Braking News : मेलेल्या व्यक्तीच्या नावे भाजपच्या आमदाराने कोव्हिडच्या काळात पैसे काढले

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विधानसभेत खळबळजनक आरोप

Braking News : मेलेल्या व्यक्तीच्या नावे भाजपच्या आमदाराने कोव्हिडच्या काळात पैसे काढले

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेतील चर्चेदरम्यान आरोग्य विभागाचे धक्कादायक प्रकरण बाहेर काढले. भाजपच्या एका आमदाराने कोव्हिड महामारीच्या काळात मेलेल्या व्यक्तींना जीवंत दाखवून शासनाच्या सवलतींच्या माध्यमातून पैसे काढल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. 

जयंत पाटील सभागृहात म्हणाले की, कोविडच्या काळात एका हॉस्पिटलने मृत रुग्ण जीवंत दाखवून शासनाच्या सवलतींचा लाभ घेत त्या सवलतीची पैसे खाल्ले आहेत. आणि यात धक्कादायक बाब ही आहे या प्रकरणात मुख्य आरोपी हे आपल्या सभागृहाचे एक सदस्य आहे आणि विशेष बाब म्हणजे ते सत्तेत महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या व्यक्तींचे निकटवर्तीय मानले जातात. 

*नेमका भ्रष्टाचार कसा केला गेला.* 

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मौजे मायणी येथे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या नावाने वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. सन २०२० मध्ये देशभरात कोरोना रोगाचा संसर्ग व फैलाव झाला होता.  कोव्हीड - 19 च्या रुग्णांवर उपचार करताना या रुग्णालयाचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक मयत लोकांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केल्याचे आढळून आले आहे. 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून बोगस डॉक्टर दाखवले*

आधी या रुग्णालयाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी करारनामा करताना बोगस डॉक्टर दाखवले आहे. यातील डॉक्टर नमुद काळात सदर रुग्णालयात कार्यरत नव्हते व त्यांनी कोणत्याही रुग्णांवर कोणत्याही प्रकारचे उपचार केलेले नाहीत. उदा. डॉ.शश‍िकांत कुंभार यांनी या हॉस्पीटलची ज्यावेळी चौकशी करण्यात आली होती त्यावेळी चौकशी सम‍ितीला असे ल‍िहुन द‍िले आहे की, मी या हॉस्पीटलमध्ये कार्यरत नाही. असे एकुण 46 डॉक्टर आहेत. रुग्णालयाच्या बॉडीने स्वतःच्या फायद्यासाठी सदर डॉक्टर्स रुग्णालयात उपचारासाठी नसतानाही डॉक्टरांची नावे दाखवली आहेत. तसेच सातारा जिल्हा परिषद यांच्याकडे रुग्णालय नुतनीकरणासाठी संस्थेच्या संचालक मंडळाचा कोणताही ठराव न घेता, खोटी कागदपत्रे दाखवून, बोगस डॉक्टर दाखवून 300 बेडचे रुग्णालय नुतनीकरण करून सदर नुतनीकरण प्रमाणपत्र हे महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी करार करताना जोडून शासनाची व संस्थेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली. 

मृत व्यक्तीला जीवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केले

या रूग्णालयामध्ये कोवीड 19 काळात उपचारादरम्यान 200 ते 250 रूग्णांचा मृत्यु झाला होता. असे मृत्यू पावलेल्या रुग्णांना सुमारे दहा दिवस ते तीन महिन्यानंतर जीवंत आहेत असे दाखवून महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये दहा ते बारा दिवस उपचार द‍िला आहे असे दाखव‍िले आहे. सदर मृत रूग्णास डिस्चार्ज देताना सदर रूग्ण व्यवस्थित (STABLE) आहे असे दाखवून मयत झालेल्या रूग्णांच्या डिस्चार्ज फॉर्मवरती खोट्या सह्या केलेल्या आहेत. साध्या आणि सोप्या शब्दात झाले काय तर मयत रुग्ण हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट झाले, मयत रुग्णांनी हॉस्पिटलमधे उपचार घेतले, शासकीय सवलतींचा लाभ घेतला इतकेच नव्हे तर महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेच्या नियमानुसार रूग्णाचे समाधान पत्र घेतले जाते ते देखील भरुन द‍िले आण‍ि त्यानंतर  राज्य परिवहन नियमानुसार परतीचा प्रवास खर्च पन्नास रूपये याचा देखील लाभ घेतला.
उदा. 1) श्री.व‍िलास दगडू चव्हाण यांचा द‍ि.29 जून 2021 रोजी मृत्यू झाला. त्यांना द‍ि.08 जुर्ले 2021 रोजी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. म्हणजेच मृत्यूनंतर 10 द‍िवसांनी त्यांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले.  त्यांच्यावर 10 द‍िवस उपचार करण्यात आले व त्यांची तब्येत ठ‍िक झाल्यावर त्यांना द‍ि.18 जुर्ले 2021 रोजी ड‍िस्चार्ज देण्यात आला. या मयत रुग्णांने द‍ि.26 जुर्ले 2021 रोजी महात्मा फुले ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत समाधान पत्र भरुन द‍िले. तसेच त्याच द‍िवशी वाहतूक खर्चाची 50 रुपयांची पोहच पावती देखील भरुन द‍िली. (मृत्यू प्रमाणपत्र,ॲडमीट कार्ड, ड‍िचार्ज पेपर, समाधान पत्र, वाहतुक पोहच पावती सोबत जोडली आहे) 

रुग्णालयाच्या संस्था चालकांनी नुसतीच मयत रुग्णांचे नावे पैसे उकळून शासनाची फसवणूक केली नाही तर रुग्णांना मिळणारे प्रवासाचे 50 रु देखील सोडले नाही असा आरोप जयंत पाटील यांनी केला. 

रुग्णांचे खोटे फोटो वापरून शासनाच्या सवलतींचा लाभ घेतला

कोव्हीडच्या काळात कोव्हीड पॉझिटिव्ह आलेले व ज्यांना ऑक्सिजेनची सुध्दा गरज नाही अशा रूग्णांना सुध्दा जास्त रक्कमेचे पॅकेज (र.रू 40,000/-) मिळावे यासाठी सदर रूग्णास डिस्चार्ज देते वेळी आय.सी.यु बेड वरती झोपवून सदर रूग्णास व्हेंटीलेटर लावुन फोटो काढलेले आहेत व महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेच्या पोर्टलवरती सदर खोटे असलेले फोटो अपलोड केलेले आहेत. सदर फोटो काढते वेळी जिथे व्हेंटीलेटर जोडलेला आहे त्याच्या आजुबाजुला कोणताही ऑक्सीजन पॉईंट नाही व व्हेंटीलेटर ऑक्सीजनची मुख्य पाईप सदर व्हेंटीलेटरवरती अडकवून ठेवलेली आहे. ती कुठेही जोडलेली नाही व रूग्णांना फोटो काढण्यापुरते व्हेंटीलेटर जोडलेले असताना व्हेंटीलेटर डिस्प्लेमध्ये रूग्णाची ऑक्सीजन लेवल  3,5,7,11,15,18,20 अशी दिसत आहे. व्हेंटीलेटरवर असलेल्या रूग्णास साधा सलाईन लावलेली दिसत नाही. 

या रुग्णालयात 7 व्हेंटीलेटर उपलब्ध होते या ह‍िशोबाने 10 द‍िवसा मध्ये फक्त 7 रुग्णच त्यावर उपचार घेऊ शकत होते. म्हणजेच जास्तीत जास्त 21 ते 30 रुग्ण त्याचा वापर करु शकत होते. परंतु व्हेंटीलेटरला 40 हजाराचे पॅकेज असल्याने द‍िडशे - दोनशे रुग्णांनी त्याचा वापर केला आहे असे दाखवून शासनाकडून पैसे उकळले आहेत. 

*महाविकास आघाडी सरकारने कारवाई केली पण सत्तांतर झाले कारवाई शिथिल केली*
    
रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रारी केल्यावर तत्कालीन आरोग्यमंत्री टोपे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या सेंटरमध्ये चाललेल्या गैरप्रकारांबाबत चौकशी सम‍िती नेमली. सदर सम‍ितीने दि.01 जुर्ले 2021 रोजी रुग्णालयास भेट देऊन तपासणी केली आण‍ि आपला चौकशी अहवाल द‍ि.07 जुर्ले 2021 रोजी सादर केला. त्यामध्ये एबीजी मश‍िनरीवरती रुग्ण तपासल्याबाबत एकही नोंद आढळून आली नाही. तसेच अन्य गैरप्रकारांचा उल्लेख करण्यात येऊन गैरव्यवहार, भ्रष्टाचार, फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे असा अहवाल द‍िला आहे. सदर अहवालाच्या अनुषंगाने शासनाने द‍ि.3 ऑगस्ट 2021 रोजी महात्मा फुले जनआरोग्य व‍िमा योजनेतून सदर हॉस्पीटल कायमस्वरुपी न‍िलंब‍ित केले व मंजूर प्रस्तावाचे अनुदान बंद करुन नवीन प्रस्ताव जमा करुन घेऊ नये असा न‍िर्णय करण्यात आला. 

शासनाने यानंतर द‍ि.12 ऑगस्ट 2021 रोजी उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सम‍िती तयार करुन द‍ि.17 ऑगस्ट 2021 रोजी पुनश्च: रुग्णालयास भेट देऊन आपला अहवाल सादर केला. त्यामध्ये 825 बनावट एबीजी र‍िपोर्ट (सुमारे 2 कोटी 47 लाख 70 हजार 200 रुपयांचे) बनव‍िल्याचे न‍िदर्शनास आले. सदर एबीजी र‍िपोर्ट डॉ.पाचकवडे ज्यांनी सन 2015 रोजी संस्थेचा राजीनाम द‍िला होता त्यांच्या  बनावट व बोगस सह्यांचे असल्याचे चौकशीत न‍िष्पन्न झाले. त्याचप्रमाणे मेड‍िकल ऑफीसर म्हणून डॉ.कुंभार यांनी सदर रुग्णालयात आपण कार्यरत नसून आपली खोटी सही व बनावट श‍िक्का वापरला आहे असे सम‍ितीसमोर समक्ष हजर राहून लेखी ल‍िहून द‍िले आहे. तसेच रुग्णालयात प्रयोगशाळा बंद असल्याचे डॉक्टर तसेच इतर तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसल्याचे तसेच कोणताही रुग्ण नसल्याचे नमुद करुन संस्थेने शासनाची फसवणुक केली असल्याचे नमुद केले आहे.  

त्यानंतर या संस्थेच्या पदाध‍िकाऱ्यांचे प्रताप इथेच थांबत नाहीत. संस्थेचे अध्यक्ष असलेल्या संचालक मंडळाची मुदत द‍ि.20 ऑगस्ट 2021 रोजी समाप्त झाली असताना त्यांनी संस्थेचे अध्यक्ष व सच‍िव यांच्या सहीचे बँक ऑफ इंड‍िया, शाखा दह‍िवडी येथे खाते क्र.132120110000294 हे नवीन खाते उघडले. नंतर महाव‍िकास आघाडीचे सरकार गेल्यावर राजकीय दबाव वापरुन शासनाने थांबव‍िलेले  67 लाख 62 हजार 500 ऐवढे अनुदान त्या खात्यात वर्ग करुन घेऊन रक्कम परस्पर काढून घेतली असे सांगत असताना मयताच्या ताळूवरचे लोणी खाणे काय असते हे या प्रकरणावरून आपल्याला कळेल असेही जयंत पाटील म्हणाले. 

पुढे जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी अशी घोषणा केली होती की त्यांचे हे सरकार राज्यातील गोर गरिबांसाठी, मोल मजुरांसाठी, कष्टकरी शेतकऱ्यांसाठी, महिला भगिनींसाठी काम करेल. हे सगळे राहिले बाजूलाच. पण आपलं सरकार इतके गतिमान आहे की त्यांनी मृत व्यक्तींचे देखील उपचार करण्याचे व त्यांना बरे करण्याचे कौशल्य साध्य केले आहे असा टोला त्यांनी सरकारला लगावला. हे सरकार सध्या कौशल्य विकासावर जास्त भर देत आहेत. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कौशल्य विकासासाठी एखादी समिती नेमावी आणि त्या समितीवर मृत व्यक्तींवर उपचार करण्याचे कौशल्य असलेल्या तुमच्या या सहकाऱ्याला अध्यक्ष म्हणनू नेमावे, मग पहा तुमचा कारभार कसा गतीमान होतोय असे म्हणत त्यांनी सरकारला चिमटा काढला.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

साक्षात तुकारामांच्या दर्शनाने नागपूरकर मंत्रमुग्ध..! साक्षात तुकारामांच्या दर्शनाने नागपूरकर मंत्रमुग्ध..!
आधुनिक केसरी न्यूज  नागपूर, दि. २१/१०/२०२४ इंद्रायणीच्या काठावर बसलेले तुकोबा, गावकऱ्यांनी केलेल्या टिंगल टवाळीमुळे थेट आपल्या विठ्ठला सोबतच संवाद साधत...
Braking News : काँग्रेसची 96 जागांवरची चर्चा पूर्ण
पैठणच्या नाथसागराचे 18 दरवाजे उघडले
संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांनी घेतले राजुरेश्वरचे दर्शन;  आठवडी बाजार संकष्टी एकत्र आल्याने वाहनांची तोबा गर्दी
अम्मा का टिफिनच्या प्रणेत्या, निराधारांचा आधार कायमचा हरपला : अजय जयस्वाल
रामभाऊ म्हळगी प्रबोधिनीचा ४२ वा वर्धापन दिवस आणि आयआयडीएल 8 वा दीक्षांत सोहळा उत्साहात संपन्न
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मांचे 80 व्या वर्षी निधन