीय १२ लाख आणि तृतीय ८ लाख, जिल्हास्तरावर प्रथम ५० लाख,द्वितीय ३० लाख आणि तृतीय २० लाख तर राज्यस्तरावर प्रथम ५ कोटी,द्वितीय ३ कोटी आणि तृतीय २ कोटी रुपयांची बक्षिसे मिळणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
ग्रामविकास मंत्री गोरे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या प्रसंगी श्री. फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले. या अभियानाच्या संकेत स्थळाचे उदघाट्न करुन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच अभियानाची माहिती देणाऱ्या व किनगावच्या विकासाच्या चित्रफितीचे विमोचन करुन त्याचे कार्यक्रमात प्रदर्शन करण्यात आले. आदर्श गाव सरपंच पोपटराव पवार, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आभार प्रदर्शन केले. तर नीता पानसरे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्ह्यातील सर्व ८८० ग्रामपंचायती या सोहळ्यात ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या. तसेच यानिमित्त सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. आदल्या दिवशी म्हणजे दि.१६ रोजी राज्यभरात विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
17 Sep 2025 21:28:35
आधुनिक केसरी न्यूज बीड,दि.17 (जिमाका) : अनेक दशकांपासून बीडच्या जनतेने प्रतीक्षा केलेली रेल्वे आज बीड येथून सुरू झाली असून, बीडकरांना...
Comment List