वाळु चोरी उघड करणार्या पत्रकावर हल्ला; लोखंडी रॉडने मानहाण, चौघांवर गुन्हा
आधुनिक केसरी न्यूज
हिंगोली : जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील अवैध वाळू उपसा करून वाहतुकीची बातमी देणार्या पत्रकारासह अन्य एकास लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात चौघांवर गुरुवार दि.५ जुन रोजी सकाळी गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली उपविभागांतर्गत सेनगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासुन बेसुमार वाळु उपसा सुरु आहे. बन शिवारासह इतर ठिकाणावरुन पुर्णा नदीच्या पात्रातुन बेसुमान वाळु उपसा करुन त्याची वाहतुक केली जात आहे. रात्रीचया वेळी वाळु उपसा करुन पहाटेपर्यंत वाळु वाहतुक केली जात आहे. विशेष म्हणजे वाळु वाहतुक करणारी वाहने भरधाव वेगाने नेली जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या संदर्भात समाज माध्यमावर वृत्त प्रसिध्द झाले होते. दरम्यान, पत्रकार रामेश्वर पोले हे त्यांचे मित्र पंजाब शिंदे यांच्यासह बुधवार दि.४ जुन रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गणेशपूर गावाकडून वटकळी येथे गावाकडे जात असतांना भानखेडा शिवारातील घाटाजवळ एका चारचाकी वाहनातून आलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीसमोर वाहन उभे केले. त्यानंतर पोले यांना वाळू उपशा संबधी बातमी का प्रसिध्द केली या कारणावरून तलवार व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच पंजाब शिंदे यांनाही लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यानंतर वाहनातील चौघांनी पळ काढला. या मारहाणीत जखमी झालेल्या रामेश्वर व पंजाब यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी रामेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी ऋषीकेश पोले याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप मस्के, जमादार जी.एस.पाचपुते, सुभाष जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List